काळ आला होता .... वेळ आली नव्हती.
काळ आला होता .... वेळ आली नव्हती. आयुष्य हे क्षणभंगूर असतं केवळ श्वास उच्छवास यातलं अंतर म्हणजे आयुष्य असं माझ्या मनात येण्यास कारण ही त्या दिवशीची घटना कारणीभूत झाली. समजा आपण श्वास घेतला आणि पुन्हा सोडताच आला नाही तर? किंवा श्वास सोडला आणि पुन्हा घेताच आला नाही तर काय? आपण या जगातून दुसऱ्या जगात. म्हणजे जर दुसरं जग असलंच तर, बरं का? बरं हे मरणं हे आपल्यासाठी काहीच नसतं पण ईतरांसाठी ती घटना असते. आणि या घटनेचे परिणाम, पडसाद हे ईतरांच्या जीवनात उमटतात आपल्या नाही. कारण आपण त्याच्या पलीकडे गेलेलो असतो. तर सांगायचंय असं की तो दिवस होता २ जून २०२० चा. मंगळवार होता. अगदी नेहमीप्रमाणे संपूर्ण दिवस व्यवस्थित पार पडला साधारणपणे रात्री दोन अडीच वाजण्याच्या सुमारास छातीत जळजळण्याने जाग आली. थोडं विचित्र वाटत होतं. असं वाटत होतं की छाती आणि पोटाच्या मध्यभागी गॅस अडकलाय आणि जळजळ पण होतेय. म्हणून मी येरझाऱ्या घालू लागलो. एसी चालू होता तरीही घाम येत होता आणि तो जाणवण्या ईतपत थंडगार होता. एक दोन छोट्याशा वांत्या झाल्या परंतु काही पडलं नाही. एव्हाना पत्नी मिनल व धाकटी लेक लिनाक्षी जाग्या ...