आंबेवाडीची गोष्ट.



              आंबेवाडीची गोष्ट

       सरत्या वैशाखाची भल्या पहाटेची वेळ होती. आंबेवाडी गांव चांदण्या उत्तररात्रीच्या चंदेरी चंद्रप्रकाशात न्हाऊन निघत होतं.सारं गाव अगदी निपचित गडद निजलेलं होतं. ग्रीष्माला परतीचे वेध लागलेले. हवेत वर्षा ऋतुचं आगमन होणार असल्याची जाणीव करुन देणारा सुखद गारवा होता. चतुर्थीचा चंद्र मावळतीकडे झुकत चाललेला. चंद्राच्या चंदेरी प्रकाशात झाडांच्या सावल्या लांबट होत चाललेल्या. झाडांच्या पानां मधून पिठुर चांदणं झिरपत होतं. पानांच्या सावल्यांची जाळी रस्त्यावर पसरलेली होती. झाडं मंद वाऱ्याच्या झुळुकीने संथपणे डोलत होती. आळसावलेली कुत्री मांजरी अंगाचं मुटकुळं करुन गार वाऱ्याच्या झुळुका अंगावर घेत धुळीत झोपलेली. ऊशाशी धूसर दिसणारा पन्हाळ्याचा डोंगर, डाव्या कुशीला जोतिबाचा डोंगर आणि पायाशी संथ वाहणाऱ्या पंचगंगा नदीचं पात्र घेऊन विस्तीर्ण हिरवंगार ऊसाचं शेत वाऱ्यावर डौलाने डोलत ऊभं राहीलं होतं. शिवारात दौलतराव भोसल्यांचं दगडी जोत्यावर बांधलेलं ऐसपैस दुमजली कौलारु घर. घरापुढे अंगणात दगडी तुळशी वृंदावन, त्यावर तेलाचा दगडी दिवा, घराच्या ऊजव्या हाताला कौलावर फांद्यांचा पसारा पसरुन कडूलिंब ऊभा तर डाव्या बाजूला थोड्याच अंतरावर रात्रंदिवस काम करुन थकून भागून सुस्तावलेला गुर्हाळ, त्या खालचं विझलेलं चुलाण आणि वरील भागात थंड पडलेली काहिली. गुर्हाळापासून थोड्या अंतरावर गुरांचा गोठा. त्यात रवंथ करत बसलेली बाकदार शिंगांची पांढरी शुभ्र खिल्लारी खोंडांची जोडी आणि दहा बारा दुभत्या म्हशी आणि तितक्याच गायी. गोठ्याच्या बाहेरील बाजूस आंब्याखाली विसावलेली बैलगाडी. घरामागे तबेला यात जातीवंत दोन ऊमदे घोडे, शेजारीच गॅरेज मधे चकचकीत आकाशी निळ्या रंगाची डॉज कन्व्हर्टिबल गाडी. सारं कसं शांत निवांत सुरक्षित असं वातावरण.
           पन्हाळगडाच्या डोंगरावरुन कोल्हापूरच्या दिशेने घरंगळत येणाऱ्या रस्त्याचा वेग जिथे मंदावतो तिथेच उजव्या हाताला आंबेवाडी हे एक छोटसं टुमदार गांव आणि डाव्या हाताला जोतिबाचा डोंगर. गावाच्या ईतर तीनही बाजूंनी कुंभी, कासारी, भोगावती, तुळशी आणि सुप्तावस्थेत असलेली सरस्वती या  नद्या मिळून झालेली पंचगंगा नदी अश्या या गावाच्या चतुःसीमा.
       आंबेवाडी तसं शांत, निवांत गांव पण ही शांतता हिंसेच्या, रक्तपाताच्या उदरातून उगम पावलेली अशी होती. त्या रम्य आणि निवांत शांततेला एका काळ्या पार्श्वभूमीची किनार होती. कोल्हापूर पासून कोल्हापूर-पन्हाळा रस्त्यावर अवघ्या हाकेच्या अंतरावर. कुंभी, कासारी आणि भोगावतीच्या संगमाच्या एका किनाऱ्यावर आंबेवाडी आणि दुसऱ्या किनाऱ्यावर पारध्यांची आणि रामोशांची वस्ती होती. दोन्ही वस्त्यांमधून विस्तवही जात नव्हता. पिढीजात वैराचा शाप या वस्तीला आणि गावाला होता. पारध्यांचा प्रमुखाची लेक दौलतरावांच्या श्रीपतीनं उचलून आणून तिच्याशी तिच्या बापाच्या मना विरुद्ध पाट लावला होता हे आणखीन एक नवं प्रकरण भरीस भर म्हणून त्यात नुकतंच जोडलं गेलं होतं. संधी मिळेल तेव्हा वचपा काढण्याचा निर्णय पारध्यांच्या पंचायतीने घेतला होता. भोसल्यांच्या घराण्याकडून यापूर्वी झालेल्या चकमकीमधे पारध्यांचे दोन पिढ्यांचे प्रमुख मारले गेले होते. त्याकाळी गावात तमाशांच्या कंपन्या येत असत आणि त्यांच्या बायका पळवण्यावरुन दंगली होत असत. गावकऱ्यांच्या आमंत्रणावरुन तमाशा कंपनी गावात येत असे तेहा त्यांचं रक्षण करणं हे आमचं कर्तव्य आहे असं आंबेवाडीकरांचं म्हणणं होतं. ही अशी पार्श्वभूमी असली  तरीही गाव तसं शांत पणाने आपले नित्याचे व्यवहार करीत असे. आंबेवाडी हे अगदी मोजक्या घरांची वस्ती असलेलं कोल्हापूर-पन्हाळा रस्त्यावरचं गांव. या गांवातल्या ऊस शेतकऱ्यांपैकी दौलतराव भोसले हे एक बडं प्रस्थ. अत्यंत कष्टाळू अन् तितकेच प्रेमळ. ऐन ऊमेदीत असताना शेतात काम करणाऱ्या मजूरांच्या बरोबरीने शेतात राबणारे दौलतराव येवढ्या मोठ्या शंभर दिडशे एकर जमीनीचे मालक आहेत हे कुणाला सांगून खरं वाटणार नाही ईतकी त्यांची साधी रहाणी असे. धोतर, पैरण, डोक्याला मुंडासं, कपाळावर शेंदरी टिळा, ओठांवर पीळदार मिशा, हातात भक्कम लाठी, पायात जाडजूड कोल्हापूरी वहाणा असा त्यांचा वेश. गावात त्यांच्या नावाचा दबदबा असल्याने गांवाचं पुढारीपण आपसूकच त्यांच्याकडे चालून आलेलं. भरदार शरीरयष्टी आणि तितकाच रांगडेपणा अंगात असलेली पण दौलतरावांच्या जरबेत राहणारी श्रीपती आणि संभा ही दोन मुलं. दोन सुस्वरुप, सुस्वभावी सुना आणि चार गोंडस नातवंडं.  सालस, सोज्वळ आणि मनमिळावू पत्नी गौराक्का.
      दौलतराव शेतीचा सर्व कारभार दोन्ही मुलांवर सोपवून आपण गावकीत लक्ष घालू लागलेले. गांव तसं साधंच. गुण्या गोविंदानं राहणारं. शेतात काबाड कष्ट करुन सायंकाळी गांवाच्या वेशीवर असलेल्या विठ्ठल-रखुमाईच्या देवळात भजन किर्तनात रमणारं. किंवा देवळा समोरच्या भल्यामोठ्या वडाच्या झाडाच्या दगडी पारावर बसून गप्पा गोष्टी करणारं. कुठं तमाशाचा फड नाही की टुरींग टॉकीज नाही. गावात भांडणं मारामाऱ्या नको म्हणून त्याला मनाई होती. येतंय कशाला कोण ईथं? रोजचा दिनक्रम अगदी ठरल्याप्रमाणे चालत असे.       
             दौलतरावांचा दरबार हा चार पायऱ्या वर चढून आल्यावर असणाऱ्या त्यांच्या घराच्या ओसरीवरच भरत असे. लोखंडी कड्या असलेल्या शीसवी झोपाळ्यावर शेजारी पान सुपारीचा डबा घेऊन बसलेले दौलतराव, पितळी अडकित्त्याने सुपारी कातरत समोर बसलेल्या अडल्या नडलेल्यांशी संवाद साधत असत, अडचणी सोडवत असत, कुणाला काय हवं नको ते ऐकून त्यांचं समाधान करीत असत. आल्या गेल्याची उठबस अगदी प्रेमाने आणि आपुलकीने होत असे. तालुक्यातून किंवा जिल्ह्यातून कुणी अधिकारी आला कि त्याचा दौरा दौलतरांवांना भेटूनच सुरु होई. असा त्यांचा गावातच नव्हे तर पंचक्रोशीत मान होता. गावाच्या शेवटाला हरीजन वस्ती त्याच्या पलीकडे कासारी, भोगावती आणि पंचगंगा नदीचा त्रिवेणी संगम. संगमावर अंत्येष्टीचे विधी करण्या साठी एक धर्मशाळा. असं हे जेमतेम चार पाचशे घरं असलेलं गाव. गांव लहान पण धनिकांची संख्या जास्त. त्यात आणि शहरा पासून लांब. म्हणजे वेळी प्रसंगी तालुका जिल्हा मुख्यालयाशी संपर्क करण्याचं साधन कमी आणि वेळेला हमखास दगा देणारं. गांवातल्या लोकांनी आपलं आपणंच रक्षण करायचं. त्यामुळे गावकऱ्यांच्यात एकूण २०-२५ दुनळी रायफली होत्या. तालुका जिल्ह्याहून मदत येईल तेव्हा येईल. तोवर आपणच परिस्थिती हाताळायची. असल्या चोरा चिलटांसाठी असलेल्या अनुकूल  परिस्थितीमुळे रामोशांची आणि पारध्यांची नजर सतत या गावावर असे. अधून मधून बारीक सारीक चोऱ्या व्हायच्या. कुणाचं कोंबडं, कुणाचं बकरं, औजारं असलं किडुक मिडुक चोरीला जायचं. नाही असं नाही पण यापलिकडे कधी चोरट्यांची मजल गेली नाही.
            गांवाचे व्यवहार भल्या पहाटेच सुरु होत असत. बायका अंगण सारवून, सडा घालून रांगोळ्या घालून आपल्या कामाला लागलेल्या, पुरुष मंडळी वासरं आणि रेडकं दावणीची सोडून धार काढायच्या तयारीला लागलेली. घरा पुरता दूध ठेऊन बाकीचं संकलन केंद्रात नेऊन पोचवायचं अन् मग न्याहारी करुन शेतीच्या कामासाठी शिवारात निघून जायचं. असा दिनक्रम सुरु व्हायचा. पहाटेच्या एस्. टी.नं परत आलेली परगांवी कामासाठी गेलेली माणसं घर गाठायचं म्हणून लगबगीनं घराकडं परतायच्या गडबडीत असत.
एव्हाना रोहिणीचा पाऊस पडून गेला होता. शेतीची कामं सुरु झालेली. मजूरांची, औजारांची जुळवा जुळव होऊन जो तो आपापल्या शिवारात कामाच्या धांदलीत होता. या खेपेला पाऊस चांगला होण्याचे अंदाज गांवातल्या ज्येष्ठांनी वर्तवलेले होते. गांवाला तशी पाण्याची कमतरता नव्हती पण पाऊस अंगावर घ्यायला सारेच ऊत्सुक.  ईतक्यात चक्रीवारा गिरक्या घेत घेत निघून गेला. पाढऱ्या ढगांचे पुंजके रंग बदलायला लागले. आभाळ गदळून आलं, गार वारा धुरळा, पाला पाचोळा उडवत सुटलेला. गांवात येणाऱ्या पावसाची चाहूल लागल्याने सारं काही आवरणं लगबगीने चालू होतं. तेवढ्यात दूरुन कुठूनतरी येणारा वाऱ्याच्या झुळुकी सोबतचा ओल्या मातीचा मृद्गंध मन सुखावून गेला. पर्जन्यराजाच्या आगमनाची वर्दी क्षणा क्षणाला मिळत होती. गावकरी आणखी धावपळीनं आवराआवर करायला लागले ईतक्यात तो आलाच, ढगांचे ढोल वाजवत, कौलांवर आणि घराच्या पत्र्यांवर ताशा वाजवत आला. आला तोच अक्षरशः कोसळत आला. धरतीच्या मिलनाच्या अनावर ओढीने तो धसमुसळेपणा करतच आला. त्याच्या या प्रेमाच्या वर्षावाने मात्र धरतीची गात्रं अन् गात्रं सुखावली. सारी सृष्टी मोहरली. झाडांचे, पानांचे, पक्षांचे, प्राण्यांचे, कष्टकऱ्यांचे, स्त्रीया पुरुषांचे पोरा टोरांचे, साऱ्यांचे चेहरे खुलले सगळ्यांच्या डोळ्यात आनंद तरळला. वातावरणात नवनिर्माणाच्या नांदीचा आनंद चराचरांच्या प्रत्येक बारीकसारीक कृतीतून, अन् हालचालीतून जाणवत होता. गाव शहारलं, तरारलं अन् नव्या जोमाने, नव्या उत्साहाने कामाला लागलं. मृगाच्या पावसाने सलामी तर अगदी झोकात दिली होती. जो तो आपल्या कामात गर्क झाला होता. गांव आनंदलं होतं. दौलतराव आपले सरकार दरबारी खोळंबलेली गांवाच्या विकासाची कागदपत्रं हलवण्याची कामं  करण्याच्या कामी लागलेले. गाव कसं अगदी निर्धास्त होतं. दिवस सरत होते. जेष्ठातली आणि आषाढातली तीनही नक्षत्रं आपापली वाहनं घेऊन येऊन आपापल्या वाट्याचा पाऊस देऊन निघून गेली. आषाढातली एकादशी सरली. वारीला गेलेली मंडळी गावात परतू लागलेली. स्त्रीयांना श्रावणाचे वेध लागलेले. घरा घरात सणाचे, व्रत वैकल्याचे दिवस सुरु होण्यापूर्वीची साफसफाई व ईतर किराणा सामान सुमान भरण्याची कामं सुरु होती. पुरुष मंडळी गावकीची कामं करण्यात मग्न तर मजूरांची शेतीतली कामं चालू होती. ईथून पुढे सणा सुदीचे दिवस सुरु होत होते म्हणून सारे आनंदात होते. त्यात आणि पाऊस सर्वांच्याच मनाप्रमाणे पडत होता म्हणून सारेच निश्चिंत होते. संपूर्ण वर्ष सुरळीत जाणार होतं. प्रत्येकाने आपापले वर्षभरातले मनसूबे अंमलात कसे आणायचे त्याचे आराखडे मनातल्या मनात  बांधायला सुरु केले होते.  कुणाकडे लग्नकार्य व्हायचं होतं, कुणाचं घर बांधून व्हायचं होतं, कुणाच्या शेतात विहीर खोदायची होती अशी मोठ्या खर्चाची कामं मार्गी लावण्याचे बेत आखणं चाललं होतं आणि त्यासाठी सोयीची वेळ ही दिपवाळी नंतरची ठरत होती. तोवर ऊस कापणीला येत होता आणि तो कारखान्यावर जाऊन उचल मिळणार होती. पाऊस चांगला होता, नदीला पाणीही मुबलक होतं, ऊसाला सारं काही पोषक आणि अनुकूल होतं. हरीजन वस्तीतही ऊत्साही वातावरण होतं प्रत्येक हाताला काम अन् पोटाला भाजी-भाकरी मिळत होती.
       गांवात जसं सारं काही आलबेल होतं तसं नदी पलीकडे पारध्यांच्या आणि रामोशांच्या वस्तीतही खुषीचं वातावरण होतं. गावात सुबत्ता म्हणजे वस्तीतही सुबत्ता येणार हा साधा सरळ हिशेब होता. त्यांचीही तयारी सुरु होतीच. रक्षाबंधन, कालाष्टमी, बैलपोळ्याच्या सणा निमित्ताने तसंच आठवडी बाजाराच्या निमित्ताने पारध्यांच्या आणि रामोशांच्या चकरा गावात सुरु झाल्या होत्या. टेहळणी केली जात होती. गावातल्या वाचाळांशी लगट वाढवून माहिती काढली जात होती. या खेपेला पारध्यांनी अन् रामोशांनी एकत्र येऊन मोठा डाव साधायचा बेत आखला होता. नदीतून मध्यरात्रीच अलीकडे येऊन गांव साखर झोपेत असतानाच डाव साधायचा अन् लागलीच नदीत ऊतरुन दोन विरुद्ध दिशांना पसार व्हायचं. नंतर राधानगरीच्या जंगलात भेटायचं आणि वाटणी करायची. वातावरण निवळलं कि मग काही दिवसांनी वस्तीवर परतायचं. सोनं, नाणं मार्गी लावायचं, फक्त नगद रक्कम ठेवायची असा बेत ठरला. येत्या दसऱ्याला पुन्हा एक टेहळणी करुन दिपवाळीच्या सुमारास शेवटची खातरजमा करुन घ्यायची. शेवटच्या या दोन फेऱ्यांत सावज नक्की करणे, चकमक झालीच तर लपण्याच्या जागा हेरुन त्या ठरवणे आणि माघारी येण्याचा व पसार होण्याचा मार्ग निश्चित करणे हे करायचं ठरलं होतं. कार्तिक अमावस्येची रात्र मुक्रर करण्यात आली. एकानं रात्रीच्या सुरुवातीलाच शेतात लपून बसायचं अन् मध्यान् रात्रीला गावाचा अंदाज घ्यायचा सगळी कडे सामसूम झाली की तिसऱ्या प्रहराला घुबडाच्या घुत्काराचा आवाज काढून ईशारत द्यायची अन् ईशारत मिळाल्यावर सर्वांनी नदीच्या उतारा कडून हरीजन वस्तीच्या बाजूने शेतांमधून पार वळसा घालून पाणंद ओलांडत गावाच्या चावडी पर्यंत शिरायचं निश्चित झालं. हरीजन वस्तीतून चार जणांनी येऊन बाकीच्या घरांना बाहेरुन कड्या लावायच्या. आणि मग चार चार जणांच्या गटांनी प्रत्येक गटाने दोन अशी हेरलेली निवडक पाच सहा घरं एकाच वेळी फोडायची अन् लूट घेऊन काहींनी नदीचा ऊतार गाठायचा, काहींनी संगमाच्या दिशेने नदीत ऊतरायचं अन् काहींनी पुलाच्या दिशेने जायचं ठरलं. रामोशांनी घरं फोडायची अन् दहशत बसवायची गरज पडली तर एका दोघांचे मुडदे पाडायचे आणि पारध्यांनी लूट करायची.
     ईकडे आंबेवाडीत सण वार ऊत्साहात साजरे होत होते. पोळा झाला, गणेशोत्सव येऊन गेला. गावात वर्दळ वाढली होतीच त्यात आणि पारध्यांची अन् रामोशांची भर पडलेली. भाद्रपदातले म्हाळाचे दिवस संपत आले. उत्तरा नक्षत्राचा बेडूक चांगलाच पाऊस पाडून गेला. घट बसण्याची लगबग सुरु झाली. अश्विन महिना लागला अन् जो तो आपापल्या शेतीच्या औजारांच्या, कामं धंद्याला लागणाऱ्या सामानाच्या, घरातल्या अस्त्रा – शस्त्रांच्या साफ सफाईला लागला. दसरा जवळ येत होता. पारध्यांनी आणि रामोशांनी गावातल्या लोहारांकडे ऊठ बस चालू केली. औजारांना पाणी लावायच्या निमित्ताने गांवातल्या मातब्बर घरांची माहिती मिळवणं सुरु होतं.
दौलतराव सकाळी नेहमी प्रमाणे ओसरीवर झोपाळ्यावर येऊन बसले. समोर अंगणात शिद्धा महार थोडं अंतर राखून उकीडवा बसलेला त्यांनी पाहिला अन् विचारते झाले “कारं शिद्धा आज कस काय येनं केलंस सक्काळच्या पारी? कुनी कडनं आलास म्हनायचा?” शिद्धा म्हार जरा सावरुन बसत म्हणाला “कोडोलीला गेल्तो जी”. “ते आनि का?” दौलतरावांनी विचारलं. “कोडोलीच्या सरपंचाची म्हातारी गचकली न्हवं? तिची राख सावडायला गेल्तो जी.”  “बर मंग हिकडं कसं काय येनं केलंस?” शिद्धा महार थोडा जवळ येऊन बसला अन् म्हणाला “सरकार, तांबडं फुटायच्या अदुगर म्या गांवात शिरलो तवा वाटंनं जात असतानी शेतात खूसपूस झाली म्हनून जरा कानोसा घेतला तशी खुसपूस थांबली. मी बी गपचिप उभारलो आन् झाडाच्या बुंध्या आडून लपून पाय्हलं तर चार गडी तुमची पाणंद वलांडून उदाजीरावांच्या शेतात घुसून नदी कडं जाताना नजरंस पडले. कोन हायत काय कळंना म्हंतानी मी बी चिपचाप त्यांच्या मागनं गेलो तर ते नदीत उतरुन पल्याड गेलेलं दिसलं. नदी पल्याडच्या पारध्या रामोशांपैकी असावंत असा आपला माझा संशव हाय.”  “बरं बैस आलायस तर वाईच जरा चा पीऊन जा आन् जातानी शंकऱ्याला सांगावा दे” ईतकं बोलून दौलतरावांनी घरात चहा देण्यास सांगून स्वतः झोपाळ्यावर बसल्या बसल्या सुपारी कातरत विचारात गढून गेले. तासाभरानं शंकऱ्या न्हावी आला दौलतरावांना नमस्कार करुन तसाच ऊभा राह्यला. दौलतरावांचं लक्ष नाही असं पाहून घसा खाकरुन म्हणाला “ सरकार बोलावनं केलासा? शिद्धा म्हार आल्ता सांगावा घीऊन”. दौलतरावांचं लक्ष गेलं तसं त्यांनी विचारलं “का रं शंकऱ्या कसं काय चाल्लंय कामकाज?” “चांगलं चाल्लंय जी” शंकऱ्या लोचटागत बोलला. “गावाकडं लक्ष हाय न्हवं? काही नजरंला पडलं, कानावर आलं तर सांग रं बाबा. सणासुदीच दिस हाईत काई ईपरीत घडाया नको . शिद्धा म्हारानं पारध्यांना अन् रामोशांना नदी पल्याड जाताना पाह्यलाचं सांगत हुता. जरा नजर ठेव”. “जी सांगतो कि. लक्ष हाय माजं पर माज्याबी ध्यानात आलंय कि नदी पल्याडच्या वस्तीतल्या लोकांची गावात ये जा वाढलीय. माज्याकडं बी चार दोन येऊन गेलीत. अन् बजाबा लोहाराकडं बी काही लोकं बसलेली नजरंला पडलीत माज्या. येणाऱ्या जाणाऱ्यां बद्दल ईचारपूस करीत व्हते.” “बरं नीघ तू आता अन् बजाबाला दे धाडून अन् आपलं बोलणं कुनाला सांगू नकोस.” दौलतराव म्हणाले आणि आपल्या कामाला लागले. श्रीपती आणि संभा तालमीतनं येताना दौलतरावांनी पाहिलं आणि त्यांनी दोघांनाही बोलावून घेतलं आणि सांगितलं कि गांवातली काही निवडक मंडळी आहेत त्यांना आणि तालमीतल्या पोरांना संध्याकाळी येण्याचा निरोप द्या , महत्वाचं बोलायचं आहे म्हणून सांगा आणि तुम्ही दोघंही हजर रहा. ईतक्यात बजाबा आलाच.“बजाबा काय रं काय चाल्लंय?” बजाबा कडे विचारपूस सुरु झाली. “जी काई न्हाई रोजचंच आपलं. सरकारास्नी काई काम द्याचं आसंल तर द्यावं लगीच करुन देतो की”. “तसं न्हवं रं, अलीकडं तुझ्याकडं पारधी रामोशी लोकं येऊन गेल्याच समजलं म्हनताना तुला बोलवून घेतलं. म्हनलं काय विशेष काम निगालं तुझ्याकडं ते जाणून घ्यावं.” “ आल्ते खरं, अन् चार पाच नवीन फरशा, कुऱ्हाडी बनवून घेतले काही जुन्या हत्यारांना पाणी चढवून घेतलं अन् गेले. पैसं बी बऱ्यापैकी मोजलं.” “बस? ईतकंच? का आनि काई चौकशा केल्या?” बजाबा थोडं विचारात पडला आणि म्हणाला “व्हय जी गांवात कोण कसं हाय. मातबर मंडळी कोण, अशा गोष्टी ईचरत व्हते”. एकंदरीत काय चाललंय याची दौलतरावांना कल्पना आली. त्यांनी मनातल्या मनात शिद्धा महाराचे सावध केल्याबद्दल आभार मानले.
              तिन्हीसांजेला दिवेलागण झाली अन् गांवातली निवडक आठ दहा मंडळी आणि तालमीतली बारा पंधरा पोरं दौलतरावांच्या अंगणात जमली. सगळ्यांच्याच चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह होतं. असं काय काम काढलं दौलतरावांनी कि आज चावडीत न बोलावता घरी बोलावलं? तुळशी वृंदावनाच्या दगडी दिव्याचा उजेड अंगणात पडलेला होता सोबत कंदिलांचा उजेड होताच. वातावरणात कुतुहल मिश्रित शांतता होती. रातकिड्यांची किर किर  वातावरणातल्या शांततेला सूक्ष्म छेद देत होती.जमलेल्यांच्या सावल्या दिव्यातल्या आणि कंदिलाच्या ज्योती नाचवतील तशा नाचत होत्या. जमलेल्यांची चुळबुळ सुरु झाली. मंडळी एकमेकांत दबक्या आवाजात कुजबुजत होती ईतक्यात दौलतराव घसा खाकरत श्रीपती आणि संभा सोबत आलेच.पाठोपाठ गडी चहाचे कप घेऊन आला. सर्वांना चहा दिला गेला आणि सर्जेरावांनी चर्चेला तोंड फोडलं. “दौलतराव, काय काम काढलंसा कि समद्यास्नी या वक्ताला अन् त्ये बी घराकडं बोलवलासा?” दौलतरावांनी कानावर आलेल्या गोष्टी मंडळींना सांगितल्या आणि म्हणाले ईथून पुढे बेसावध राहून चालणार नाही गावात येणाऱ्या जाणाऱ्याडे लक्ष ठेवलं पाहिजे. मातब्बर मंडळी हडबडलेली दौलतरावांच्या नजरेनं टिपलं. “ यडबडायला काय झालं? गावावर बिलामत यीऊ घातलीया म्हून सांगाय लागलोय तर गळपटलायसा कशापायी? तुमास्नी मसलतीला बोलीवलंय संगट तालमीतली तरनी ताठी वाघासारखी पोरं हाईत ती काय सोबंला  हैत व्हंय? भ्या चं कशापायी? गांवात बंदुका हाईत, फरशा, कुर्हाडी तलवारी हाईत त्या काय पुजायल्या ठीवल्यात व्हंय? करुयात कि दोन हात आन् दाखवुयात कि हिसका त्या शिंदळीच्यांना.” तालमीतल्या पोरांना हे ऐकून जोर आला आणि त्यांनी ऊत्साहात होकार भरला. “ मी म्हंतो तालुक्याला आणि जिल्ह्याला वर्दि दिलेली बरी” ऊदाजीराव चुळबूळ करत पुटपुटले श्रीपतरावांनी पण त्यास दुजोरा दिला. “ ते झालंच कि हो , वर्दि तर द्याची हायच पर ऐन वक्ताला भांडायला हुबं ऱ्हायाचं का मदत यील म्हनून वाट पहायची? तंवर पारधी-रामोशी आपलं मुडदं पाडून घरं खणून काढतील मग मागं बायका पोरं बसतील बोंबा मारत, चालतंय का?” दौलतराव करवादले. “कायदा कानून म्हनून पन काईतरी हाय की, ते नाकारुन कसं चालंल?” सर्जेराव म्हणाले. “व्हय कि, अहो न्हाई कोन म्हनतंय पन दरोडा काय असा आगावू सूचना देऊन येतो व्हंय? आपन काही तयारी करायला नगं? का हातावर हात ठीऊन बसून ऱ्हायाचं आन् मग ऐन वक्ताला तालुक्याला अन् जिल्ह्याला मदत मागायची? तुमची तयारी नसल तर तसं सांगा मी आनि माझी दोन पोरं काय करायचं ते पाहू.” दौलतराव ईतकं बोलल्यावर तालमीतली पोरं एकदम म्हणाली “ते का? आम्ही काय हातात कांकणं भरलीत व्हंय? आमी बी आहोत की सोबतीला.” ईतकं सगळं झाल्यावर ईतर मातब्बर मंडळीही तयार झाली. दौलतरावांनी तालमीतल्या पोरांना गटा गटाने राखणीची कामं नेमून दिली आणि गावात बोभाटा न करण्या विषयी ताकीद देऊन दसऱ्याला पुन्हा भेटायचं ठरवून सभा संपवली.
              भाद्रपदात गौरी गणपतीचे दिवस संपून म्हाळाचे दिवस सुरु झाले. सर्वपित्री अमावस्या सरली. अश्विन लागला अन् घटस्थापना झाली. गावात ऊत्साहाचं वातावरण होतं. नवरात्रीचे उपवास आणि व्रत वैकल्यं चालू होती. तालमीतली पोरं दसऱ्याच्या मिरवणूकीच्या तयारीला लागली. कुणी तलवारीचं, दांडपट्टयाचं, लाठीचं प्रात्यक्षिक दाखवायचं म्हणून सरावाला लागलेले. लहान पोरांच्या लेझीम च्या तालमी सुरु होत्या. मंडळं सासण काठ्या सजवण्याच्या कामी लागलेली. जो तो काही ना काही कामात गर्क होता. राखणी साठी निवडलेली पोरं पाळी पाळीने राखणीची कामं करत होती. ठिक ठिकाणी दगड गोट्यांचे ढीग रचून ठेवत होती. कुणी विचारलं तर पक्क्या सडकेच्या कामा साठी तयारी चालली आहे म्हणून सांगत होती. मातब्बर मंडळी दसऱ्याचं निमित्त पुढे करुन रायफलींना तेलपाणी करत होती. एकीकडे सणवार सुरु होते आणि एकीकडे झुंज द्यायची तयारी सुरु होती.
               दसऱ्याचा दिवस उजाडला. गावात पहाटे पासूनच गडबड सुरु होती. चावडीतल्या सनई चौघड्याच्या सूरांनी दिवस सुरु झाला. दहा वाजता मिरवणूक सूरु होऊन साधारणपणे १२ - १२.३० पर्यंत आटोपणार होती. चावडी पासून मिरवणुकीची सुरुवात होऊन गावातनं फिरुन हरीजन वस्तीतून वळसा घालून पुन्हा चावडी वरुन पुढे जाऊन वेशीवरच्या विठ्ठल मंदिरा पर्यंत जाऊन. माऊलींच दर्शन घेऊन परत चावडी पर्यंत येऊन मिरवणूक विसर्जित होणार होती. ठरल्याप्रमाणे सकाळी दहा वाजता मिरवणूक सुरु झाली. सर्वातपुढे शाळेतल्या मुलांचं गणवेशातलं लेझीम पथक त्यांच्या बरोबर असलेल्या हलगी वाजवणाऱ्याच्या आवाजाच्या तालावर झोकात लेझीम करत निघालेली. त्या पाठोपाठ मंडळातली पोरं सासन काठ्या नाचवत होती. त्या मागे ढोल ताशाचं पथक. त्याच्या मागे तालमीतली पोरं मावळ्यांच्या वेशात त्यांचं कसब दाखवत तलवारीचे, दांडपट्ट्याचे, लाठीचे हात करत चाललेले. त्यांच्या मागनं घोड्यांवर स्वार झालेली , खांद्याला बंदुका लावलेली, शिंदेशाही पगड्या घातलेली, जरीच्या पोषाखातली मातब्बर मंडळी अन् सर्वात मागे चकचकीत आकाशी निळ्या रंगाची कन्व्हर्टिबल डॉज मधे पुढे ड्रायव्हर रुद्राप्पा आणि मागे बसलेले दौलतराव आणि गौराक्का. मिरवणूक ठरल्या प्रमाणे फिरुन गावाबाहेरच्या देवळात दर्शन घेऊन चावडीवर येऊन विसर्जित झाली. गावात ठिकठिकाणी छोटे छोटे मंडप घालून त्यात जिलेबी वाटण्याचं काम चालू होतं. लहान थोर सारेच खुशीत होते. घरोघरी सुग्रास स्वयंपाकाचा दरवळ सुटला होता. घराघरात देवांना नैवैद्य दाखवून पानं मांडायला सुरुवात झाली होती. दौलतराव ओसरीवर झोपाळ्यावर कुणाची तरी वाट पहात बसले होते. श्रीपती आणि संभा ही त्यांच्या सोबत होते. गौराक्का  आल्या आणि दौलतरावांना म्हणाल्या “पाट पाणी घ्यायचं का? जेऊन घेताय न्हवं? निवेद दाखवून झालाय. म्हणत असाल तर वाढायला घेते. गरम हाय तंवर जीऊन घ्या म्हंतो मी.” दौलतराव त्यांच्याकडे न बघताच “थोडं थांबा” म्हणाले. “कुनी तरी येनार हाय माज्याकडं त्यांची वाट बगाया लागलोय”. “जेवायला असतील तर तसं सांगा म्हंजे आमी बी तयारीत रहातो.” गौराक्का असं म्हणून आत निघून गेल्या. थोडा उशीर व्हायला लागला तशी दौलतरावांची चूळबूळ वाढली. ईतक्यात तालमीतली चार पाच पोरं आली. दौलतराव लगेच सावरुन बसले आणि विचारते झाले. “ कायरं पोरांनो काय बघीतलंसा? सांगा बघू पटापटा” पोरांनी सविस्तर सगळं सांगितलं चौघं पाच जण आले होते. मिरवणूक चावडीवरुन पुढे गेल्यावर ते गल्ली बोळात फिरुन बघत होते. सगळं पाहून झाल्यावर चावडी समोरच्या वडाच्या पारावर बसले गटुळी सोडली भाकर तुकडा खाल्ला गेळ्यातनं पाणी प्याले अन् तिकडंच आडवे झाले. घटकाभर लवंडले आन् मग ऊठून पुलावरुन पलीकडे निघून गेले. दौलतरावांनी सारं ऐकून घेऊन पोरांना म्हणाले बरं “ठिक आहे. निघा आता तुमीबी भुकावला असाल पर ध्यानात ठेवा समद्यास्नी सांगून ठेवा जरा बी ढिल्लं पडायचं न्हाई.” पोरं गेली आणि दौलतरावांनी पानं वाढायला घेण्याची सूचना आत दिली.
                 संध्याकाळी वेशीवरच्या मंदिरात जाऊन आपट्याच्या पानांची आणि आलिंगनांची देवाण घेवाण झाली अन् दसरा संपला. गावाचे नित्याचे व्यवहार सुरु झाले. शेतीच्या कामाची लगबग सर्वांनाच होती. ऊस कापणीला आला होता. एकदा ऊसाची कापणी झाली आणि तो कारखान्यावर गेला कि दिपवाळीच्या तयारीला लागायचं होतं. अश्विन पौर्णिमा सरली अन् पंधरा दिवसावर दिपवाळी येऊन ठेपली. ऊस कापणी होऊन कारखान्यावर गेल्याने सारे निवांत होते. आता वर्षाचा सण म्हणताना हौस मौज खरेदी वगैरे सुरु झाली. हा हा म्हणता अश्विन चतुर्दशी आली. पहिली अंघोळ झाली. बायका माणसं आणि मुला बाळांमधे सणाचा उत्साह होता. गाव सडा संमार्जनाने आणि त्यावर घातलेल्या रांगोळ्यांनी सजला होता. घरा घरांवर मेणबत्त्या लावलेल्या आकाश दिवे आणि पणत्यांची आरास शोभून दिसत होती. मुलं नवीन कपडे दिमाखात मिरवत होती. फटाके लावत होती. फराळाचा सुगंध घरा घरातून दरवळत होता. एकमेकांकडे फराळ पोहोचवला जात होता. दिपवाळीचा आनंद साऱ्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता. दौलतराव आणि ईतर निवडक मंडळी सण साजरा करत होते पण चित्त कुणाचंच थाऱ्यावर नव्हतं. भाऊबीजेला बहिणी कडे गेलेली मंडळी या खेपेला तिकडे रमली नाहीत की रेंगाळली नाहीत. काही ना काही सबब सांगून प्रत्येक जण गावाकडे लागलीच परतला होता. दिपवाळीची धांदल चारपाच दिवसात संपली. कार्तिक पौर्णिमेचे वेध सर्वांनाच लागलेले. लग्नसराई चे दिवस जवळ येत चाललेले. गांवात लग्न कार्य व्हायची होती.  खरेदी करता लोकांची कोल्हापूरात जा ये वाढली. बायका गुजरीत जाऊन दागदागिने बनवायला देऊ लागल्या कापड – चोपड, लग्नाचा बस्ता खरेदीला जोर आला होता. प्रत्येकाने आपापली ठरवलेली काम करायला घेण्यासाठी जुळवा जुळव सुरु केली होती. कार्तिक पौर्णिमे नंतर कांही दिवसांतच तुळशी विवाह संपन्न झाले आणि गाव शांत झाला.
             दौलतरावांनी गावातल्या लोकांची एक सभा घेतली अन् सर्वांच्या कानावर येणाऱ्या संकटा विषयीची हकिकत घातली आणि सावध राहून प्रतिकार करण्याच्या योजने बाबत सांगितले. गाव सावध झाला. जो तो आपापल्या परीने तयारीला लागला. ईकडे नदी पलीकडे पारध्यांची अन् रामोशांची तयारी सुरु झाली. पीक कापणी झालेली पाहून त्यांची काळजी जरा वाढली होती. शेताचा आडोसा आता घेता येणार नव्हता. तरीही ठरल्या प्रमाणे सारं काही करायचंच असं पक्कं झालं. कार्तिक अमावस्या जसजशी जवळ येऊ लागली तशी पारधी रामोशांच्यात अस्वस्थता वाढू लागली. गावातही तालमीतली पोरं गस्त घालत होतीच. शेतांमधे ठराविक अंतरांवर खोपी उभारली होती त्यात प्रत्येक खोपीत दोघं तीघं जण अशी तालमीतली पोरं हत्यारां सहीत मशाली जवळ बाळगून बसत होती. गांवात मंडळांमधली पोरं मोक्याच्या जागांवर लाठ्या काठ्या घेऊन बसत होती अशा प्रकारे पहारा जागता रहात होता. गांव सावध होतं. शेतांच्या हद्दींवर काही मचाणं उभारलेली होती. त्यावर तरुण पोरं रायफली जवळ घेऊन बसत होती.
            कार्तिक अमावस्येची रात्र आली. नेहमी प्रमाणे रात्रीचा पहिला प्रहर संपल्यावर शेतातले आणि गावातले पहारे बदलले. ताज्या दमाची पोरं पहाऱ्यावर बसली. नदी पलीकडे पारध्यांची अन् रामोशांची तयारी सुरु झाली. रामोशांनी निघण्यापूर्वी दारु ढोसली. तिसरा प्रहर सुरु झाला अन् शेतातनं घुबडाचा घुत्कार आसमंतात घुमला. पोरांना आश्चर्य वाटलं. संपूर्ण शेतात कुठं मोठं झाड नाही अन् हे घुबड कुठुन ओरडलं? पोरं सावध झाली. पारधी-रामोशी नदीत उतरले अन् पात्र पार करु लागले. ठरल्या प्रमाणे हरीजन वस्ती कडे उतरुन काही जण शेताच्या दिशेने गेले आणि चौघं रस्त्याने सरळ गावात शिरुन घरांना कड्या लावायची कामं करु लागले. कड्या लावून ते पुढे निघाले कि गावांतली पोरं मागनं हळूच जाऊन कड्या पुन्हा काढून ठेवत. शेतात शिरलेली मंडळी सारं काही आलबेल आहे असं समजून चावडीच्या दिशेने निघाली. खोपीतल्या पोरांनी आणि मचाणांवरच्या लोकांनी चावडी कडे जाणाऱ्या रामोशांवर आणि पारध्यांवर नजर ठेवलेली होतीच. गावांत ज्येष्ठ मंडळींनी मंडळातल्या मुलांच्या साथीने प्रतिकार करायचं ठरलं होतं. गावाची रचना सरळ रेशेत होती. नदी कडेने पहिली फळी म्हणजे शेतांमधे तालमीतली पोरं होती. दुसऱ्या फळीला शेतांच्या हद्दीवर मचाणांवर बसलेली मुलं ही जमिनदार कुटुंबातली होती. तिसऱ्या फळीत गावकरी मंडळी आणि चौथ्या फळीत मंडळाची मुलं अशी एकंदरीत रचना होती. दरोडा घालायला आलेले रामोशी अन् पारधी उदाजी रावांच्या घरा जवळ जाऊन पहारीने आणि टिकावाने दरवाजा उचकटू लागले ईतक्यात राखणीला बसलेल्या मुलांनी ईशारत केली, पलिते पेटवले आणि लाठ्या काठ्या घेऊन रामोशांवर आणि पारध्यांवर चालून गेले. अनपेक्षित झालेल्या हल्लयाने पारधी रामोशी गडबडले पण काही काळातच त्यांनी ही पवित्रा घेतला. सगळे विखुरले गेले. खणाखणी सुरु झाली. मुलांच्या हातात लाठ्या काठ्या आणि पारधी रामोशी कुऱ्हाडी आणि फरशा घेऊन तुंबळ हाणामारी सुरु झाली. ईतक्यात दौलतराव आणि ईतर मंडळी घरातनं रायफलींसह बाहेर आले. आधी हवेत बार काढले तसे पारधी रामोशी भांबावले गावातली मुलं अन् गावकरी जरा मागे सरले. दंगा थोडा ओसरल्यावर पारधी रामोशी हेरुन ठेवलेल्या जागांमधे लपून बसले. प्रतिकार अपेक्षित नव्हता त्यामुळे आता पंचाईत झाली होती. ईतक्यात शेतात आणि मचाणावर राखणीला बसलेली लोकं मदतीला आली. साऱ्यांनी गावाला गराडा घातला फक्त नदी कडे जाणारी वाट तेवढी मोकळी सोडली म्हणजे पारधी रामोशी पळालेच तर नदी मार्गेच पळतील. एक दोघांना गावाकऱ्यांच्या काठ्या लाठ्यांनी चांगलंच सडकून काढलं होतं. पण आता धोका जास्त होता कारण स्वतःचा जीव वाचवायला दरोडेखोर समोर येणाऱ्याला आडवा करायला मागे पुढे पहाणार नव्हते. आता गावकरी मंडळी दरोडेखोरांना हुडकण्याच्या कामाला लागले. सापडेल त्याला जायबंदी करत होते. दरोडेखोरांच्या निसटत्या वारांनी जखमी होत होते. गावकऱ्यांच्या डोळ्यात अंगार पेटला होता. मोहोळावर दगड मारल्यावर मधमाशांनी तुटुन पडावं तसे ते दरोडेखोरांवर अक्षरशः जीवघेणा हल्ला चढवत होते. दौलतरावांनी जिल्हयाला आणि तालुक्याला वर्दी द्यायला माणसं पिटाळून स्वतः संगमावरच्या धर्मशाळेच्या आडोशाला जाऊन थांबले सोबत चार पाच तालमीतली पोरं होतीच. गावांतला गोंधळ तिथपर्यंत ऐकू येत होता. ईतक्यात काही दरोडेखोर नदीच्या दिशेने पळत येताना दिसले. ते जवळ येताच दौलतराव आणि पोरं त्यांच्यावर तुटून पडली. दरोडेखोरांनी पण निकराचा प्रतिकार केला. हाणामारीत पोरं गुंतलेली दौलतरावांना एका बाजूला दोघा रामोशांनी घेरलेलं.  दौलतराव शर्थीने झुंजत होते. खणाखणी जोरात सुरु होती. दौलतरावांच्या दोन्ही हातात तलवरी होत्या आणि वयाच्या साठीत सुद्धा ते विजेच्या चपळाईने समोरच्यांवर वार करत होते. तुंबळ मारामारी सुरु होती. रात्रीचा चौथा प्रहर संपत आला होता उगवतीला सूर्यबिंब दिसू लागलं होतं. दौलतराव थकले होते. गांवात दरोडेखोरांना जेरबंद करण्यात सगळे गुंतलेले. मेलेल्या दरोडेखोरांचे मुडदे एका बाजूस ठेऊन ते झाकले जात होते. ईतक्यात शिद्धा महार ओरडत गावात शिरला नदी कडं चला सरकारास्नी घेरलंय. श्रीपती आणि संभा दोघंही घोड्यावर बसून तडक नदीच्या दिशेने निघाले. ईकडे नदीवर दौलतराव रक्तबंबाळ अवस्थेत झुंजतच होते रक्तस्त्राव जास्त झाल्याने दौलतरावांच्या डोळ्यासमोर अंधारी आली तितक्यात फरशीचा एक घाव त्यांच्या मुंडाशावरु निसटून खांद्यावर बसला दौलतराव जीवाच्या आकांताने कण्हले क्षणभरच त्यांची रामोशावर नजर गेली काळा कभीन्न रामोशी त्यांच्या नजरेला पडल्या पडल्या त्यांनी एक घाव त्या रामोशाच्या नरड्यावरच घातला तो रामोशी पडला. दुसऱ्याने कुऱ्हाड उचलून तो घाव घालणार ईतक्यात श्रीपतीच्या रायफल मधून सुटलेल्या गोळीने त्या रामोशाच्या छातीचा वेध घेतला. अति रक्तस्त्रावाने घायाळ दौलतराव खाली कोसळले. तोवर संभा तिथं पोहोचलाच त्याने ईतरांच्या मदतीने दौलतरावांना घोड्यावर घातलं आणि श्रीपती सोबत गावात घराकडे पाठवून दिलं. गाव ईतर बंदोबस्ताला लगलं ईतक्यात पोलीसांची कुमक गावात पोहोचली त्यांनी गावाचा ताबा घेतला. दौलतरावांना गाडीत घालून सोबत काही मंडळींना घेऊन दौलतरावांची डॉज श्रीपतीसह कोल्हापूरचा रस्ता वाऱ्याच्या वेगानं कापत होती.  सर्वांच्या मनात दुःखाने आणि भितीने काहुर माजलं होतं. सिव्हील हॉस्पीटल मधे गाडी दाखल झाली दौलतरावांना त्वरीत उपचार सुरु केले. काळ काम आणि वेग यांचं गणित सुटणं काही केल्या जमेना उपचारा दरम्यान दौलतरावांची प्राणज्योत मालवली. श्रीपतीनं आबाSSSSSSS म्हणून हंबरडा फोडला. ईतक्यात संभाही तिथं पोहोचला तो ही ओक्साबोक्शी रडू लागला. बातमी वाऱ्यासारखी गावात पसरली. आंबेवाडीवर शोककळा पसरली. गौराक्काचा चुडा फुटला, गावासाठी तिचं कुंकू सांडलं, मणि मंगळसूत्र तुटलं. ओसरीवरचा झोपाळा ओस पडला. ईतकी वर्ष दौलतरावांना दिमाखात डौलाने फिरवणारी त्यांची डॉज गाडी आज विषण्ण मनाने संथ गतीने कोल्हापूराहून दौलतरावांचं कलेवर घेऊन आंबेवाडीचा रस्ता कापत होती. गौराक्कानं दौलतरावांचा तो अचेतन देह पाहून त्यावर स्वतःला झोकून देत टाहो फोडला. आक्रोशाने परीसीमा गाठली. सारं गाव गदमदलं लोकांच्या डोळ्याला अश्रूंच्या अखंड धारा लागल्या. पंचक्रोशीतले लोक गोळा व्हायला लागले गाव शोकाकुल लोकांनी भरुन गेला.  आज गाव पोरकं झालं होतं. अखेरच्या श्वासा पर्यंत गावासाठी झटणारा गावचा धनी गेला होता. संगमावर चिता रचली गेली दौलतरावांना भडाग्नी दिला गेला. श्रीपती आणि संभानं रामोशांची आणि पारध्यांची वस्ती उजाडण्याचा निश्चय दौलतरावांच्या चितेला साक्षी ठेऊन केला. गावकऱ्यांनी साथ करायची ठरवलं आणि तिसऱ्या दिवसाचं कार्य उरकल्यावर गावकऱ्यांनी नदीपलीकडच्या पारध्यांची आणि रामोशांची वस्ती पेटवून दिली. आगीचे लोळ उठले पालं धडा धडा पेटली. पारध्यांची आणि रामोशांची कुटुंब हाताला लागेल ते घेऊन राधानगरीच्या दिशेने पळत सुटली. दिसेल ते उध्वस्त करुन गावकरी शांत झाले. दौलतरावांचे सर्व विधी यथासांग पार पडले. गावकऱ्यांनी चावडीत शोकसभा भरवली अन् नंतर गावाचे नित्याचे व्यवहार सुरु झाले. गावकीची कामं हळू हळू संभाकडे येऊ लागली. गावकी कडून हळू हळू अजाणतेपणी का होईना पण भावकीचं बीज पेरलं जात होतं.
समाप्त.
पुष्कराज चव्हाण
२२/०६/२०१७

Comments

Popular posts from this blog

देव आनंद

भक्ती