माझ्या आठवणीतला राजकुमार
८ ऑक्टोबर हा हिंदी सिने सृष्टीतल्या राजकुमार या नटाचा जन्मदिवस आणि त्या निमित्ताने सोशल मिडियावर बरंच काही वाचायला मिळालं. अनेक किस्से जे बहुतांशी त्याची विक्षिप्तपणाची प्रतिमा लोकमानसात उभी करणारे होते, माझ्या मनाला ते खटकलं आणि माझं मन भूतकाळात गेलं आणि राजकुमार या हिंदी सिनेनटा बाबतच्या माझ्या मनातल्या आठवणी जाग्या झाल्या.
एके काळी आम्ही सर्व कुटुंबिय नेमाने उन्हाळ्याच्या सुट्टीत माथेरानला जात होतो तसेच १९७७ च्या उन्हाळ्यात ही गेलो होतो. माथेरानला पोचल्या बरोबर मी दिवाडकरांकडे जाऊन त्यांची मुलं प्रदीप व संदीप यांना भेटत असे, कारण मी तळेगावला शिकायला असताना ही दोन्ही मुलं माझ्याबरोबर होस्टेलवर आणि शाळेत होती. आणि त्यांच्यामुळे आम्हा मुलांना घोडेस्वारी शिकता आली. त्यांच्या वडिलांनी आपल्या मुलांना घोडेस्वारीची सवय असल्याने आपले दोन घोडे आणि साईस तिथे ठेवले होते आणि त्या निमित्ताने आम्हालाही घोडेस्वारी करायला शिकता आलं. तर झालं असं ७७ च्या त्या उन्हाळ्यात मी नेहमी प्रमाणे दिवाडकरांच्या हॉटेलवर गेलो तर त्या दोन्ही भावंडांतला धाकटा, संदीप मला भेटला आणि त्याने सांगितलं अरे राजकुमार नट आलाय आणि रोज आमच्या बरोबर रायडिंगला येतो. उद्यापासून तू पण ये आपण बरोबर जाऊ. पपू (प्रदीप) आता त्याच्याकडेच गेला आहे.
दुसऱ्या दिवसापासून मी ही त्यांच्यात सामील झालो. सगळे पट्टीचे रायडर त्यामुळे धमाल येत असे. आम्ही म्हणजे मी, संदीप, प्रदीप, मिलिंद ही दिवाडकर भावंडे, दयाराम दामोदर मिठाईवाल्यांचा मुलगा संजू आणि राजकुमार नट असे सगळे राईडला सकाळी निघायचो. आमची राईड जळपास दिड दोन तासाची असे नंतर घोड्यांना पूर्ण विश्रांती असे. राईड झाल्यावर मालीशवाला आम्हाला मालीश करत असे आणि त्यानंतर आमची गरम पाण्याने अंघोळ होई आणि नंतर भरपूर नाश्ता करणे असा आमचा दिवस सुरु होत असे.
तर सांगायचं म्हणजे राजकुमार या सुप्रसिद्ध नटाची आणि माझी पहिली भेट १९७७ सालच्या उन्हाळ्यात पहिल्यांदा माथेरानला झाली आणि तिथेच त्याची दिवाडकरांच्या मुलांकडून ओळख झाली. पहिल्यांदा त्याला प्रत्यक्ष पाहिलं तेव्हा अक्षरशः माझी नजर त्याच्यावरुन हटत नव्हती. मी आपला एकटक त्याच्याकडे पहातच राहिलो. त्याची सहा फूट आणि अंमळ जरा जास्तच असलेली उंची, पिंगट केस, घारे भेदक डोळे, काश्मीरी लालबुंद रंगाचा चेहरा, डोक्यावर रायडिंग हेल्मेट, अंगात तलम ऑफ व्हाईट कलरचा सैलसर फुल स्लीव्हज शर्ट, ऑलिव्ह ग्रीन कलरच्या ब्रीचेस, पायात ब्राउन कलरचे लेदरचे पोटऱ्यां पर्यंत येणारे रायडिंग शूज, हातात केन आणि चेहऱ्यावर मिशितल्या मिशीतलं मंद स्मित असं ते देखणं राजबिंडं रुप पाहून मी खरंच भान हरपून पहात राहिलो होतो. अखेरीस माझ्या नजरे समोर पंजा हलवत त्याने आपल्या नेहमीच्या खर्जातल्या आवाजात मला म्हंटलं कहाँ खो गये दोस्त? अरे भाई चलना है के नही? अब तो मुलाकाते होती रहेंगी. पहिल्या भेटीतच मी तो मर्दानी थाट पाहून खल्लास झालो होतो. रायडिंगचा आमचा जामानिमा ही तसाच होता पण त्याचं दिसणं म्हणजे काही वेगळंच होतं. आमचा घोडेस्वारीचा शौक एकच होता त्यामुळे आमची गट्टी लगेच जमली आणि रोज सकाळ संध्याकाळ घोडेस्वारी निमित्ताने किंवा फिरायच्या, गप्पा मारायच्या निमित्ताने भेटणं व्हायला लागलं. वयाने सर्वात लहान मी आणि दिवाडकरांचा संदीप. त्यामुळे रायडिंगच्या संदर्भातील काही कामं असली तर ती आमच्याकडे लागायची. सकाळी राजकुमारच्या राहण्याच्या ठिकाणी जमून मग आम्ही रायडिंगला पुढे जात असू. एकदा असंच सकाळच्यावेळी आम्ही त्याच्या बंगल्यावर गेलो होतो. सिनियर मंडळींमधे त्यावेळी एक जण कमी होता त्यामुळे राजकुमारला धरुन चार जण. त्यापैकी तिघं राजकुमारची तयारी होऊन त्याच्या निघण्याची वाट बघत बसली होती. त्यांचे चौघांचे घोडे बंगल्या बाहेर जवळच बांधले होते आणि मी आणि संदीप दिवाडकर आमचे घोडे घेऊन तिथे जरा मागाहून पोचलो. आम्ही पोचलो मात्र आणि मुसळधार पाऊस सुरु झाला. बराच वेळ पाऊस काही थांबेना, म्हणताना शेवटी रपेट रद्द झाली आता घोडे तबेल्यात बांधणं आलं. तबेला तिथून दूर होता. बरं साईस पण बरोबर नव्हते. मग काय? ते काम आपसूकच आमच्याकडे आलं आणि बाकी सगळे मोकळे झाले. आता आम्ही दोघांनी आमचे स्वतःचे आणलेले घोडे आणि वर आणखी दोन दोन घोडे सोबत घेतले आणि तबेल्याच्या दिशेने सुसाट निघालो. पाऊस धुवाँधार कोसळत होता. आम्ही घोडे फुल गॅलप मधे सोडले. वातावरणात सकाळची शांतता होती फक्त घोड्याच्या टापांचा आणि दुतर्फा असलेल्या दुकानांच्या पत्र्यावर मुसळधार पडणाऱ्या पावसाच्या अखंड सरींचा आवाज येत होता. बाजारात पावसाच्या पाण्यापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा असणाऱ्या दुकांनांच्या आडोशाला सकाळी सैर सपाट्याला निघालेली माणसं उभी होती, अचानक आसमंतात आमच्या घोड्यांच्या टापांचा आवाज घुमला आणि लोकांच्या नजरा आमच्या दिशेने वळल्या. आमचे दोन घोडे आणि सोबत घेतलेले चार अशा सहा ही भरधाव धावणाऱ्या घोड्यांच्या टापांखालून उडणारं पाणी, घोड्यांवर बसलेले आणि चिंब भिजलेले आम्ही दोघं घोडेस्वार असं हे दृश्य वातावरणात एक वेगळाच थरार निर्माण करत होतं. आम्हीही आमच्याच कैफात होतो. वेग आणि मांडीखालचं एक आणि हातातली दोन उमदी जनावरं यामुळे जणू एक वेगळीच नशा डोक्यात आली होती. उन्माद संचारला होता. तरुण वयाचा आणि उतावळेपणाचा तो परिणाम होता. ईतक्यात तबेला जसा जवळ आला तसा नेमका रस्त्यातून जाणारा एक कुत्रा माझ्या उजव्या बाजूच्या घोड्याच्या पायात आला आणि घोडा बावचळला. मी लगाम खेचून घोडा थांबवायच्या प्रयत्नात होतो एवढ्या पावसात सॅडल, लगाम, रिकिब सगळंच भिजल्याने निसरडं झालं होतं आणि त्यात उजव्या बाजूच्या घोड्याने अचानक खेचल्याने माझी घोड्यावरची पकड ढिली पडली होती आणि त्यामुळे मी तोल जाऊन धप्पकन् खाली पडलो. झालं, मुंबई हून आलेला रायडर पडला असा सगळीकडे बोभाटा झाला. सुदैवाने कोणत्याही प्रकारची ईजा झाली नव्हती. आम्ही सर्व घोडे तबेल्यात सोडले आणि हॉटेलमध्ये आलो. दिवाडकरांची मोठी दोन्ही मुलं आणि दयाराम दामोदर मिठाई वाल्याचा मुलगा संजू तिघंही ही बातमी ऐकून घाबरले आणि राजकुमारच्या घरनं घाई घाईने निघून ताबडतोब दिवाडकरांच्या हॉटेलवर पोचले आणि पहातात तर काय? आम्ही सुखरुप होतो. आम्हाला सुखरुप पाहून त्यांचाही जीव भांड्यात पडला. संध्याकाळी राजकुमार मला बघायला दिवाडकरांच्या हॉटेलवर आला. आणि त्यानिमित्ताने मग माझे वडील, बाबाशेठ दिवाडकर, राजकुमार एकमेकांना भेटले आणि मग भरपूर गप्पा मारल्या, ड्रिंक्स वगैरे घेतली आणि त्यानंतर बडा खाना झाला. पुढचे काही दिवस मजेत गेले. रुपेरी पडद्यावरचा राजकुमार जसा ऐटबाज दिसे तसाच तो प्रत्यक्षात ही होता. त्याच्या प्रत्येक हालचालीत एक वेगळाच रुबाब होता. आवाज तोच खर्जातला. ओठांच्या कोपऱ्यात धरलेली ऊंची विलायती सिगारेट, हातात व्हिस्कीचा ग्लास, किंचित मान वर करुन बोलण्याची लकब, चेहऱ्यावर बेफिकिरी आणि प्रत्येक शब्दावर जोर देऊन बोलणं हे हे सारं काही अगदी पडद्यावर पहात होतो तस्संच घडत होतं. त्यात भर घालणारी त्याची ती रुबाबदार चाल. प्रत्यक्षातलं त्याचं वागणं, बोलणं म्हणजे मैत्रीच्या भावनेनं आणि प्रेमानं ओथंबून वाहणं होतं. लाजबाब असलेलं हे सारं काही आम्ही भरभरुन पहात होतो, प्रत्यक्षात अनुभवत होतो. तो मात्र आपण कुणी विशेष व्यक्ती असल्याचं जरा ही जाणवू देत नव्हता ईतकं सहजपणे आमच्यात वावरत होता. काही दिवसांनी मुक्काम संपला आणि राजकुमार परतीच्या प्रवासाला निघाला, आम्ही दस्तुरी पर्यंत त्याला व त्याच्या कुटुंबियांना त्याची गाडी ठेवली होती तिथपर्यंत निरोप द्यायला गेलो. निघताना त्याने माझ्याकडे माझा घरचा पत्ता मागितला त्यावेळी पत्ता लिहिताना रानडे रोड चं स्पेलींग माझ्याकडून चुकलं आणि ते रांडे रोड झालं. राजकुमार माझ्या पाठीवर जोराची थाप मारुन त्याच्या प्रसिद्ध शैलीत म्हणाला बहोत खूब, पुष्कराज अगर ईस तरह गलतीयाँ करोगे तो एस् एस् सी पास कौन करेगा तुम्हे? चलो रानडे रोड का स्पेलींग तुरंत ठिक करो. एव्हाना हमालांनी सामान गाडीत ठेवलं होतं आणि कुलभूषण पंडीत उर्फ राजकुमार आपल्या कुटुंबियांसमवेत सुट्टी संपवून परतीच्या प्रवासाला निघाला होता.
त्यावेळी मी रायडिंगच्या आवडीपोटी मुंबईतील रेसकोर्सवर अमॅच्युअर रायडर्स क्लब मधे जात असे. तिथे बऱ्याचदा राजकुमार ही येत असे त्यामुळे मुंबईत अनेकदा रेसकोर्सवर आमची भेट होत असे आणि तिथेही केव्हाही भेटल्यावर तो मित्रत्वाने वागत असे. एकदा मी माझ्या गाडीतून महालक्ष्मीहून वरळीच्या दिशेने जात असताना हाजी अलीला माझ्या शेजारच्या गाडीचा हॉर्न ऐकून मी त्या गाडीकडे पाहीलं तर राजकुमार त्याच्या फॉक्स वॅगन मधून मला थांबण्याची खूण करत होता. मी गाडी बाजूला घेउन थांबवली आणि गाडीतून उतरलो. पहातो तर राजकुमार ही गाडीतून उतरला आणि मला भेटला. मला वाटतं ही १९८२-८३ ची गोष्ट असावी. येवढा मोठा नट रस्त्यावर ऊभा राहून माझ्याशी बोलत होता. घरच्यांची चौकशी करत होता या साधेपणाचं मला फार कौतुक वाटलं. त्या आधी तो मला "देसपरदेस" या देव आनंदच्या सिनेमाच्या प्रिमियर शो ला सत्यम् थिएटर मधे भेटला. तिथेही माझ्याशी त्याने गप्पा मारल्या, वडील आले नाहीत का म्हणून विचारलं. राजकपूर, धर्मेंद्र, राजेश खन्ना यांच्याशी "हमारा दोस्त पुष्कराज" असं त्याच्या खास लकबीत म्हणत ओळख करुन दिली, मलाही त्या दिग्गजांशी हस्तांदोलन करता आलं, त्यांना जवळून पहाता आलं. राजकुमार व मी, आम्ही नंतरही काही वेळा भेटलो प्रत्येकवेळी त्याचं वागणं प्रेमळ आणि सौहार्दपूर्ण होतं. पण कालांतराने माझं रेसकोर्सवर जाणं बंद झालं आणि आमच्या भेटी थांबल्या. पुढे काही वर्षांनी त्याला कँसर झाल्याचं समजलं आणि १९९६ च्या पावसाळ्यात तो या जगातून निघूनही गेला. एका अत्यंत देखण्या, रुबाबदार, स्वतःच्या अटींवर जगणाऱ्या, स्वतःच्याच मस्तीत जगणाऱ्या झळाळत्या व्यक्तीमत्वाचा अस्त झाला.
असा हा राजकुमार खूप मोठ्या मनाचा आणि दिलदार स्वभावाचा खरोखरचा मोठा माणूस होता. आयुष्यात अनेक नामांकित आणि मोठ्या महत्वाच्या माणसांना भेटण्याचा, त्यांच्याशी बोलण्याचा आणि त्यांच्या संगतीत काही काळ घालवण्याचा योग माझ्या नशीबाने मला दिला, त्यातलाच हा एक, मोठ्या मनाचा खराखुरा मोठा माणूस, खऱ्या आयुष्यातला राजकुमार.
© पुष्कराज चव्हाण.
११-१०-२०२०
Comments
Post a Comment