देव आनंद
देव आनंद ;
काल देव आनंदचा वाढदिवस होता. खरं तर आज जर तो जिवंत असता तर ९९ वर्षांचा असता. आणि अजूनही काही तरुणी त्याच्या प्रेमात पडल्या असत्या याची खात्री आहे. अजूनही तो एखाद्या तरुणालाही लाजवेल अश्या उत्साहाने काम करत राहिला असता. देव आनंद म्हणजे एक अजब रसायन होतं.
धरमदेव पिशोरीमल आनंद उर्फ देव आनंद याचा जन्म २६ सप्टेंबर १९२३ साली सध्याच्या पाकिस्तानातील पंजाबातल्या गुरुदासपूर येथील शकरगढ गावात झाला. वडील पेशाने वकील असल्याने घरात शिक्षणाचं वातावरण होतंच त्यामुळे देव ने गव्हर्नमेंट कॉलेज, लाहोर मधून इंग्रजी साहित्य ( English literature ) मधे पदवी सपादन केली. पुढे देव आनंद नोकरीच्या बाहेर पडला आणि त्याला भारतीय सैन्याच्या टपाल खात्यात सेन्सॉर खात्यात नोकरी मिळाली. पगार होता रुपये एकशे साठ प्रति माह. पण एवढ्यावरच थांबला तर तो देव आनंद कसला?
पृथ्वीवर पाठवताना देवाने त्याला एक विलक्षण सुंदर चेहरा आणि एक खास मधुर स्मित दिलं आणि म्हणाला की जा आणि तुझं नशीब आजमावून बघ. पठ्ठ्या हिरो बनण्यासाठी मुंबईत आला. पण त्याला संधी मिळाली ती पुण्यातल्या प्रभात फिल्म कंपनी मधे. तिथे तो पहिल्या मुलाखतीला गेला तेव्हा त्याच्या खिशात फक्त तीस रुपये होते आणि तो पावसात चिंब भिजलेल्या अवस्थेत मुलाखतीला सामोरा गेला. तशा अवस्थेत ही तो सिलेक्ट झाला आणि पहिला सिनेमा ‘हम एक है’ मधे त्याला पहिला ब्रेक मिळाला. नायिका होती कमल कोटणीस आणि वर्ष होतं १९४६-४७. या शुटिंग च्या दरम्यान देव आनंदची ओळख गुरुदत्त शी झाली. दोघंही जिगरी दोस्त झाले आणि ती दोस्ती गुरुदत्त च्या मृत्यूपर्यंत टिकली. देव आनंद ने गुरुदत्तला वचन दिलं होतं की मी तुला माझ्या सिनेमा मधे दिग्दर्शक म्हणून काम देईन आणि गुरुदत्तने देवानंदला आपल्या सिनेमात नायक म्हणून काम देण्याचं वचन दिलं होतं. ही वचनांची देवाण घेवाण डेक्कनवरच्या लकी मधे झाली होती असं समजतं.
पुढे कामाच्या शोधात असताना कुणीतरी देव आनंदला बॉम्बे टॉकीज मधे जाऊन अशोक कुमार यांना भेटण्याविषयी सुचवले त्याप्रमाणे देव आनंद अशोक कुमार यांना भेटायला गेला. अशोक कुमार त्यावेळी ‘जिद्दी’ या सिनेमाची तयारी करत होता आणि प्रमुख भूमिका स्वतः करणार होता. जेव्हा देव आनंद त्याला भेटला आणि त्याने अशोक कुमारला कामा विषयी विचारलं तेहा अशोक कुमार ने त्याला ‘जिद्दी’ मधील नायकाची भूमिका दिली समोर नायिका होती कामिनी कौशल आणि वर्ष होतं १९४८. सिनेमा चांगलाच यशस्वी झाला आणि तिथुनच देव आनंद या नायकाचा हिंदी सिने जगतात जन्म झाला. प्रचंड उर्जा शरीरात असलेल्या या माणसाला निराशा काय असते हे माहितीच नव्हतं तो सतत नाविन्याच्या शोधात असे.
१९४९ साली नवकेतन फिल्म्स या कंपनीची स्थापना झाली आणि देव आनंदने चित्रपट निर्मिती क्षेत्रात पाऊल ठेवले. या कंपनीने ‘बाजी’ नावाचा पहिला सिनेमा काढला. देव आनंदचा आणि नवकेतन फिल्म्सचा हा पहिला सिनेमा होता आणि त्याचा दिग्दर्शक होता गुरुदत्त. १९५१ साली प्रदर्शित झालेला हा सिनेमा भरपूर चालला. एव्हाना तरुणाईला देव आनंदची भुरळ पडली आणि कपडे, केशरचना, चालणं, बोलणं या सर्व बाबींमधे देव आनंदची नक्कल करणे सुरु झाले. देव आनंदने मोजकेच यशस्वी चित्रपट दिले पण ते बावनकशी सोन्या सारखे होते. नवकेतनच्या यशा मधे सचिन देव बर्मन यांच्या संगीताचा मोलाचा वाटा होता हे विसरुन चालणार नाही.
पुढे जाल, टॅक्सी ड्राईव्हर, मुनीमजी, सीआयडी, पेईंग गेस्ट या सिनेमांनी अक्षरशः धुमाकूळ घातला. त्याकाळच्या तरुणाईला अक्षरशः वेड लावले. जो तो स्वतःला देव आनंद समजून वागू लागला. स्त्रीयांच्या मनावर तर देव आनंद नावाचं गारुड घातल्यागत झालं होतं. ज्या अदाकारीवर आजी ने प्रेम केलं त्याच अदाकारीने नातीला ही भुरळ घातली होती. सलग तीन चार पिढ्यांच्या मनावर अधिराज्य गाजवणे हे केवळ देव आनंद कडूनच होऊ शकतं.
पुढे या प्रवासा दरम्यान १९५५ साली दिलीप कुमार बरोबर इन्सानियत हा सिनेमा केल्यानंतर देव आनंदची १९५८ मधे सुरैया बरोबर गाठ पडली. दोघांनी सोबत काम करत एकूण सहा चित्रपट केले. एकदा चित्रिकरणा दरम्यान सूरैया पाण्यात बुडत असताना देव आनंद ने तिला मरणापासून वाचवलं. झालं, सुरैया आणि देव आनंद यांचा एकमेकांवर जीव जडला. दोघंही एकमेकांवर अतिशय प्रेम करीत असत. सुरैया मुसलमान आणि देव आनंद हिंदू असा आंतर धर्मिय तिढा होता आणि यात खलनायिकेची भूमिका वठवली ती सुरैयाच्या आजीने. सोन्याचं अंड देणारी कोंबडी कोण बरं जाऊ देईल? तिने प्रचंड विरोध केला. ईतका की दोघं ही फोनवर चोरुन बोलत असत. पुढे ती चोरी सुरैयाच्या आजीकडून पकडली गेल्यावर ते ही बंद झालं. पण सूरैयाचं देव आनंदवर निस्सीम प्रेम होतं. ती त्याच्यासाठी आजन्म अविवाहित राहिली. देव आनंद ने मात्र पुढे कल्पना कार्तिक बरोबर लग्न केलं पण हा विवाह काही सफल झाला असं म्हणता येणार नाही. दोघं एका छताखाली सोबत रहात असले, एकत्र डायनिंग टेबलवर येत असले तरी एकमेकांशी त्यांचा संवाद होत नव्हता. पुढे देव आनंद ने म्हणे मान्य केलं की सुरैया सोबत त्याचं लग्न झालं असतं तर त्याचं आयुष्य वेगळंच झालं असतं. आता वेगळं म्हणजे कसं? हे तोच जाणे.
पुढे देव आनंद ने वहिदा रेहमान सोबत १९६५ साली ‘गाईड’ नावाचा सिनेमा केला. सिनेमा प्रचंड हीट झाला. देव आनंदला सर्वोत्कृष्ट नायकाचा त्या वर्षीचा पुरस्कार मिळाला. सिनेमा आर. के. नारायण यांच्या कादंबरीवर बेतलेला होता. नवकेतन, देव आनंद, विजय आनंद आणि परिवाराची गाडी आता वेगाने प्रवासाला निघाली होती.यात सचिन देव बर्मन यांच्या संगीताचा ही वाटा मोलाचा होता हे नाकारुन चालणार नाही.
ज्वेल थीफ, जॉनी मेरा नाम, हरे रामा हरे कृष्णा, प्रेम पुजारी, तेरे मेरे सपने, देस परदेस असे तब्बल ११५ सिनेमा देव आनंद या नावाशी निगडीत आहेत. नायिकांच्या बाबतीत तर या देव आनंदचं नशीब कुणालाही हेवा वाटावं असंच आहे. १९४६-४७ च्या सुमारास कमल कोटणीस बरोबर सुरुवात करुन पुढे टिना मुनिम पर्यंत येऊन थांबला. जाहीदा नावाची नटी तान्हं बाळ असताना एका सिनेमातील गाण्यात नर्गिसच्या कडेवर होती ती १९७१ साली गॅम्बलर चित्रपटात देव आनंदची नायिका झाली आणि देव आनंदने तिच्या सोबत ‘चूडी नही मेरा दिल है….’ हे प्रणयगीत केलेलं तुम्हाला आठवत असेलच.
देव आनंद आणि कल्पना कार्तिक यांचं लग्न टॅक्सी ड्रायव्हर या सिनेमाच्या शूटिंग दरम्यान १९५३ साली झालं आणि साधारण त्याच सुमारास झीनत अमानचा जन्म झाला. आता ही झीनत अमान ‘हरे रामा हरे कृष्णा’ या सिनेमात देव आनंदची नायिका बनली. ईथेही देव आनंद आणि झीनत अमान यांच्यात प्रेम संबंध निर्माण झाले आणि ते लग्न करणार होते अशी वदंता आहे.
पुढे १९७८ साली देस परदेस मधे देव आनंद सोबत नायिका म्हणून टीना मुनीम आली होती. आता सांगा १९४६ साली चित्रपट कारकीर्द सुरु करणाऱ्या नटाला १९७८ साला पर्यंतच्या तब्बल ३२ वर्षांच्या कारकिर्दीत वैजयंतीमाला, नूतन, तनुजा, माला सिन्हा, जाहीदा, झीनत अमान, टीना मुनीम ( बरीचशी नावं राहीलेली असण्याची शक्यता आहे) या सारख्या सिने जगतातल्या अव्वल दर्जाच्या सर्व नट्या नायिका म्हणून मिळाल्यावर समकालीन नटांना देव आनंदचा हेवा नाही का वाटणार? बरं, विशेष म्हणजे यातील कुठल्याही नटी सोबत काम करताना ती जोडी कधीच विजोड वाटली नाही.
पुढे भारत सरकारने २००१ साली देव आनंदला त्याच्या सिनेसृष्टीतील योगदानाबद्दल पद्मभूषण पुरस्काराने गौरविले होते. त्याच्या पुढच्याच वर्षी देव आनंदला दादासाहेब फाळके हा सिनेजगतातील सर्वोच्च पुरस्कार मिळाला.
असा हा देव आनंद नावाचा उत्साहाचा खळाळता झरा २०११ साली अचानक लुप्त झाला. ११५ सिनेमांचा प्रवास करुन न थकलेलं मन पण थकलेला देह अखेर विसावला. लंडन मधे वैद्यकीय तपासण्यांसाठी देव आनंद गेला असताना तिथेच हृदय विकाराच्या झटक्याने त्याचं निधन झालं. नवकेतनला सचेतन ठेवणारा देह आता अचेतन झाला होता. यापुढे ती खास लकब चित्रपटांतून दिसणार नाही. ८८ वर्षांच्या या तरुणाच्या स्वागतासाठी स्वर्गात ही देवांनी गर्दी केली असेल.
© पुष्कराज चव्हाण
२७-०९-२०२२
Comments
Post a Comment