नवनीत

 नवनीत.

संध्याकाळचं जेवण आटोपून निवांत बसून हिंदी सिने संगीताच्या मैफलीचा आनंद घेत असतानाच माझी वर्गमैत्रीण अर्चनाचा फोन आला आणि तिच्याकडून तिच्या भावाच्या, जो माझा ईयत्ता पहिली ते चवथी पर्यंतचा वर्गमित्र होता  त्याचे, नवनीत कुलकर्णीचे हृदयविकाराने निधन झाल्याची दुःखद बातमी समजली. बातमी ऐकताच मी अक्षरशः भानावर आलो. अचानक अनपेक्षित अप्रिय घटना घडावी आणि ती आपल्या कानावर आल्यावर जे एखाद्या माणसाचं व्हावं तेच माझं ही झालं. मैफल भंग पावली होती. एक सूर हरपला होता.

 अलिकडे जवळचे मित्र जाण्याचे हे असे दुःखद प्रसंग थोड्या थोड्या अवकाशाने लागोपाठ घडले त्यामुळे जीवनाचे हे अंतिम सत्य जवळून पहाण्याचे प्रसंग वरचेवर आले. ज्या मित्राबरोबर त्याच्या सोबतीने अगदीच असमंजस वयातली बालवर्ग, शिशुवर्ग आणि पुढील पहिली ते चवथी पर्यंतची अशी एकूण सहा वर्ष सुखेनैव मजेत घालवली त्याने आयुष्याच्या निवांतपणे जीवन व्यतित करण्याच्या काळात अचानक हात सोडून निघून जाणं हे न पटणारं आणि न रुचणारं असं भासलं.

नवनीत हा नावा प्रमाणेच लोण्यासारखा मऊ स्वभावाचा होता. ओळख झाल्यावर पटकन जवळीक निर्माण होणारा दोस्ती करणारा आणि ती निभावणारा होता. आमचं एकमेकांना रोज भेटणं नसे. कधीतरीच भेटणं होत असे किंवा खरेदी निमित्ताने माझ्या पत्नीचे त्यांच्या दादर मधील गिरगाव पंचे डेपो या दुकानात जाणे होत असे तेव्हा तिला तो भेटत असे. भेटल्यावर प्रेमाने, आपुलकीने चौकशी करुन काही हवं नको ते खुद्द जातीने पहात असे. आदरातिथ्य करत असे. त्यानिमित्ताने जुन्या आठवणी निघत असत. पुन्हा ये, भेट अशी आग्रही प्रेमळ विनंती असे. काही काळापूर्वीच त्याची मित्रांच्या एका मैफलीत शिवाजी पार्क जिमखान्यात भेट झाली होती. निघताना निरोपाच्यावेळी सर्व मित्रांनी पुन्हा भेटायचं एकमेकांना आश्वासन ही दिलं-घेतलं. पण माणसाने ठरवावं आणि नियतीने ते उधळून लावावं त्याप्रमाणेच झालं. आता ते सारं राहून गेलं, आता ते पुन्हा होणे नाही. नवनीत मैफल अर्ध्यावर सोडून गेला. यापूर्वीही एक एक मोहरे असेच गळत गेले. आता मैफल पुन्हा सजेल न सजेल, कुणास ठाऊक पण त्या मैफलीला एक दुःखाची, कारुण्याची झालर तर नक्कीच असेल. मैफलीत काही सूर हरपलेल्याची जाणीव सतत होत राहील.  आयुष्यात पुत्रवियोगाचं दुःख पचवून पुन्हा खंबीर पणे उभा राहिलेला हा मित्र आता स्वतःही आमच्याकडे पाठ फिरवून पुन्हा न भेट होणाऱ्या दूरच्या प्रवासाला निघून गेला.

मित्रा, जिथे असशील तिथे आनंदात रहा. तुझ्या आत्म्यास शांती लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना. तुझी आठवण मात्र नेहमीच येत राहील.🙏🏻🌷


Comments

Popular posts from this blog

देव आनंद

भक्ती