श्रावण

 अलिकडे या आधुनिक जीवन शैली स्वीकारल्याने किंवा कशामुळे म्हणा पण सणवार काही समजतच नाहीत. 

आता बघा श्रावण सुरु झालाय पण मनात अजून तो सण काही उतरला नाही. आज तो शेखर प्रभावळकर च्या लेखामुळे मनात जागा झाला. खरं तर हे सगळे सण वगैरे सर्व मनाच्या स्थिती चे आविष्कार असतात. मानली तर दिवळी, नाहीतर जगणं हे रोजचंच. पण हा श्रावण आला की सारं कसं एकदम पवित्र, शूचिर्भूत होऊन जातं. एकदा का दीप अमावस्या झाली की श्रावण महिन्याची सुरुवात होते. अंघोळ होऊन ओल्या केसांना पंचा गुंडाळलेल्या लोभस रुपात घरातली स्त्री देव्हारा स्वच्छ करुन देव घासून पुसून लख्ख करते, भिंतीवर जिवतीचं चित्र लावते आणि पूजेस प्रारंभ होतो आणि ईथूनच श्रावण खरंतर मनात आणि  वास्तवात, प्रत्यक्षात सुरु होतो. या महिन्यात सणांची आणि पक्वान्नांची रेलचेल असते. या महिन्यात पथ्य-पाणी बाजूला सारुन समोर आलेल्या पकवन्नांवर हात सैल सोडावा आणि यथेच्छ खाऊन घ्यावे व्याधींचे नंतर काय ते पहाता येईल. या दिवसांत दवाखान्यात सुद्धा गर्दी कमी दिसते असं माझं मत आहे. आता घरात खऱ्या अर्थाने मातृसत्ताक पद्धती सुरु होते. सोवळं ओवळं कसोशीने पाळलं जातं. नैवेद्याच्या स्वयंपाकावेळी स्वयंपाकघरात प्रवेशास मज्जाव असतो. देवांचं सारं काही यथासांग पार पडलं की  घरातल्यांच्या जेवणाची पानं घ्यायला सुरुवात होते तोपर्यंत घरातील मंडळी ही शुचिर्भूत होऊन बसलेली असतात. या गडबडीत सकाळी फराळ झालेलाच असतो. आताची भूक ही पकवान्नांची आणि ईतर रुचकर पदार्थांची असते. शक्य असल्यास समोर केळीचे पान येते त्यावर पांढराशुभ्र आंबेमोहोर तांदळाचा भात येतो त्यावर पिवळं धम्मक वरण त्यावर साजूक तुपाची धार सोबतीला लिंबाची फोड,ईतर पदार्थांमधे विविध प्रकार त्या त्या दिवसां प्रमाणे. नागपंचमीला पातोळ्या असतात, खोबऱ्याच्या कातळ्या घातलेलं मनगणं, नारळाच्या रसातल्या शेवया, तांदळाची खीर, उकडीचे मोदक, काकडीचे धोंडस, कडबू, आटवलेल्या दूधाची बासुंदी, मसालेदूध, मसाले भात, नारळी भात, श्रीखंड-पुरी, पंचामृत, रायतं अहो, पदार्थांची नावं घ्यावी तेवढी थोडी. घरातल्या सुगरणीचं पाक कौशल्यही ईतकं की तामसी आहाराची आठवण सुद्धा होणार नाही. सारं कसं अगदी कांदा-लसूळ विरहीत. बरं एवढं करुन आत्मा तृप्त न झाला तर नवल. शेजाऱ्या पाजाऱ्यांकडे ताटं, डबे जाणं हे ही चालू असतं त्यामुळे सणावारी मौज मजा असते. पूर्वी नाग पंचमीच्या दिवशी नाग घेऊन गारुडी दारोदारी भटकत असत. त्या नागांची पूजा करणे त्यांना दूध देणे असे अवैज्ञानिक प्रकार चालत असत. नारळी पौर्णिमेला दादरच्या रानडे रोड वर नारळी पौर्णिमेला नारळ फोडायची स्पर्धा सुरु असे. माणसं छान नवीन कपडे घालून लगबगीने रक्षाबंधना साठी रस्त्याने जाताना दिसत, गोकुळाष्टमी ला हम रस्त्यावर, गल्ली बोळात ऊंच ऊंच दहीहंड्या बांधल्या जात त्या फोडण्यासाठी लागणारे मानवी मनोऱ्याचे थर मोजता मोजता बघणाऱ्याच्या डोक्यावरची टोपी पडत असे. आता बक्षीसाची रक्कम आणि फोडणाऱ्याच्या जीवाची जोखीम दोन्ही ही पराकोटीची वाढलेली आहेत. पण रस्त्यावर या सणांच्या दिवशीचे दृष्य पहाण्यासारखे असे. हे सारं काही मुंबईत दादर, लालबाग, परळ, गिरगावात म्हणजे मुख्यत्वे मराठी बहुल भागात चालत असे पुढे उपनगरात हे दृश्य विरळ होत जाई.

पण या सर्व प्रकारांमुळे किंवा सण साजरा करण्याच्या उत्साहामुळे तो सण, त्याचं पावित्र्य सारं काही अक्षरशः अंगात भिनायचं तो सण मनात भरुन उरायचा. आता तितकी मजा नाही राहिली. कुणास ठाऊक कदाचित हे सारं काही बंद दरवाजां आडून चालत ही असेल. पण त्यात सर्वांना सामावून घेतल्याचं सुख समाधान नसल्याने त्याची मजा येत नसावी. यापुढे हे असंच राहील की हळू हळू लोप पावत जाईल कुणास ठाऊक. पण आता डोळे बंद करुन या साऱ्या भरजरी उत्सवांचे स्मरण रंजनच फक्त हाती उरले आहे.


पुष्कराज चव्हाण

०९-०८-२०२२

Comments

Popular posts from this blog

देव आनंद

भक्ती