कोरानाच्या निमित्ताने
कोरोनाच्या निमित्ताने
आज अचानक माझा वर्गमित्र संतोष रांगणेकर कडून आम्हा काही जणांना आपण झूम ऍपवर मिटिंग करायची का म्हणून विचारणा झाली आणि आम्ही आठ दहा जण ऍप डाऊनलोड करुन एकमेकांना भेटलो आणि तासभर मस्त गप्पा मारल्या आणि हसलो खिदळलो. एकतर आम्हाला प्रत्यक्ष भेटून बरेच दिवस झाले होते आणि गेले १२-१५ दिवस आम्ही सारेच मोकळे घरात सक्तीने बसलेलो होतो त्यात ही भेट खरोखर ताजे तवाने करणारी ठरली आणि अखेरीस बरं वाटलं, खूप दिवसांनी भेटलो, खूप दिवसांनी हसलो मजा आली आता परत असंच भेटूया असं म्हणत एकमेकांचा निरोप घेतला. दरम्यान गप्पांमधे संतोषने सर्वांना विचारलं की सध्यस्थिती विषयी तुमची मतं काय आहेत ती मांडा. त्यात मला रश्मीचं एक वाक्य लक्षात राहीलं की निसर्गाने मानवाला दाखवून दिलंय की तुम्ही कितीही उड्या मारा, प्रगती करा पण शेवटी तुमचा जन्म आणि मृत्यू हे माझ्याच हातात आहे.
खरंच, चीन मधून कोरोना या जीवघेण्या विषाणूचा प्रसार जगभरात झाला आणि हाहाःकार माजला. जगभरात महामारी सुरु झाली आणि सगळ्यांचं धाबं दणाणलं. भल्या भल्या देशांची भंबेरी उडाली, पांचावर धारण बसली. शेकडोंनी आणि हजारांनी माणसं पटापट मरायला लागली आणि यावर उपाय काही सापडेना. माणसानं चंद्र-मंगळाला गवसणी घातली, संहारक अस्त्र शस्त्र शोधून काढली. माणसा माणसातलं अंतर कमी केलं तसंच वाढवलं देखील, वेगवान वाहनं बनवली, पृथ्वी कमी पडली की काय? म्हणून परग्रहांवर वस्ती करण्याच्या वल्गना करु लागला, वैद्यक शास्त्रात प्रगती करुन माणसाचं वयोमान वाढवलं सारं काही आलबेल सुरु होतं. माणूस आपल्यातच मश्गूल होता. त्याचा प्रगतीच्या अश्वमेधाचा घोडा चौफेर उधळत होता त्याला गवसणी घालणार तरी कोण? अशी अवस्था असतानाच कोरोना आला. माणसाच्या विजीगिषु वृत्तीचा परिणाम व्हायचा तोच झाला. सारं काही असताना आणखी मिळवण्याच्या हव्यासाचाच तो परिणाम होता. अस्त्र शस्त्र, संहारक स्फोटकं, रासायनिक शस्त्र आणि त्यानंतर जैविक युद्ध लढून जगावर सत्ता गाजवण्याच्या हव्यासापायी बनवलेला विषाणू बाहेर पडला आणि आधी चीनच्या नागरिकांचा बळी घेऊन तो पुढे जगभरात पसरला आणि गती, प्रगती, ताकद, ईर्षा यांचं जे वेड मानवाला लागलं होतं ते अचानक थांबलं. आज ऑफिसमध्ये गेलंच पाहिजे असं म्हणणाऱ्यांना महिनाभर घरातच कोंडून घ्यावं लागलं रस्ते ओस पडले, शहरं ओस पडली. गजबजलेलं, धावपळ करणारं शहर मरणकळा लागल्यागत ओकं बोकं दिसायला लागलं. सगुण असो वा निर्गुण असो त्या अदृश्य,अज्ञात शक्तीने आपलं अस्तित्व आहे हे दाखवून दिलं. मानव जातीला एक असा झटका दिला की माणसाला जाणीव झाली की आहे, एक अशी शक्ती आहे जी सर्वांवर लक्ष ठेऊन आहे. आपण कितीही गमजा मारल्या मस्तवालपणा केला तरीही एक अशी शक्ती अस्तित्वात आहे की जिच्या हातात अवघ्या जगाची सूत्र आहेत. मग त्याला तुम्ही निसर्ग म्हणा, ईश्वर म्हणा किंवा आणखी काही नाव द्या पण अंतिम निर्णय त्याचाच असतो. त्याच्या मर्जी शिवाय झाडाचं पान हलणंच नव्हे तर तुमचा आमचा श्वासोच्छ्वास सुद्धा होणं अशक्य आहे याचा दृष्टांत झाला. आता यातून माणूस काय धडा घेतो ते पाहू. आंतिमतः हेच सत्य आहे की,*” हम सब ईस रंगमंच की कठपुतलीया है जिसकी डोर उपरवाले के हाथमे है. कौन, कब, कैसे उठेगा ये किसीको नही पता.”*
© पुष्कराज चव्हाण
दि. ०८-०४-२०२०
Comments
Post a Comment