शहरा मधले घर कौलारु

शहरा मधले घरं कौलारु.
दादर पश्चिम आणि ते ही शिवाजीपार्क सारख्या मुंबई आणि दादर च्या मध्यवर्ती भागात, पांढरपेशा बुद्धीजीवी लोकवस्तीत रहाण्यासाठी मनाजोगतं घर मिळणं यासाठी कर्माचा भाग जितका महत्वाचा आहे तितकाच महत्वाचा गतजन्मीच्या संचिताचा आणि नशीबाचा भाग ही आहे हे नाकारून चालणार नाही. ही जागा अशा मोक्याच्या ठिकाणी आहे कि ईथुन सर्व महत्वाच्या अत्यावश्यक सोयी अगदी सहज चालत जाण्याच्या अंतरावर आहेत. उदाहरणार्थ दोन्ही, मध्य आणि पश्चिम रेल्वेची स्थानके, मुंबईत सर्व ठिकाणी जाता येतील असे बस स्टॉप, चौपाटी, आणि ऊद्याने, सिनेमाघरं, नाट्यग्रुह, भाजीबाजार, नामांकित शाळा, महाविद्यालयं, ईस्पितळं, काय नाही असं नाही. तुम्ही म्हणाल ते ईथे अगदी अवघ्या १० ते १५ मिनिटांच्या अंतरावर हजर आहे. अशा या सर्व सोयींनी युक्त दादरच्या शिवाजीपार्क भागात रहाण्याचे भाग्य आम्हाला लाभले.
आम्ही, मूळचे कोल्हापूरचे. वडील कोल्हापूर हून सरकारी नोकरी करण्या साठी मुंबई ला आले आणि गिरगावात माधवाश्रमात रहायला लागले. त्यानंतर वडीलांचे लग्न झाल्यावर वडील आणि आई डोंबिवलीत रहायला गेले. सरकारी नोकरी, ती ही मंत्र्यांकडे खाजगी सचिव, असं असल्याने रात्री घरी परतायला फार उशीर होत असे व पुन्हा सकाळी लवकरच कामावर हजर रहावे लागे. ही त्यांची कसरत पाहून त्यांना दादर, फाईव्ह गार्डन आणि वांद्रे या पैकी एक ठिकाण निवासा करीता निवडायला मंत्री महोदयांनी सांगितले. अखंड हिंदुस्थानाची फाळणी झाल्यानंतरच्या काळात पाकिस्तानची निर्मिती होत असताना ज्या नागरिकांना आपापल्या पसंतीच्या देशात रहाण्याची किंवा नागरिकत्व स्वीकारण्याची संधी देण्यात आली होती. त्यानुसार जे भारताचे नागरिकत्व स्वीकारून या देशात रहावयास आले त्यांची रहाण्याची सोय करण्यासाठी काही खासगी घर मालकांच्या जागा सरकारने स्वतःच्या ताब्यात घेतल्या होत्या. कालांतराने निर्वासितांचा प्रश्न सुटल्यावर या जागा सरकारी नोकरीत असलेल्यांना शासकीय निवास स्थान  म्हणून रहाण्यास दिल्या जाऊ लागल्या त्यातलीच एक माझ्या वडीलांनी सध्या रहात असलेली दादर पश्चिमे कडील पाटील वाडीतली जागा निवडली. अशा प्रकारे माझे आई वडील १९५५ – ५६ च्या सुमारास दादर पश्चिम येथील पाटीलवाडीत पाटलांच्या घरात रहायला आले.हे पाटील म्हणजे बाळाराम माणिक पाटील, हरिश्चंद्र माणिक पाटीलांचे भाऊ (ज्यांचं नांव आम्ही रहातो त्या रस्त्याला दिलंय ते), या रस्त्यावरचा बराचसा भाग हा या पाटीलांच्या मालकीचा होता म्हणून ही वस्ती पाटीलवाडी म्हणून सरसकट ओळखली जाई. तशी ईथे चुरी आडनावाच्या कुटुंबाची सुद्धा चुरी वाडी नावाची वस्ती होती. यादोन्ही वस्त्यांच्या मधून जातो तो हरिश्चंद्र माणिक पाटील मार्ग.या पाटीलवाडी आणि चुरी वाडीत या वाड्यांच्या मालकांची दोन तीन टुमदार घरं होती आणि एक चांगलंच प्रशस्त ऐसपैस असं पाटलांचं घर होतं आणि त्यात आम्ही रहात होतो.
पाटीलांच्या साधारणपणे अडीच तीन फूट उंचीच्या दगडी जोत्यावर फार सुंदर असं बांधलेलं हे घर एकत्र कुटुंब पद्धतीला आणि रीतीरिवाजाला साजेसं असं होतं. एकूण तीन जिने या एक मजली घराला होते आणि ते ही लाकडी आणि प्रशस्त असे होते. प्रशस्त आणि ऐसपैस या शब्दांशिवाय त्या घराचं वर्णन करणं केवळ अशक्य आहे. तर या तीन जिन्यांपैकी दर्शनी भागी असलेला मुख्य जिना, हा काळा कुळकुळीत पण तितकाच चमकदार असा शिसवी लाकडाचा होता. हा जीना पाहुणे मंडळींच्या वर्दळी करीता होता. मुख्य दरवाजा ऊघडल्यावर या जिन्यावरुन दिवाणखान्यात जाता येत असे. हा आयताकृती दिवाणखानाही चांगलाच मोठा होता याचे क्षेत्रफळ हे ४८० वर्ग फूटाचे होते, या दिवाणखान्यास एकूण चार डबल खिडक्या होत्या, म्हणजे एका खाली एक अशा, वरच्या खिडकीला गज नसत पण खालच्या खिडकीला लोखंडी भरीव गज आणि बाहेरुन लाकडी दरवाजे. वरील खिडकीस बाहेरुन रंगीत नक्षीदार काचेची किरमीजी रंगाची तावदानं आणि आतुन लाकडी उघड झाप करता येतील असे झडपा (लूअर्स) असलेले दरवाजे होते. दिवाणखान्याच्या मध्यभागी छानसं तांब्याचं सुबक झुंबर होतं आणि ईतर भागात त्यालाच साजेसे भिंतीवरचे दिवे होते. दिवाणखान्यातून आत घरात जाण्या करीता तीन दरवाजे होते. त्यातला फक्त मधला दरवाजा वापरात असे बाकी दोन्ही दरवाजे बंद असत. मधल्यादरवाजातून आत गेल्यावर आतल्या खोलीतून खाली जाण्या करीता एक लाकडी जिना होता. या जिन्यावरुन विशेषतः स्त्रीयांची ये जा असे, किंवा घरातल्या माणसांची ये जा होत असे. पुढे आम्ही खालच्या मजल्यावर रहायला आल्यावर पाटीलांनी तो जिना मधोमध लाकडी फळ्यांनी बंद करुन टाकला. जेणे करुन दोन वेगवेगळी घरं तयार झाली. मागील बाजूला घराच्या बाहेरुन एक जिना होता तो थेट न्हाणीघरात नेऊन पोचवत असे या जिन्यावरुन नोकर माणसांची ये जा होई. लाकडी आढं असणाऱ्या या घराच्या आतील भागाची ऊंची तळ मजल्यावर सुमारे १८ फूट आणि वरच्या मजल्यावर तर कौलापर्यंत होती. भरपुर खिडक्या दरवाजे आणि जाड जूड भिंती असल्या कारणाने घर हवेशीर आणि थंड असायचे ऊन्हाळ्यात ही क्वचित पंखा लावावा लागे. आजूबाजूला नारळी पोफळीच्या झाडांसोबत ईतरही फळा फुलांची झाडं गुण्या गोविंदाने डोलत असत.त्यात भेंडी, कण्हेर, तगर, जास्वंद, लिली, अशोक, पुत्रजीवन, गुलमोहर, सीताफळ, रामफळ, पपई, निर्गुडी ईत्यादी निरनिराळी झाडं होती. घरा शेजारी मोठ्ठी विहीर होती, या विहीरीला एक फार मोठा लोखंडाचा रहाट होता आणि असं ऐकिवात आहे कि तो रहाट फिरवायला बैल लागत असत. या रहाटातलं पाणी छोटे छोटे पाट केले होते त्यातून सगळ्या झाडांना पोहोचत असे. वाडी खूप मोठी असल्याने ही योजना केलेली होती. ही विहीर आजही आहे आणि तिला अजूनही भरपूर पाणी आहे. घरापुढे मोठ्ठं अंगण होतं, त्यापलीकडे आता जिथे शुश्रुषा हॉस्पिटल आहे तिथे एक वाडी होती या वाडीत वडाचे आणि पिंपळाचे मोठाले व्रुक्ष होते त्यापुढे मुख्य रस्ता होता. तो स्टेशन कडे जाण्या साठी होता व या रस्त्यावर त्या काळात रेकले किंवा एक्के, बैलगाडी यातून वर्दळ होत असे. संपूर्ण भाग हा नारळाच्या आणि ईतर विविध झाडांनी भरलेला होता. सुर्यास्तानंतर या मार्गावरुन ये जा करायला कोणी सहसा धजावत नसे. ईतकी निरव शांतता पसरे कि समुद्राची गाज ही घरापर्यंत ऐकू येत असे. अगदी अलिकडच्या काळापर्यंत म्हणजे ८० च्या दशकाच्या उत्तरार्धा पर्यंत आमच्याकडे येणारे पाहुणे म्हणत कि तुमच्या कडे आल्यावर अगदी कोकणात आल्यासारखं वाटतं.  अंगणातून चार दगडी पायऱ्या चढून प्रशस्त अशा ओट्यावर येता येत असे. या ओट्यावर आम्ही मुलं मुली सागरगोटे,  लंगडी, खांब खांब, किंवा ईतर तत्सम खेळ खेळत असू. ऊन्हाळ्याच्या सुट्टीत शेजार पाजारच्या बायका आणि माझी आई मिळून या ओट्यावर पापड, कुरडया, साबुदाण्याच्या चिकोड्या, सांडगे, सांडगी मिरच्या ईत्यादी बेगमीचे वाळवणाचे पदार्थ करत असत आणि ते अंगणात वाळत घालायची कामगीरी आम्हा मुलांवर असे.  या घरा समोर अंगण ही प्रशस्त होतं, तिथे सुट्टीत किंवा ईतर फावल्या वेळी निरनिराळे खेळ चालत त्यात क्रिकेट, फुटबॉल, हॉकी, आबाधूबी, लगोरी पासून गोट्या, भोवरे विटीदांडू पर्यंत सर्व प्रकारचे खेळ चालत. संध्याकाळी ६- ६:३० पासून ८:३० – ९:०० वाजे पर्यंत विजय  क्लबच्या मुला मुलींची खोखोची प्रॅक्टिस चालत असे हा क्लब अखिल भारतात एक नावाजलेला बलाढ्य संघ म्हणून.ओळखला जात असे. आता मात्र या क्लबची अवस्था पार दयनीय आणि हालाखीची आहे. 
तळ मजल्यावर आम्ही रहात होतो त्या जागेत एकूण आठ खोल्या होत्या आणि एकूण क्षेत्रफळ हे १८५० वर्ग फूटाचे होते. आम्ही रहात असलेल्या पाटलांच्या या लाकडी आढं असेलेल्या  घरात अनेक दरवाजे आणि खिडक्या होती. प्रत्येक दरवाजा आणि खिडक्यांचे दरवाजे हे  मजबूत अशा सागवानी लाकडाचे होते. बैठकीच्या खोलीला एक मुख्य दरवाजा आणि ईतर तीन दरवाजे आणि दोन मोठाल्या खिडक्या होत्या , या खिडक्या मुख्य दरवाजाच्या दोन्ही बाजूस होत्या, यांचे गज भरीव पितळी होते. मुख्य दरवाजा हा कळाशार सागवानी लाकडाचा आणि आतून बाहेरुन भक्कम पितळी कड्या असलेला होता. याला आतल्या बाजूने  अडीच तीन फूटाचा पितळी टॉवर बोल्ट होता. मुख्य खोलीला असलेल्या ईतर तीन दरवाजांतून आजूबाजूच्या खोल्यांमधे जाता येत असे. या मुख्य खोलीला आम्ही हॉल म्हणायचो.  या हॉल मधे अनेक दिग्गज व्यक्तींची ऊठबस होण्याचे भाग्य आम्हाला लाभले आहे ऊद्योग जगतातील दिग्गज जी. डी. म्हणजे घनश्यामदास बिर्ला, बांधकाम क्षेत्रातील रहेजा बंधू, सोमाणी ब्रदर्स, राजकारणातील दिग्गज यशवंतरावजी चव्हाण, वसंत दादा पाटील, शरद पवार,  अलिकडील नावं म्हंटलं तर जयंत पाटील, पतंगराव कदम, क्रिडा क्षेत्रातील दिग्गज संदिप पाटील, संजय मांजरेकर, हिंद केसरी मारुती माने, अनेक दिग्गज लेखक, सिने आणि नाट्य क्षेत्रातील मंडळी, शिक्षण महर्षि दादासाहेब रेगे, प्रकाश मोहाडीकर  ईत्यादी ईत्यादी नावं तरी कीती सांगायची? आम्ही खरंच भाग्यवान म्हणून आमच्या घराला या मंडळींचे पाय लागले. स्वातंत्र्यपूर्व काळात तर यावास्तूत स्वातंत्र्य सैनिकांचा वरचेवर राबता असे. भूमिगत स्वातंत्र्य सैनिकांचं तर हे हक्काचं आश्रयस्थान होतं. अरुणा असफ अलीं पासून ते डॉक्टर नरवणे आणि प्रभाकर कुंटें पर्यंत साऱ्यांचे या घरात येणे जाणे होते. नंतरच्या काळात लोकसेना, प्रजासमाजवादी पक्ष, कॉंग्रेस ईत्यादी सर्व पक्षांचे आणि पंथाचे लोक येथे हजेरी लावून गेले आहेत.
तर आमच्या या हॉलच्या दोन्ही बाजूस बेडरुम्स होत्या. त्यापुढे पडवी आणि तिच्या एका बाजूस स्वयंपाकघर आणि एका बाजूस धान्यसाठवण्याची आणि कपडे वाळत घालण्याची खोली होती. पडवीतून पुढे गेल्यावर एक लांबलचक व्हरांडा होता त्याच्या एका बाजूला दोन बाथरुम्स होत्या त्यापैकी एक धुणी भांडी करण्या साठी बाथरुम होती याला थेट बाहेरुन येण्या जाण्यासाठी एक दरवाजा होता. या दरवाजातून नोकर माणसांची ये जा होत असे. या बाथरुमच्या पुढे न्हाणीघर होतं. व्हरांड्याच्या दुसऱ्या बाजूस  एक बाथरुम होती आणि त्यापुढे एक छोटा व्हरांडा ओलांडल्यावर संडास. घरा पुढील ओटा चढून आल्यावर डाव्या हाताला एक खोली होती तीचा गेस्टरुम म्हणून वापर होत असे. अशा या आठ खोल्यांच्या घरात माझी जन्मल्या पासुनची ऊणीपुरी तब्बल पंचवीस ते सव्वीस वर्ष खुप मजेत आनंदात आणि सुखेनैव गेली.
कालपरत्वे या घराच्या अंगा खांद्यावर वार्धक्याच्या खुणा दिसू लागल्या. दर पावसाळ्यात कौलं बदलणं , साफसफाई करणं, नियमित करावी लागणारी डागडुजी, रंगकाम, महानगरपालीका आणि महसुल खात्याचे कर भरणं या गोष्टी करणं वाढत्या महागाई मुळे जिकिरीच्या होऊ लागल्या. भाडेकरु एकच, महीन्याकाठी मिळणारं भाडं जेमतेम रुपये एकशे सत्तर. त्यात हे सगळं कसं भागायचं? ऊत्पन्नाचं आणि खर्चाचं गणित काही केल्या जुळेना. सरते शेवटी पाटील कुटुंबियावर एक सर्वात अप्रिय आणि मनाला अत्यंत क्लेशकारक निर्णय घ्यावा लागला. हे वास्तुकलेचा सुंदर नमुना असलेलं घर नाईलाजा पोटी एखाद्या बिल्डरला विकण्याचा निर्णय अत्यंत जड अंतःकरणाने पाटील कुटुंबियांकडून घेतला गेला. निर्णयाची अंमलबजावणी करण्या करीता १९८५ साल उजाडलं. के रहेजा या बांधकाम कंपनीला जागा ताब्यात देण्याचे दिवस जवळ येत होते. जड अंतःकरणाने आमच्या आवरा आवरीची यांत्रिकपणे सुरुवात झाली. आणि शेवटी एप्रिलच्या महीन्यात दारात आमचं सामान नेण्यासाठी ट्रक येऊन ऊभे राहीले. सामान ट्रकमधे भरलं जाऊ लागलं आणि आमचे डोळे भरुन आले. आजपर्यंत सर्व प्रसंगात असलेल्या सख्या सोबत्याला अल्विदा करण्याची वेळ आली होती. आता पर्यंत ज्याच्या अंगा खांद्यावर बागडलो, ज्याच्या कुशीत निर्धास्त पणे विसावलो जो आमच्या सर्व सुख दुःखाच्या प्रसंगांचा मूक साक्षीदार होता  बऱ्या वाईट घटनांमधे आमचा साथीदार होता. ज्याने आम्हाला कवेत घेऊन आम्हाला आधार दिला, ऊब दिली, गारवा दिला आमचं रक्षण केलं अशा आमच्या जीवलगाला सोडून जाण्याची वेळ आली होती. मन विषण्ण झालं होतं, आतल्या आत आक्रंदत होतं. ढसा ढसा रडून घेतलं आणि मनावर दगड ठेवून बाहेर पडलो. नेहमी प्रमाणे आज दरवाजा बंद करुन कुलूप लावायचं नव्हतं. दरवाजा ऊघडाच होता आतून नेण्या सारखं म्हंटलं तर काहीच नव्हतं आणि म्हंटलं तर बरंच काही होतं. जे काही उरलं होतं ते नजरेला न दिसणारं पण मनाला जाणवणारं होतं. त्या असंख्य स्मृती आता दगड विटांच्या ढिगाऱ्याखाली गाडल्या जाणार होत्या. साद घालून त्या हुंकार ही देणार नव्हत्या. पंचवीस वर्षाचे बाल्यावस्थेचे, पौगंडावस्थेचे आणि यौवनाचे काही अध्याय लोप पावणार होते. एका नवीन अध्यायाची पुन्हा याच ठिकाणी काही काळाच्या विश्रांती नंतर का होईना पण सुरुवात होणार होती काही दिवसातच या वास्तूवर पोलादी घणांचे घाव पडू लागले. जुनं बांधकाम होतं ते, सहजा सहजी दाद द्यायला तयार नव्हतं. मजूर जेरीस आले होते वास्तू ढीम्म हलायला तयार होत नव्हती. जणू काही तिला हे सारं काही मान्य नव्हतं. सरते शेवटी त्या जीर्ण थकलेल्या वास्तुने हार मानली. एक एक भिंत ढासळू लागली, दरवाजे खिडक्या बिजागीरींसह उन्मळून पडू लागले. संक्रमाणाची पोलादी चक्र फिरु लागली. एका सुखद, विशाल, भव्य, उदात्त भूतकाळाचा अस्त होत होता आणि त्यातच भविष्यातल्या घटनांच्या नांदींचा ऊदय होत होता. कालानुरुप होणाऱ्या बदलाला सामोरं जाऊन  कालाय तस्मै नमः म्हणत त्याचा स्वीकार करणं हे अपरिहार्य होतं.  माझं बालपणीचं घर आठवणीत गेलं होतं. भूतकाळा कडे पाठ फिरवून माझी भविष्याच्या दिशेने वाटचाल सुरु झाली होती. आयुष्यातला तोपर्यतचा सुखद काळ काळाच्याच पडद्याआड अलगद पणे निसटून जात होता. मन तिथेच रेंगाळत होतं, वास्तव स्वीकारायला तयार नव्हतं. सारं काही अकल्पित आणि अस्वीकारार्ह वाटत होतं, पण स्वीकारणं भाग होतं, वर्तमानाचं भान ठेवणं भाग होतं, भूतकाळाला स्मृती पटलांवर चढवून भविष्याला सामोरं जाणं हा निसर्ग नियम प्रमाण मानून मार्गक्रमणा सुरु झाली, आज वयाची पन्नाशी उलटून गेली पण आजही माझं बालपणीचं घर मनात रुंजी घालतंय.
समाप्त.

Comments

Popular posts from this blog

देव आनंद

भक्ती