माऊली
माऊली
कर कटेवरी, उभा विटेवरी,
चंद्रभागे तीरी विठ्ठल माऊली ||
मूर्ती राऊळी, तरी भेटे वेळोवेळी,
भक्ताचिया ठायी निरंतर वसे ||
आषाढ – कार्तिकी, दिंड्या निघती पायी,
करावया वारी पंढरपुरी ||
चंद्रभागा वाहे दुथडी भरुन,
जणू जळ वाहे भक्तिरुपी ||
ऐशा या प्रसंगी, नीरक्षीर विवेक,
जाऊद्या सांडोनी व्हावे निर्मळ ||
वैष्णव नाचती, भान विसरुनी,
मोद भरलासे वाळवंटी ||
भक्त बेभान नाचती, मुखी नामाचा गजर,
चाले अहोरात्र अखंडित ||
आनंद सोहळा , हा कौतुके पाहती,
विठ्ठल-रखुमाई साश्रुनयने ||
लोटता भवसागर, सजले पंढरपुर,
अपुरे पडते अवघे नगर ||
भक्तांचिये संगे, भक्ती मधे रंगे,
होऊनिया दंग पांडुरंग ||
ऐसा हा सोहळा, देव-भक्तांचा मेळावा,
कौतुकाने पहावा उभ्या जन्मी ||
देव सजलेला आज, त्यास भक्तीचाच साज,
वंदी मनोभावे त्यास पुष्कराज !!
पुष्कराज
२२-०४-२०२२
१२:०० वाजता
Comments
Post a Comment