युरोप डायरी

 युरोप डायरी.


केल्याने देशाटन या लोकोक्ती नुसार माणसाचं जीवन प्रवाही आणि विकसित बनवायचं असेल तर त्याने प्रवास करत रहायला हवं. आता प्रवास म्हणजे पर्यटन आणि ते ही देशाबाहेर म्हणजे देशाटन ही आले असा अर्थ काढून आम्ही उभयतांनी युरोपमधील काही देशांत जाऊन यायचं ठरवलं आणि चाचपणी सुरु केली. युरोपात जाण्या मागचं कारण म्हणजे ईथली निसर्गसृष्टी सुंदर आहे. अमेरिकेत बहुतांश शहरी जीवन पहायला मिळतं जे आपण रोजच जगतो. शिवायक्षतिथला व्हिसा घ्यायला जानेवारी २०२५ ची तारीख मिळत होती म्हणून म्हंटलं युरोपात जाऊ.

सर्व प्रथम मी एका मराठी समाजात लोकप्रिय असलेल्या यात्रा कंपनीत गेलो आणि तिथून खर्चाची माहिती करुन घेतली आणि म्हंटलं एक दोन दिवसांत सांगतो. हो, कारण घरी येऊन सौभाग्यवतींची संमती घेणं अनिवार्य होतं. गेली ३३ वर्ष मला वेव्हार ज्ञान म्हणून नाही हे ऐकत आलो असल्याने माझ्या संस्कारक्षम मनावर बायकोची मंजूरी ही प्रत्येक कामात आवश्यक असते असे संस्कार झालेले असल्याने मी तिला विचारल्याशिवाय कोणताही निर्णय घेत नाही.परंतु आंतरराष्ट्रीय स्तरावर याची कल्पना नसल्याने त्यांनी दरम्यानच्या काळात चलनाचा दर वाढवल्याने पर्यटन पर्यायाने देशाटनाचा खर्च वाढला.मी पुन्हा त्या यात्रा कंपनीत गेलो तेव्हा मला जी वागणूक मिळाली ती ईथे सांगण्यासारखे नाही. बरं, घरी आल्यावर मिळालेली वागणूक काही वेगळी नव्हती त्यामुळे हेलपाट्यांनी त्रासलेल्या माझी अवस्था धोबी का कुत्ता सारखी झाली. मास्तरांनी अनेक वेळा गणित समजावून सांगितल्यावर ज्या सुरात ते बोलतात त्या सुरात सौभागवतींनी म्हंटलं अरे, तेव्हाच नाही का बुकिंग करुन टाकायचंस? ईतकं कसं समजत नाही म्हणते मी? 

दोन दिवसांची विश्रांती घेऊन अस्मादिक पुन्हा निघाले आणि एस् ओ टी सी च्या कचेरीत शिरले. आत शिरताच थंडगार वाटलं एक षोडष वर्षीय कन्या सुहास्य वदनाने सामोरी आली. (आधीच्या यात्रा कंपनीत जसं, काय कटकट आहे असं बघितलं गेलं तसं ईथे नाही झालं.) काम सांगितल्यावर लगेच तिने व्यवस्थापकांची भेट घालून दिली. ईथे मात्र जलपान, चहापानाने सुरुवात झाली. व्यवस्थापकांनी सारं काही समजावून सांगितल्यावर लागलीच धनादेश त्यांच्या हाती सुपूर्द करुन आरक्षण करुन मोकळा झालो.

देशाटनाला निघण्याची तारीख तीन महिन्यांनंतरची होती त्यामुळे तयारी करण्यासाठी पुरेसा अवधी होता. मी माझी खरेदी ऑन लाईन केली आणि त्यात कपडे मोठ्या मापाचे निघाले. झालं, मुलींसकट सौभाग्यवतींनी गाढव धुतल्यागत यथेच्छ धुलाई केली यथावकाश ऑनलाईन मागवलेले कपडे बदलून घेतले. ईतकं झाल्यावर आम्ही सपत्नीक ईतर खरेदीला निघालो तिथे बरेचसे काम आटोपले आणि बॅगा भरुन आम्ही निघण्यास सज्ज झालो. ५ सप्टेंबर ही तारीख मुक्रर झाली होती प्रवासाला निघण्याच्या अगदी आदल्या दिवसा पर्यंत बॉर्डरलेस मल्टी करन्सी प्रीपेड कार्ड हाती येऊन पडले.

विमानतळावर पोचवायला जावई बापू, कन्या आणि आमचा नातू आले होते. अंधेरीच्या त्या आंतरराष्ट्रीय विमानतळाची अंतर्गत सजावट फार सुंदर केलेली असून सर्व सोयींनी सुसज्ज असा तो विमानतळ आहे. सकाळी लवकर निघाल्याने काही खाल्लं नव्हतं म्हणून तिथेच न्याहारी केली आणि बिल पाहिल्यावर डोळे विस्फारलेच. केवळ सँडविचचं आणि कॉफीचं बिल होतं ते. पाण्याच्या बाटली चे रुपये ७० वेगळे. पुढे युरोपात पाणी घेण्याचे पैसे लागले नाहीत पण ते सोडण्याचे मात्र एक ते तीन युरो किंवा स्विसफ्रँक लागतायत हे समजल्यावर गड्या आपुला गाव बरा असं वाटू लागलं. ( युरोपात नळाचं पाणी थेट पितात फिल्टर वगैरे काहीही नसतं हे विशेष.) असो, तर आता या असल्या धक्क्यांची सवय होणं हे अनिवार्य होते. आम्ही एमिरेट्स च्या विमानाने जाणार होतो त्यामुळे दुबई मधे थांबून एमिरेट्सच्याच दुसऱ्या विमानाने पॅरिस येथे चार्ल्स द गॉल या विमानतळावर पोहोचलो. मुंबई च्या विमानथळाच्या तुलनेत हा विमानतळ अगदीच यथातथा असा वाटला. सामान वगैरे गोळा करुन बाहेर आलो तर यात्रा कंपनीचा माणूस घ्यायला आलेला तो भेटला यापूर्वी दुबई विमातळावर जयपूर येथून आलेल्या अरोरा पति पत्नीची भेट झालेली होती ते ही सोबत होतेच. आम्हाला घ्यायला आलेल्या काळ्या चकचकीत फोक्स वॅगन व्हॅनमधे आम्ही बसलो त्यावेळी गोऱ्या माणसाला आपली ओझी उचलताना पाहून अहंकार सुखावला. गाडी फार सुंदर होती गाडीने त्या रात्रीच्या वेळी शांत असलेल्या वातावरणात वेग पकडला आणि आम्ही सीटमधे आणखीनच रुतुन बसलो. विमानतळ ते हॉटेल पर्यंत कुणीच काही बोललं नाही. चार्लस द गॉल विभागातील झेनिट्यूड हॉटेलमधे आम्ही पोचलो खोलीच्या चाव्या (कार्ड) घेतल्या आणि सामान उचलून आम्ही आमच्या खोली कडे निघालो तेव्हा समजलं आपण दुसऱ्यावर किती भार टाकतो ते. ( ईथे बेल बॉय वगैरे कुणीही नसतं. आपलं सामान आपणच उचलायचं) खोलीत गेल्यानंतर गरम पाण्याचा शॉवर घेऊन कपडे बदलून आम्ही जेवायला बाहेर पडलो विशेष म्हणजे ईथे युरोप मधे आम्ही जितके दिवस होतो तितके दिवस दोन्ही वेळेचं जेवण हे भारतीय पद्धतीचं होतं. एस् ओ टी सी आणि थॉमस कुक यांचं या बाबतीत कौतुक वाटलं. खोलीत येऊन आम्ही निद्राधीन झालो. दिवसभर खूप दगदग झाल्याने प्रचंड थकवा आला होता.


पहाटे पाच वाजताच जाग आली. खोलीतच चहा बनवण्यासाठी वीजेवर चालणारी किटली होती चहा वगैरे घेऊन स्नानादी कर्मे उरकून  आम्ही न्याहारी करण्यासाठी खाली उतरलो ब्रेकफास्ट मधे उकडलेली अंडी, सलामी, सॉसेजेस, बेकन, कॉर्नफ्लेक्स, ग्रीनसलाड, फळं, फळाचा रस, कॉफी, गरम दूध, थंड दूध, चीज, ब्रेड, बटर ईत्यादी सर्व होतं. अगदी पोटभर न्याहारी करून आम्ही साडे आठ वाजता बसने शहर हिंडायला निघालो. रस्त्याने बस मधून जाताना. एक गोष्ट माझ्या लक्षात आली ती म्हणजे युरोपमधील रस्त्यांवर कठेही भटकी कुत्री, कावळे ,गाई-म्हशी अशी जनावरे दिसली नाहीत.

पॅरिस हे शहर फ्रान्सची राजधानी एकूण क्षेत्रफळ १०५ स्कवेअर किमी आणि संख्या साडे एकवीस लाख. फॅशनचीही राजधानी असलेलं हे शहर आंदोलनं आणि क्रांतीकारी लोकांचं शहर म्हणूनही ओळखलं जातं. अशी विविध पार्शवभूमी लाभलेलं शहर म्हणून मनात कुतुहल आणि उत्सुकता दाटलेली होती. गंमत अशी की ईथले लोक लिहितात एक आणि ते उच्चारतात एक, शेवटचं अक्षर उच्चारतघ नाहीत पॅरिसचं पारी करतात. बरं, सोळावा लुई आणि नेपोलीयन बोनापार्ट यांच्या देशाची ही राजधानी आणि आम्ही थेट या राजधानीच्या क्रांती स्थळी दाखल झालो होतो. कॉन्कॉर्ड स्क्वेअर मधे आम्ही आलो होतो याच ठिकाणाहून आंदोलकांनी, क्रांतीकारकांनी सोळाव्या लुईची राजेशाही बदलून फ्रान्स मधे लोकशाही आणली होती साल होत १७८९ हे सगळं डोळ्यासमोर ऊभं राहिलं आणि अंगावर रोमांच उभं राहिलं. आपल्याला जर संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळी बद्दल सांगून शिवाजी पार्क किंवा हुतात्मा चौकात उभं केलं तर कसं होईल? तसं झालं. मनात कोलाहल माजला होता सोळावा लुई, मेरी अँटोनेट तिला दोषींवर ठरवून तिला जिलोटीन केलेलं. हे सारं कसं झालं असेल हे झर्रकन् डोळ्यासमोरुन गेलं आज त्याच ठिकाणी आपण उभे आहोत हे मनात आलं आणि अंगावर सर्रकन काटा उभा राहिला. तितक्यात आर्क ऑफ ट्रायम्फ आला. फ्रान्सच्या विविध क्रांत्यांमधे आणि युद्धात ज्यांनी आपलं बलिदान दिलं त्या क्रांतीकारकांची आणि युद्धात कामी आलेल्या सेनापतींची नावं त्यांच्या सन्मानार्थ ईथल्या भिंतीवर कोरलेली आहेत. त्यांच्या सन्मनार्थ हे उभं केलंय, ईथल्या तिजोरी खाली एका अनाम वीराची कबर आहे. फॅशनच्या राजधानीत हे सारं ऐकून खरंच त्या फॅशन मागे केवढी उलथा पालथ दडलीय याचं आणखीनच गूढ वाटायला लागतं. ईथे वाईल्ड चेस्टनटची काही झाडं रस्त्याच्या दुतर्फा आहेत तर काही एकाच ठिकाणी उभ्या आडव्या रांगेत परंतु दाटीवाटीने उभी आहेत. तेवढ्या भागात सावली असल्याने आणि शांतता असल्याने गूढ वातावरण वाटते. त्या शेजारीच प्रशस्त हिरवळ आहे त्या हिरवळीवरुन अलेक्झांडर ब्रीज आणि सेंट लुईस चर्च चा १८ कॅरेट सोन्याने मढवलेला घुमट दिसतो तो मुलामा देण्याकरता काही हजार टन सोनं लागलं. शहरातले काही पुतळे असेच १८ कॅरेट सोन्याचा मुलामा दिलेले आढळतात. किती वैभवशाली देश आहे पहा. ईथल्र्या ईमारती जितक्या समान ऊंचीच्या, भव्य आणि दिमाखदार तितकीच ईथली व्यक्तीमत्वही भव्य दिव्य अशीच आहेत. ईमारतींबाबत बोलायचं झाल्यास एकसारख्या ऊंचीच्या या ईमारती आहेत. आपल्या मुंबईतील बॅलार्ड पियर भागातल्या ईमारतीं सारख्या. त्यांचं दगडी बांधकाम एकाच रंगाच्या दगडाचं असून त्यांना रंग लावण्याची परवानगी नाही ईतकंच काय पण खिडक्या रंगवण्याचीही परवानगी नाही. काही ठिकाणी आम्ही ईमारतींच्यावर दगडी पाटीचा दगड कौलां साठी वापरलेला पाहिला. अतिथंडी पासून बचाव करण्यासाठी ते असावं असं वाटतं. कारण आपल्या हिमाचल प्रदेशातही अशीच कौलं आढळतात. बरं ईथली सामान्य माणसं किंवा असामान्य माणसं फिटनेस बाबत आणि मानवी हक्कांबाबत अतिशय जागरुक आणि पराकोटीची संवेदनशील आहेत. मध्यंतरी फ्रान्स सरकारने निवृत्तीचं वय ६२ वरुन ६४ केलं तर केवढा गदारोळ झाला ते पाहिलंत ना? ईथे सूटाबुटातला माणूस ही सायकलवरुन ऑफिसला जातो, बायका, मुलं सगळे फिटनेस साठी सायकलवरुन फिरतात. त्यांचा फिटनेस पाहिला की स्वतःचीच लाज वाटते असो, तर मग पुढे आम्ही भोजन नावाच्या रेस्टॉरंटमध्ये भारतीय पद्धतीचं जेवण घेतलं. जेवण साधंच पण अतिशय रुचकर होतं. हे झाल्यावर आम्ही फ्रॅगोनार्ड नावाच्या परफ्यूम बनवणाऱ्या कंपनीच्या प्रदर्शनस्थळी गेलो परफ्यूम चे प्रकार आणि किंमती ऐकून आणि पाहून डोळे विस्फारलेच. १२० मि.ली. परफ्युम च्या एका बाटलीची किंमत सहा हजार रुपयांच्या पुढे होती.


गंध आणि उच्च राहणीमानाच्या आकडेमोडीत अडकलेल्या अवस्थेत असतानाच, हे झाल्यावर आम्ही पुढे आयफेल टॉवर पहायला गेलो. १७८९ च्या फ्रेंच राज्यक्रांतीला शंभर वर्ष पूर्ण झाल्या प्रीत्यर्थ गुस्ताव आयफेल याने हा टॉवर १८८९ साली बांधला. दहाहजार टन लोखंड वापरुन तयार केलेल्या या टॉवरच्या अगदी शेवटच्या टोकापर्यंतची ऊंची ३३० मीटर आहे. पहिला मजला ५७ मीटर आणि दुसरा मजला ११७ मीटरवर आहे आणि या दुसऱ्या मजल्यावरून संपूर्ण शहर दिसते. याला एकूण आठ लीफ्ट्स आहेत असं ऐकलं. ईतकंच नाही पण दर तीन वर्षांनी याला रंग दिला जातो त्यासाठी एकूण साठ टन रंग वापरतात. आता हा टॉवर मुख्यत्वे टेहळणी आणि दळणवळणासाठी वापरला जातो. हे पाहून होता होता संध्याकाळचे पाच वाजले मग आम्ही सेन (Seine) नदीच्या पात्रात बोटीने फिरुन आलो. परत आलो तेव्हा दिवेलागणीची वेळ झालेली होती आणि या दिव्यांच्या रोषणाईत आयफेल टॉवर अत्यंत विलोभनीय दिसत होता. मला ते An Evening in Paris सिनेमातलं शम्मीकपूर आणि शर्मिला टैगोरवर चित्रित केलेलं गाणं आठवलं पुढे आम्ही हॉटेलवर जाताना मी गाणं गुणगुणत होतो रात के हमसफर थक के घर को चले फिर उठी………… हवेत छानसा गारवा होता पॅरिसच ते तिथे हवेत जशी क्रांती पसरलीय तसंच त्या वातावरणात प्रेम  ही पसरलेलं आहे. मग काय मद्याचा चषक हातात आणि बायको कवेत असं वाटतं तुम्हाला? छेः, तेहतीस वर्ष झालीत लग्नाला फ्रान्स मधे पॅरिस सारख्या शहरात छलकाये जाम अवस्थेतही बायकोने आठवण करुन दिली की चरी गेल्यावर एल आय सी च्या प्रिमियम चा चेक द्यायचाय हे लक्षात असू दे . झालं ग्लास मधलं ते सोनेरी द्रव्य क्षणार्धात अंतर्धान पावलं. ती एल आय सी विसरायला पुढे दोन पेग आणखीन लावावे लागले. तुम्हाला सांगतो……… जाऊ दे बायकोही हे वाचणाराय आयला नसती आफत यायची. असो तो दिवस संपला. दुसरा दिवस डिस्नेलँडला जाण्याचा होता. चक्क दांडी मारली आणि झोप काढली मस्त पैकी. बायकोने बॅग्ज भरुन ठेवल्या कारण त्याच्या नंतरच्या दिवशी स्वित्झर्लंड ला जायचं होतं त्यामुळे आवरा आवर करणं भाग होतं. सर्व मंडळी संध्याकाळी थकून भागून आली. आणि आपापल्या खोल्यांमध्ये गायब झाली.

सकाळीच ब्रेकफास्ट होऊन आम्ही स्वित्झर्लंडला निघालो आणि ल्युसर्न पासून चाळीस किमी अंतरावर हॉटेल कोरोनाडो येथे पोहोचलो. रात्री जेवणं करुन आपापल्या खोलीत निजायला गेलो. सकाळी लवकर माऊंट टिटलीस ईथे जायचं होतं तिथे केबल कारने त्या पर्वताच्या शिखरावर जायचं होतं. फार सुंदर निसर्ग रम्य असं ठिकाण आहे हे.स्वित्झर्लंडला जाताना दूरवर पसरलेली हिरवळ दिसते जणू काही कुणीतरी त्या गवतावरुन मशीन फिरवून त्याची एकसारखी छटाई केलीय. हायवेवर जितकी म्हणून गावं किंवा वस्त्या पाहिल्या त्यात कुठेही माणसं फिताना दिसली नाहीत अगदी युरोप मधील मोठ मोठ्या कपन्यांच्या आवारातही नाही.  खूपच आश्चर्य जनक बाब वाटली. युरोपात म्हणे कुठेही लंच अवर फिक्स नाही ज्याला जितका वाटेल तितका त्याने लंच ब्रेक घ्यावा आणि पुन्हा काम सुरु करावं पण त्याचं काम त्याने ऑफिसची वेळ संपेपर्यंत पूर्ण केलंच पाहिजे. दुसऱ्या दिवशी Jungfraujoch हुंगफ्राव या युरोपातील सर्वोच्च ठिकाणी ३४५४ मीटर ऊंचीवर असलेल्या रेल्वे स्टेशनला भेट देण्यासाठी जाणार होतो. तिथे ऑक्सीजन लेव्हल वगैरेची भानगड असल्याने आणि आपल्याला काही तिथून रोज कामावर जाण्यासाठी ट्रेन पकडायची नसल्याने आम्ही तिथे जायचं नाही असं ठरवलं त्या ऐवजी मी आणि सौभाग्यवती आम्ही हॉटेलला लागूनच असलेल्या स्टेशन वरुन बिनधास्त ट्राम पकडून झुरिक येथे जायचं ठरवलं. एका मुलीच्या मदतीने आम्ही तिथल्या मशीन मधून तिकिटं काढली मुलगी ईतकी लबाड निघाली की तिने स्वतःचं तिकीटही आमच्याच खर्चात काढून घेतलं हे आम्हाला नंतर समजलं. तुम्ही युरोपमध्ये फिराल तेव्हा अशा गोष्टीं बाबत खूप सावधगिरी बाळगा. तिथे सामानही चोरीला जातं. तुमचं लक्ष दुसरीकडे वेधून तुमचं सामान कधी चोरतील याचा नेम नसतो त्यामुळे सावध रहायलाच हवं. तर सांगत काय होतो? हं १० नंबरची ट्राम पकडून आम्ही निघालो. त्या सुंदर शहरातनं वळणं घेत छान छान ईमारती पहात आम्ही झुरिक येथे पोहोचलो. या शहरात झुरिक स्टेशन समोरुन जो रस्ता जातो त्या रस्त्यावर मोठ मोठी दुकानं आहेत रस्त्यावर दोन ईमारतींच्या मधल्या जागेत रेस्टॉरंट्स ने टेबल खुर्च्या मांडलेली होती आणि लोक तिथे बसून येणाऱ्या जाणाऱ्यांकडे बघत कॉफी आणि ईतर पदार्थ चवीने खात होते. आपल्या लिकिंग रोडवर असतं तसं वातावरण होतं. आम्ही एक दोन दुकानात खरेदीचा प्रयत्न केला पण हिंमत झाली नाही. मुलींनी पर्स आणायला सांगितल्या म्हणून एका मॉल मधे शिरलो तर पर्सच्या किंमती ६००० ते ७००० स्विस फ्रँक्स ने सुरु होतात असं अत्यंत अदबशीरपणे सांगितलं, वर आणि तुमच्या कोणत्या किंमतीच्या पर्सेस दाखवू? असं आणि वर विचारलं. किंमती ऐकून आम्ही लाजलो नाही ईतकं त्या अदबशीर पणाला आम्ही लाजलो. आमच्या पुण्यात गिर्हाईक पाहूनच त्याची ऐपत ओळखण्या ईतपत सराईत दुकानदार आहेत आणि अश्या गिर्हाईकाला ते त्याच्या ऐपती प्रमाणे वागवतात हे तिथल्या त्या सुटाबूटातल्या स्विस सेल्समनला माहिती नसावं कदाचित. मनातल्या मनात ७००० × ९३ करत आम्ही परत निघालो आणि फॉरेक्स कार्ड चालत नाही म्हणून येताना उबर करुन आलो जाताना ट्रामचं तिकीट ४.४० फ्रँक्स होतं येताना टॅक्सी साठी २२ फ्रँक्स मोजावे लागले रुपये म्हणाल तर उबरने मुंबईहून पुण्याला गेलो तर जेवढे लागतील तेवढे झाले..

दुसऱ्या दिवशी  आम्ही ल्युसर्न ला गेलो आणि केबल कारने ३०२० मीटर ऊंचीवर असलेल्या माऊंट टिटलीसच्या शिखरावर जायला निघालो. वर एका टप्प्यावर पोचल्यावर तिथून पुढे स्वतःभोवती गोल फिरणाऱ्या केबल कार मधून आम्ही शेवटच्या टप्प्याकडे निघालो. वर पोचल्यावर सभोवतालचा नजारा पाहून मन प्रसन्न झालं रेस्टॉरंटमध्ये गरम गरम कॉफी घेऊन तिथे असलेल्या शॉपमध्ये थोडी चॉकलेट्स घेऊन आम्ही  परतीच्या प्रवासाला निघालो. दुपारचं जेवण घेतल्यानंतर आम्ही ल्युसर्न शहर पहायला निघालो.  ल्युसर्न शहरात प्रचंड मोठ्या दगडात एक शिल्प कोरलेलं आहे. त्याला लायन मॉन्युमेंट म्हणतात. हे शिल्प बर्टेल थॉरवाल्डसेन या शिल्पकाराने कोरलेले असून १७९२ साली कत्तल झालेल्या ८६० स्वीस गार्डस् च्या स्मरणार्थ कोरलेलं आहे. राणीच्या महालात क्रांती कारक शिरल्यावर त्यांना प्रतिकार करण्यासाठी हे गार्ड तयार झाले असताना राजा आणि राणीने त्यांना शस्त्र खाली ठेवण्याची आज्ञा दिली आणि क्रांतीकारकांकडून त्यांची कत्तल झाली. त्यांच्या स्मरणार्थ हे शिल्प साकारण्यात आले.  या मॉन्युमेंटला वर्षाकाठी १४ लाख पर्यटक भेट देतात.  ईथुन पुढे आम्ही ल्युसर्न शहरातील कासा ग्रांड या स्टोअर मधे खरेदी करायला गेलो तिथली souvenir पाहून कुणाचं ही मन हरखून जाईल. सौभाग्यवतींच्या आनंदाला पारावार उरला नाही. पटापट स्टोअरचे  तीनही मजले आक्रमून झाले आता चौथं पाऊल कुठे ठेऊ या वामनावताराच्या आवेशात असलेल्या सौभाग्यवतींना आवरता आवरता आमची भंबेरीच उडाली, शेवटी एकदाचं बील भरुन आम्ही बाहेरच्या बाकड्यावर येऊन स्टोअरकडे पाठ करुन बसलो. हे सारं काही झाल्यावर आम्ही परत हॉटेलवर आलो.

दुसऱ्या दिवशी ईटलीला जाण्यासाठी निघायचं होतं तिथे रोम फिरल्यावर व्हॅटिकन सिटीला जायचं होतं. ठरल्याप्रमाणे आम्ही ल्युसर्नहून बसने ईटलीला जाण्यासाठी निघालो. आणि कोमो येथे आलो. कोमो हा ईटलीतल्या लोम्बार्डी प्रदेशाच्या उत्तरेकडे असणारा प्रांत (Province)  या कोमो शहरात कोमो नावाचाच एक विस्तीर्ण असा तलाव आहे ज्याचं क्षेत्रफळ १४६ स्क्वे.कि.मी. असून खोली १५४ मीटर आहे. या तलावाचं पाणलोट क्षेत्र हे ४६०० किमी ईतकं असून अतिशय रम्य असं ईथलं वातावरण आहे. सर्वांचं ईथे फोटोशूट झालं ईतक्यात तलावात एक हंस पक्ष्यांची जोडी अवतरली नल-दमयंती जोडीच्या या मदतनीसाच्या देखण्या रुपावर कोण भाळणार नाही सांगा पाहू? त्या हंस पक्ष्याचा फोटो काढण्याचा मोह आवरता आला नाही. आयुष्यात हंस कधी प्रत्यक्षात पाहिला नव्हता तो पाहिला त्याला कॅमेराबद्ध केला. आणि आम्ही पुढे निघालो आता रोम शहराचे वेध लागले होते. एकूणच साऱ्या युरोपवर ग्रीक आणि रोमन संस्कृती ची छाप पडली आहे असं वाटलं. रोम मधे आम्ही फिरलो आणि तिथल्या ईमारती पाहिल्या आणि पॅरिस वगैरे ठिकाणची वास्तूशैली पाहिली तेव्हा हा प्रश्न मनात आला त्याचं  तिथल्या अनुभवी महिला गाईडने हो असं सांगून निराकरण केलं.


रोमच्या मध्यवर्ती भागात उभे असलेले भग्नावस्थेतले फ्लेवियन कोलोसियम पाहिले आणि शालेय जीवनातील ईतिहासाच्या पुस्तकातले त्याचे चित्र आठवले. ही ईमारत आपण प्रत्क्षात पहात आहोत यावर विश्वासच बसत नव्हता. प्रत्यक्षात आणि जवळून पाहिल्यावर याच्या भव्यतेची कल्पना आली. एकूण ५०००० ते ८०००० प्रेक्षक क्षमता असलेले हे अँफिथिएटर जगातलं सर्वात मोठं अँफिथिएटर आहे. फ्लेवियन राजवंशातल्या तीन सम्राटांनी याचं रक्षण केलं असल्याने त्याचं नाव फ्लेवियन अँफिथिएटर असं झालं. यामधे माणसामाणसांतली हिंस्त्र लढती, माणूस आणि श्वापदांमधल्या लढती, ते युद्धाचे डावपेच, प्रशिक्षण ते नाट्याविष्कारा पर्यंत सर्व कलांचे प्रदर्शन होत असे ईतकं भव्य आणि ऐतिहासिक शिल्प पाहून आणि त्याविषयीची माहिती ऐकून थक्क व्हायला झाले. ईथून पुढे जगातील आणखीन एका आश्चर्या कडे जायचं होतं. पिसा येधील कलता मनोरा पहायला.


हा संगमरवरी दगडाचा बांधलेला मनोरा बांधून पूर्ण व्हायला दोन शतकांचा कालावधी लागला. संगमरवरी दगडात फार संदर असं नक्षीकाम यावर आहे. एकूण आठ मजले असलेल्या या मनोऱ्यात सप्त सुरांच्या सात घंटा प्रत्येक मजल्यावर एक अशा बांधलेल्या आहेत. गॅलेलियोने आपला गुरुत्वाकर्षणा बाबतचा शोध सिद्ध करण्या करता याच मनोऱ्याचा वापर केला होता. वस्तूच्या जडपणाचा त्याच्या जमिनीवर येण्याविषयीचा तो शोध होता ईथून जवळच असलेल्या कॅथेड्रल मधील झुंबरांच्या हेलकाव्यांवरुन त्याला पेंडुलमची कल्पना सुचली असं म्हणतात. असो, पण परिसर फार सुंदर आणि गारव्याने भारलेला असा  आहे. आजूबाजूला अशीच मोठ मोठी प्राचीन विटकरी रंगांची बांधकामं आहेत आणि ती जतन करुन वापरात आणलेली आहेत.

संध्याकाळी आम्ही अरिझो भागातील हॉटेल पार्क येथे मुक्कामा करता गेलो. दुसऱ्या दिवशी व्हॅटिकनसिटी आणि ईतर भाग पहाण्यासाठी जायचं होतं. व्हॅटिकनसिटी पहाण्यात मला विशेष रस नव्हता तिथे पाहून पाहून पहायचं काय? तर पोप. आम्ही आमचे भोपे नाही पहात तर पोपना काय पहाणार? त्यामुळे मी न जाता सौभाग्यवतींना पाठवलं. ती जाऊन आली आणि आल्यावर म्हणाली बघ, सगळे आले होते एकटा तूच आला नाहीस. म्हंटलं अगं पाहिलंस काय तर म्हणाली काही नाही पोप आले आणि मदर मेरीच्या मूर्ती पर्यंत गेले ते आमच्या जवळून पुढे गेले आम्ही नमस्कार करुन परत फिरलो. पण चर्च मात्र अप्रतिम आहे खरंच बघण्यासारखं आहे

हे झाल्यावर दुसऱ्या दिवशी आम्ही व्हेनीस शहराला भेट देणार होतो.


तुम्ही कधी ईटलीला जेव्हा भेट द्याल तेव्हा व्हेनीसला नक्कीच जा. ईटलीच्या उत्तरे कडील भागाची राजधानी असलेलं हे शहर एकूण ११७ बेटांनी मिळून बनलेलं आहे. या बेटावर रस्ते नसून कालवे आहेत आणि या कालव्यांतून छोट्या बोटींनी प्रवास करायचा असतो यांनाच गंडोला म्हणतात. ईथे सेंट मार्क्स स्क्वेअर असलेला चौकोनीभाग शहराच्या मध्यभागी आहे. तोच ईथल्या राजकीय, सामाजिक, धार्मिक घटनांचा साक्षीदार आहे ईथे बसिलीका कॅथेड्रल आहे आणि डॉजेस पॅलेस ही आहे. हा भाग विविध देशातल्या पर्यटकांनी सदैव गजबजलेला असतो. बरेच विक्रेते दुकान थाटून बसलेले असतात तसंच रेस्टॉरंट ची टेबल्स ही ईथल्या मोकळ्या जागेत मांडलेली असतात सोबत मधुर संगीताची साथ बँड देतच असतो. त्या हवेशीर जागेत संगीताच्या साथीने आणि समुद्राच्या साक्षीने एखादं ड्रिंक घ्यायला फार छान वाटतं. एकेकाळी हूण आक्रमकांच्या भीतीने आश्रयाला आलेल्या नागरिकांनी हे शहर उभं केलं. नंतर या शहराच्या आरमाराचा संपूर्ण युरोपात दबदबा होता. आता तिथे आरमार नाही. ईथल्या गंडोलाची राईड करुन पहायला हवी. Doge’s पॅलेस हे प्रकरण फार कलीष्ट आहे परंतु ईतकंच सांगतो की आता ईथे संग्रहालय चालवलं जातं. बॅसिलीका पहाण्यासाठी आम्ही काही आत गेलो नाही परंतु त्याच्या कमानींवर छान चित्रांची आणि शिल्पांची सजावट फार सुंदर आहे. ईथे बरंच फिरण्यासारखं आणि मजेत वेळ घालवण्यासारखं हे स्थळ आहे. एकदा संध्याकाळ ईथे घालवून पहा. नक्की आवडेल तुम्हाला.


आमचा पुढील पडाव हा ऑस्ट्रीयातील इन्सब्रुक या शहरात होता. मुंबईतील एक पारसी गृहस्थ ईथे रेस्टॉरंट चालवतात त्यांच्या रेस्टॉरंट मधे आम्ही जेवायला गेलो होतो. फार आतिथ्यशील आणि प्रेमळपणे त्यांनी आम्हाला जेऊ घातले जेवण झाल्यावर मी त्यांना तिथल्या एका दुकानाचा पत्ता विचारला तर ते सद्गृहस्थ मला रस्ता दाखवण्यासाठी कितीतरी अंतर चालत माझ्या सोबत आले. सर्व मंडळी शॉपिंगला गेली मी सर्वात मागे शहर पहात रमत गमत चाललो होतो. रस्त्यांवर एकदम शुकशुकाट होता. असं वाटत होतं की लोक शहर सोडून पळालेत. रविवारी आपल्या फोर्ट एरियात जसा शुकशुकाट असतो त्यापेक्षाही कितीतरी जास्त शुकशुकाट होता. ईमरतींमधे माणसं दिसत नव्हती, ऑफिसेसच्या काचेच्या तावदानां पलिकडे ही माणसं दिसत नव्हती. शहर मेलं की काय असं वाटत होतं एवढ्यात एका चिंचोळ्या गल्लीतून आचानक हमरस्त्यावर आलो तर ते बाजाराचं ठिकाण होतं. तिथे फिरलो, फूटकळ ठिकाणं पाहिली आणि परत फिरलो. पुढे स्वारोवस्की या प्रसिद्ध क्रिस्टल कंपनीत त्यांच्या वस्तुंचं प्रदर्शन पहायला गेलो खूप खूप वाखाणण्याजोगी जागा आहे. डोळे दिपवून टाकणारे कारनामे तिथे पहायला मिळाले. क्रिस्टलचा ताजमहाल, स्टेट एम्पायर बिल्डिंग हे खास आवडले. रात्र जर्मनीतील हॉलीडे इन मधे काढली. दुसऱ्या दिवशी सकाळी ११:३० च्या सुमारास आम्ही म्युनिक विमानतळावर जायला निघालो पुन्हा मुंबईत यायला. मनात असंख्य गोड आठवणी आणि प्रश्न घेऊन. युरोपात जसे गुळगुळीत रस्ते आहेत तसे आपल्याकडे कधी होणार, युरोपमधील लोकांना जसे गाडी चालवताना सौजन्य दाखवता येते तसे आपले लोक कधी दाखवतील का? झेब्रा क्रॉसिंग जवळ माणूस दिसल्यावर वाहतूक थांबेल का? युरोपमधे दिसते तशी स्वच्छता आपल्याकडे ठेवता येईल का? तिथे पोलीसांवर ताण पडत नाही  तसं आपल्याकडे होईल का? रस्त्यांवर पचापच थुंकणं थांबेल का? एक ना दोन अनेक प्रश्न डोक्यात होते. पण आपल्यासारखे वैविध्य त्यांच्याकडे नाही. सण-उत्सव नाही, दुसऱ्याच्या मदतीला धावून जाणं नाही, जीवनात रंग नाहीत. काही बदल म्हणून नाही तेच ते आणि तेच ते काळे-पांढरे कपडे, चेहऱ्यावर कृत्रिम भाव, तटस्थता हे सारं पाहिल्यावर वाटलं गड्या आपुला गाव बरा. पण जमल्यास एकदा जाऊन युरोप पहायला काय हरकत आहे?

 







Comments

Popular posts from this blog

देव आनंद

भक्ती