काळ आला होता .... वेळ आली नव्हती.
काळ आला होता .... वेळ आली नव्हती.
आयुष्य हे क्षणभंगूर असतं केवळ श्वास उच्छवास यातलं अंतर म्हणजे आयुष्य असं माझ्या मनात येण्यास कारण ही त्या दिवशीची घटना कारणीभूत झाली. समजा आपण श्वास घेतला आणि पुन्हा सोडताच आला नाही तर? किंवा श्वास सोडला आणि पुन्हा घेताच आला नाही तर काय? आपण या जगातून दुसऱ्या जगात. म्हणजे जर दुसरं जग असलंच तर, बरं का? बरं हे मरणं हे आपल्यासाठी काहीच नसतं पण ईतरांसाठी ती घटना असते. आणि या घटनेचे परिणाम, पडसाद हे ईतरांच्या जीवनात उमटतात आपल्या नाही. कारण आपण त्याच्या पलीकडे गेलेलो असतो.
तर सांगायचंय असं की तो दिवस होता २ जून २०२० चा. मंगळवार होता. अगदी नेहमीप्रमाणे संपूर्ण दिवस व्यवस्थित पार पडला साधारणपणे रात्री दोन अडीच वाजण्याच्या सुमारास छातीत जळजळण्याने जाग आली. थोडं विचित्र वाटत होतं. असं वाटत होतं की छाती आणि पोटाच्या मध्यभागी गॅस अडकलाय आणि जळजळ पण होतेय. म्हणून मी येरझाऱ्या घालू लागलो. एसी चालू होता तरीही घाम येत होता आणि तो जाणवण्या ईतपत थंडगार होता. एक दोन छोट्याशा वांत्या झाल्या परंतु काही पडलं नाही. एव्हाना पत्नी मिनल व धाकटी लेक लिनाक्षी जाग्या झाल्या व त्यांनी फॅमिली डॉक्टर अमेय यादवना फोन केला. त्यांना सर्व घटनाक्रम सांगितला तेव्हा त्यांनी लागलीच हॉस्पिटलमध्ये जाण्यास सुचवले. आम्हाला मुलगा नाही दोन्ही मुली. अश्या अवेळी धावपळ कोण करणार? पण आमचा अगदी मुलगाच असलेला आमचा जावई सिद्धार्थ याला फोन करुन कळवल्यावर तो त्वरीत गाडी घेऊन निघाला. तो येईपर्यंत मी आणि बायको आम्ही आमच्या ईमारतीखाली येऊन थांबलो ईथक्यात तो आला आणि आम्ही हिंदुजा हॉस्पिटलमध्ये जायला निघालो. वाटेत दोन वेळा कोरड्या उलट्या झाल्याच. एकदाचे आम्ही हिंदुजा हॉस्पिटलमध्ये पोचलो मी अस्वस्थतेमुळे पटकन् गाडीतून उतरुन व्हील चेअरवर जाऊन बसलो आणि मला तातडीने बाह्य रुग्ण विभागात नेण्यात आलं. तिथे त्वरीत आवश्यक त्या गोळ्या मला दिल्या गेल्या इंजेक्शन दिलं गेलं आणि माझी प्रकृती स्थिर करण्यात आली. इतकं सगळं होईपर्यंत पहाटेचे पाच वाजले होते. माझा मित्र अजय पाटणकर एव्हाना माझ्या पत्नीच्या सांगण्यावरुन हॉस्पिटलमध्ये आलाच होता त्याने आमच्या शिवाजी पार्क जिमखान्यातल्या सुनील रामचंद्रनला फोन केला आणि धावपळ सुरु झाली. शिवाजीपार्क भागाचं, किंबहुना संपूर्ण मुंबईचंच म्हणा ना, एक वैशिष्ट्य असं की वेळी अवेळी धावपळ करायला ईथे माणसं तत्परतेने तयार असतात. त्या दिवशी माझा काळ आला होता पण वेळ आली नव्हती. म्हणून सारं काही सुरु होतं.
आपण नेहमीच बेसावध असतो. आयुष्य क्षणभंगूर आहे हे मानायलाच तयार नसतो. काळाचा घाला आपल्यावर कधी येईल हे कधी सांगता येत नाही. आणि याची प्रचिती तो घाला आल्यावर प्रथमच आपल्याला येते. काहींच्या नशीबी तर ती संधी सुद्धा येत नाही. बरं, मी वर सुरुवातीला लिहिलेलं वाक्य हे मला माझा मित्र चंद्रशेखर कुलकर्णीने सुप्रसिद्ध साहित्यिक में.पु. रेगेंचे एका प्रसंगीचे उद्गार म्हणून सांगितलेले आहेत. ते असे की आपला मृत्यू ही आपल्यासाठी एक घटना नसते परंतु ती ईतरांसाठी मात्र घटना असते. मग मी अंतर्मुख होऊन जेव्हा विचार करतो तेव्हा खरंच ते विचार पटतात.
तर सांगायचं असं की, पुढे हिंदुजा मधून स्थिर झाल्यावर मला नानावटी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं तिथे दोन दिवस मी अतिदक्षता विभागात होतो आणि तिथून नंतर मला ब्रीचकँडी रुग्णालयात नेण्यात आलं. आणि या सर्व घडामोडींची सूत्रं शिवाजीपार्क जिमखान्यातले म़ाझे मित्र हलवत होते. माझी पत्नी फक्त माझ्या सोबत होती. मला खरोखर राहून राहून आश्चर्य याच गोष्टीचं वाटतं की माझ्या आयुष्यातील एका अत्यंत महत्वाच्या क्षणी, माझ्या जीवन मराणाच्या प्रसंगी महत्वाचे निर्णय माझे नातेवाईक सोडून ईतर मंडळी घेत होती आणि आम्ही त्याप्रमाणे वागत होतो. मुंबईच्या या एखाद्या व्यक्तीच्या जीवनातल्या आणीबाणीच्या प्रसंगी धावपळ करण्याच्या आणि वेळीप्रसंगी महत्वाचे निर्णय घेण्याच्या वैशिष्ट्याची मला त्या जीवावरच्या प्रसंगात जाणीव झाली. माझं ऑपरेशन नानावटी हॉस्पिटलमध्ये न करता ब्रीचकँडी रुग्णालयात करण्याचा निर्णय हा माझ्या शिवाजीपार्क जिमखान्यातील डॉक्टर प्रताप राऊत, सुनील रामचंद्रन आणि अजय पाटणकर या मित्रांनी घेतला होता. मी नानाटी हॉस्पिटलमध्ये होतो त्याकाळात सतत सगळीकडे फोनवरुन संपर्क साधून माझ्यासाठी चांगले डॉक्टर आणि सर्जन कोण हे त्यांनी शोधून काढलं होतं आणि मला त्यांच्या हातात सोपवलं माझ्या पत्नीला आणि नातेवाईकांना अजिबात कसलीही तसदी होऊ दिली नाही. डॉक्टर अजित देसाई कार्डिओलॉजिस्ट आणि डॉक्टर संजीव विचारे, कार्डियाक सर्जन यांनी माझी ५ जूनला अँजिओग्राफी केली आणि ६ जून रोजी मला सांगण्यात आलं की माझी बायपास करावी लागणार आणि तो निर्णय लगेच घ्यायचा आहे. डॉक्टर संजीव विचारे हे अत्यंत शांत व अत्यंत प्रेमळ व्यक्ती असून त्यांनी मला सारं काही नीट समजावून सांगितलं. मी निर्णय घ्यायला एक दिवस मागून घेतला. डॉक्टरनी मला वेळ दिला आणि ते निघून गेले.
माझी पत्नी ही काही कामासाठी खोली बाहेर होती. मी एकटाच छताकडे नजर लाऊन बेडवर पडलो होतो. विचाराचं काहूर माजलं होतं की आता काय?
जीवन आणि मृत्यू यांच्यातील एका रेषेवर मी उभा होतो. या तो ईस पार या तो उस पार अशी परिस्थिती होती. ऑपरेशन यशस्वी झालं तर पुढे जीवन होतं. नाही यशस्वी झालं, ऑपरेशन सुरु असतानाच हृदय विकाराचा तीव्र झटका आला आणि त्यात आपण दगावलो तर काय? असे विचार मनात यायला लागले. आपण दगावलो तर मागच्यांचं काय? धाकटीचं अजून लग्न व्हायचंय. बायको एकटी काय काय बघेल? हे सारे विचार मनात एकवटले. मृत्यूनंतर काय? तर काहीच नाही. कशाचीच जाणीव नसणार. आपण या जगात नसणार. सारे व्यवहार चालू रहातील थोडासा त्रास होईल पण नंतर सारं सुरळीत सुरु राहील. ईथेच मला वर सांगितलेले में. पु. रेगेंचे उद्गार पटले. (आपलं मरण ही आपल्या साठी घटना नसते परंतु ती ईतरांसाठी घटना असते.) जसं ऑपरेशन झाल्यावर हृदयाला रक्तपुरवठा सुरळीत सुरु होईल तसंच. खोलीत निःशब्द शांतता होती. ती लहानशी खोली सुद्धा एका प्रचंड मोठ्या हॉल सारखी जाणवायला लागली. त्याच विचारात डोळा लागला आणि स्वप्न पडलं. एक मोठ्ठा हॉल काळोखाने भरलेला. जुनाट ईमारतीत असतो तसा. त्याचं छत एकदम उंच. दूरवर एका कोपऱ्यात ऊंचावर अंधुकसा उजेड दिसतोय. त्या हॉलच्या एका कोपऱ्यात जमिनीवर मी उकीडवा बसलोय संपूर्ण पोकळीत जड लोखंडावर जड लोखंड घासल्यावर येतो तसा, पण सूक्ष्म आवाज भरलेला असं काहीतरी दिसत होतं. ईतक्यात मोठ्ठा लोखंडी दरवाजा उघडण्याचा आवाज होतो, स्वप्नातच, आणि मी जागा झालो. स्वप्नातून वास्तवात आलो. वरुन शांत होतो पण आत मनात मात्र अस्वस्थता होती. शेवटी एकदाचं ठरवलं, जे होईल ते होईल पण ही अस्वस्थता संपवायची. निर्णय पक्का झाला. काळ्याकुट्ट अंधाऱ्या त्या हॉल मधून बाहेर पडायचं.
दुसऱ्यादिवशी सकाळी नित्यक्रमाच्या फेरीवर डॉक्टर विचारे आले. त्यांना मी माझा होकार कळवला. म्हंटलं मी स्वतःला तुमच्या हातात सोपवतोय आता माझं जे काही व्हायचं असेल ते होईल. ऑपरेशन करुन टाका. त्यांनी लगेच तयारी सुरु करायला स्टाफला सांगितलं आणि ९ जून २०२० ही तारीख मुक्रर केली.
९ जून रोजी भूलतज्ञ येऊन त्यांनी मला भूल दिल्यावर पुढे काय झालं हे मला समजलंच नाही. मी थेट जागा झालो ते मला वाटतं दुसऱ्या दिवशी. काय योगायोग आहे पहा माझी १९६१ सालची जन्म तारीख १० ऑक्टोबर आणि मी या जगात मृत्यूशी भेट घेतल्यानंतर पहिल्यांदा डोळे उघडले ते ही १० तारखेलाच. पहिली जाणीव झाली ती आपण जिवंत आहोत याची. पुढच्या क्षणाला आठवण आली ती बायकोची. ती आल्यावर आनंद झाला. आणि बायकोवरच्या आपल्या प्रेमाची जाणीव होऊन किंचितशी लाज ही वाटली.
हॉस्पिटलमध्ये मुक्काम संपल्यावर घरी आलो, बायकोने सेवा-शुश्रुषा करुन मला ठणठणीत बरं ही केलं पण या सगळ्यात माझ्या धाकट्या लेकीची आणि बायकोची तब्येत मात्र खराब झाली. आता ती पूर्ववत होवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना करतो. कारण ती ठणठणीत तर कुटुंब ठणठणीत.
माझा काळ आला होता पण वेळ आली नव्हती. ती वेळ येऊ न देण्यात डॉक्टर अजित देसाईंचा, डॉक्टर संजीव विचारेंचा, ब्रीचकँडी हॉस्पिटल मधील सिस्टर्स आणि ब्रदर्सचा, माझ्या असंख्य मित्रांचा, माझ्या मेव्हण्यांचा, साडवाचा, मुलगाच असेलेल्या जावयाचा, तितकाच जवळचा असलेल्या भाच्याचा गौतम चा, माझ्या दोन मुलींचा आणि ईतर सर्व नातेवाईकांचा फार मोलाचा आणि मोठा हातभार आहे हे मी कदापि विसरु शकणार नाही. कोरोना काळात ही फार मोठी आणि अवघड लढाई तुम्हा सर्वांच्या मदतीमुळे, शुभेच्छांमुळे मी जिंकू शकलो एवढं मात्र नक्की.
पुष्कराज चव्हाण
१०-०९-२०२१
Comments
Post a Comment