जयेश नाडकर


तो पहिल्यांदा भेटला ते रुपारेल कॉलेजच्या कँटीनच्या बाहेर. जवळपास सहाफूट उंचीचा, शिडशीडीत बांध्याचा, जाड काचांचा चष्मा असलेला आणि सतत काही तरी करण्याची सळसळती भरपूर उर्जा अंगात असलेला आमच्यापेक्षा वयाने तीन चार वर्षाने लहान असलेला असा हा जयेश सुरेश नाडकर नावाचा आमचा मित्र वयाच्या ५५ व्या वर्षी अचानक आमच्यातून चटका लावून एग्झीट घैईल असं कधीच वाटलं नव्हतं. सर्व साहसांची आणि खेळ व व्यायामाची आवड असलेला जयेश मजबूत हाडा पेराचा होता. सतत उत्साहाने आणि नवनवीन कल्पनांनी भारलेलं असं हे सळसळतं व्यक्तीमत्व होतं. अत्यंत प्रेमळ स्वभावाने सर्वांना आपलंसं करणारा हा माणूस असंख्य माणसं जोडून होता. कॉलेजात असताना एन् सी सी च्या सर्व परिक्षा देऊन सैन्यात जाण्याची उमेद मनाशी बाळगून होता. मला वाटतं दिल्लीत प्रजासत्ताक दिनाच्या परेडला ही जण्यासाठी त्याची निवड झाली होती आणि तो तिथे गेला होता. धसमुसळेपणा अंगात असल्याने आणि धाडसी स्वभावामुळे कोणताही निर्णय घेण्यासाठी त्याला जास्त वेळ लागत नसे जे काय परिणाम होतील त्याला समर्थपणे तोंड देण्याची त्याची तयारी असे. त्याच्या या स्वभावामुळेच तो वयाने आमच्यापेक्षा लहान असूनही बरेचदा आघाडीवर असे. आमच्यापैकी बरेच जण त्याच्याकडे आधारासाठी पहात असत. स्वभावाने प्रेमळ असलेला जयेश मित्रपरिवाराच्या मुला नातवंडांमधे ही लाडका होता. सर्वांचे भरभरुन लाड करणारा जयेश काका कुठे भेटला तर मुला बाळांचे खूप लाड करीत असे. माझा नातू, जो कोणाकडे सहसा जात नाही त्याला कडेवर घेऊन हा माणूस संपूर्ण केटरिंग कॉलेज फिरला. जितका वेळ माझी बायको आणि मुली तिथल्या फूड फेस्टिव्हल मधे होत्या तितका वेळ तो त्याच्या कडेवरच होता. माझ्या मुलींनाही जयेशकाका आवडायचा. कुठेही भेटला की खूप प्रेमाने बोलायचा. 
केवळ ५५ वर्षाच्या आयुष्यात या  जयेशने यशाची अनेक शिखरे पादाक्रांत केली होती. नोकरीत तर यश मिळवलंच, अनेक मित्रही जोडले,  रोहा येथे स्वतःचं एक सुंदर रिसॉर्ट सुरु केलं, लेकीचं लग्न लाऊन दिलं, वयस्क वडिलांची सेवा केली, सुस्वभावी पत्नी निलमच्या जोडीने सुखी संसार केला. वेळीप्रसंगी गरजूंना मदत केली, त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला, सारं काही या तुलनात्मक छोट्या आयुष्यात सहज केल्या सारखं केलं. जै काही आयुष्य त्याच्या वाट्याला आलं ते तो समृद्धपणे  आणि भरभरुन जगला. आयुष्य किती जगला त्या ही पेक्षा ते कसं जगला याला महत्व आहे. जिंदगी लंबी नही, बडी होनी चाहिए हे त्याच्याबाबतीत खरं ठरलं. जयेश बडी जिंदगी, बेधडकपणे जगून गेला.
त्याच्या आत्म्याला शांती लाभो.
🙏🏻

Comments

Popular posts from this blog

देव आनंद

भक्ती