निरागसाचे बोल

निरागसाचे बोल.
काल एक मजेशीर प्रसंग ऐकला. आता मजेशीर की काय हे ज्याने त्याने आपापल्या विचारांनी ठरवावे. खरं तर मुलांनी आपापल्या घरा जवळील शाळेत शिकावे अशी आपली माझी एक धारणा. एक तर मूल सोडायला जाणं आणि आणायला जाणं हे सोपं. शिवाय वाहतुक कोंडीतून प्रवास करत थकून भागून शाळेत पोचल्यावर शाळेतलं शिकवणं ग्रहण करण्याची शक्ती किती उरत असेल कुणास ठाऊक. शिवाय कोणत्याही प्रकारची आणीबाणी उद्भवली तर आपलं मूल आपल्याला लागलीच घरी आणता येतं. नाहीतर मूल १०-१२ किमी अंतरावर आणि बाप नोकरीवर. असलेच तर आजी आजोबा घरी अशा त्रिकोणी अवस्थेत कुटुंब असतं. पण तरीही आई बापांचा सोस मोठा असतो. आमुकच शाळेत पोर गेलं पाहिजे ही ईच्छा ऊरी असते. शिवाय घरा जवळच्या शाळेत प्रवेश मिळेलच हे ठामपणे सांगता येत नाही. त्यामुळे पालक ही निरनिराळ्या शाळांमधे प्रवेशा साठी अर्ज करुन बसतात इंटरव्ह्यू देत. हेतू हा असतो की मिळेल तिथे प्रवेश घ्यायचा आणि नंतर घराजवळच्या ईच्छित शाळेत प्रवेश मिळाला की दूरच्या शाळेचा मिळालेला प्रवेश रद्द करुन मोकळं व्हायचं. बरं या प्रक्रियेत बऱ्याचशा शाळा प्रवेश रद्द केला तरी पैसे परत देत नाहीत हा भाग आणखीन वेगळा. असो हे होतं नमनाचं तेल.
प्रसंग असा होता की वर लिहिल्याप्रमाणे माझी मुलगी आणि जावई माझ्या नातवाला घेऊन दक्षिण मुंबईतील एका प्रतिष्ठित शाळेत इंटरव्ह्यू साठी गेले होते त्याच ठिकाणी नातवाच्या वर्गातील दुसरा मुलगाही इंटरव्ह्यू देण्यासाठी आला होता पण त्याची सकाळची वेळ होती आणि याची दुपारची वेळ होती. समोरा समोर आल्यावर साहजिकच कुतुहलापोटी चौकशी झाली. समोरची जरा नाराजच होती विचारल्यावर समजलं ते असं की तिच्या मुलाने इंटरव्ह्यूमध्ये तुला शाळेत जायला आवडतं का? असं विचारल्यावर मला शाळेत जायला अजिबात आवडत नाही असं अगदी निरागसपणे सांगून टाकलं. वर वर पहाता हा प्रसंग अगदीच किरकोळ वाटेल. आज अचानकपणे माझ्या मनात असा प्रश्न आला की हा निरागस, भाबडेपणा जगाच्या शाळेत चालेल का? की तो अवगुण ठरेल? सर्वप्रथम त्याला खरं बोलल्या बद्दल घरी गेल्यावर घरातल्या चार लोकांकडून स्पष्टवक्तेपणा, खरेपणा कसा करु नये हे सांगितलं जाईल. आणि ईथूनच जगात कसं वागावं याचे पाठ देणं सुरु होईल. आणि एक निरागस जीव समाजाच्या भट्टीत तावून सुलाखून साच्यातून निघून एक प्रॉडक्ट म्हणून बाहेर पडेल. लौकीकार्थाने जगण्यायोग्य आणि भौतिक सुख, उपभोग्य जीवन जगण्यायोग्य होईल. असलीच थोडीशी माणुसकी शिल्लक तर ठीक नाहीतर तो ही एक निर्विकार भावनाशून्य चेहरा होऊन या जगाच्या जगण्याच्या शर्यतीत, जगणं विसरुन यशस्वी होण्यासाठी आयुष्याच्या शेवटा पर्यंत ऊरफुटेस्तोवर धावतच राहील. मुलांना जगणं म्हणजे काय? हे केव्हा आणि कसं समजणार? समजेल तेव्हा वेळ निघून गेली असेल का? मॉल मधे उंची प्रॉडक्टस विकत घेणे, ऊंची परफ्यू्म्
स वापरणे, अलिशान गाड्या वापरणे, उंची मद्याचे घुटके घेत काचेच्या चकचकीत तावदानांमधून आपल्यावर रोखल्या गेलेल्या आशाळभूत, भुकेल्या नजरांकडे निर्ढावलेल्या मनाने  दुर्लक्ष करुन चमचमीत पदार्थांवर ताव मारणे यालाच यशस्वी जीवन म्हणतात का? असंवेदनशील असणं हेच सुशिक्षित, सुसंस्कृत असण्याचं लक्षण आहे का? तोंडदेखले पणा, खोटेपणाने व्यक्त होणं व्यक्त न होणं यालाच रीत म्हणतात का? नाटकीपणाने जगणं यालाच मॅनर्स, एटीकेट्स म्हणतात का? प्रश्न हाच पडलाय की शिक्षणाचं महत्व काय आहे हे आम्हाला समजतंय का? निरागस निर्मळ मनाच्या देवाघरच्या फुलांना लबाडी, बिलंदरपणा, खोटेपणा, असंवेदनशीलपणा अंगी बाणवून त्यांना जगाच्या जगण्याच्या शर्यतीत ढकलणे हेच का आमचं पालकत्वाचं कर्तव्य आहे? पुढच्या पिढीचं जीवन कसं असेल हा प्रश्न मनात येतो. म्हंटलं तर गोष्ट छोटीच आहे पण विचार करायला लावणारी आहे.
शुभं भवतु।
पुष्कराज चव्हाण
०९-०१-२०२०.

Comments

Popular posts from this blog

देव आनंद

भक्ती