आंबेवाडीची गोष्ट.
आंबेवाडीची गोष्ट सरत्या वैशाखाची भल्या पहाटेची वेळ होती. आंबेवाडी गांव चांदण्या उत्तररात्रीच्या चंदेरी चंद्रप्रकाशात न्हाऊन निघत होतं.सारं गाव अगदी निपचित गडद निजलेलं होतं. ग्रीष्माला परतीचे वेध लागलेले. हवेत वर्षा ऋतुचं आगमन होणार असल्याची जाणीव करुन देणारा सुखद गारवा होता. चतुर्थीचा चंद्र मावळतीकडे झुकत चाललेला. चंद्राच्या चंदेरी प्रकाशात झाडांच्या सावल्या लांबट होत चाललेल्या. झाडांच्या पानां मधून पिठुर चांदणं झिरपत होतं. पानांच्या सावल्यांची जाळी रस्त्यावर पसरलेली होती. झाडं मंद वाऱ्याच्या झुळुकीने संथपणे डोलत होती. आळसावलेली कुत्री मांजरी अंगाचं मुटकुळं करुन गार वाऱ्याच्या झुळुका अंगावर घेत धुळीत झोपलेली. ऊशाशी धूसर दिसणारा पन्हाळ्याचा डोंगर, डाव्या कुशीला जोतिबाचा डोंगर आणि पायाशी संथ वाहणाऱ्या पंचगंगा नदीचं पात्र घेऊन विस्तीर्ण हिरवंगार ऊसाचं शेत वाऱ्यावर डौलाने डोलत ऊभं राहीलं होतं. शिवारात दौलतराव भोसल्यांचं दगडी जोत्यावर बांधलेलं ऐसपैस दुमजली कौलारु घर. घरापुढे अंगणात दगडी तुळशी वृंदावन, त्यावर तेल...