मकर संक्रांतीच्या निमित्ताने

मकर संक्रांतीच्या निमित्ताने.

.... 'लाख बांगडी फुटली, दोन मोती गळाले, २७ मोहरा हरवल्या आणि चिल्लरखुर्दा किती गेला याची गणना नाही.' विश्वासराव आणि सदाशिवराव या दोन मोत्यांसह २७ सरदार आणि सैन्यासह काफिला मारला गेल्याचं हे वर्णन पानिपताच्या युद्धभूमी वरुन थेट पेशव्यांच्या कानावर पडल्यावर त्यांची काय अवस्था झाली असेल?
मकर संक्रांतीच्या दिवशी अदमासे २६० वर्षांपूर्वी (१४ जानेवारी चा दिवस होता तो))  पानिपतच्या युद्धात अपरिमित मनुष्यहानी झाली. विश्वासराव आणि सदाशिव भाऊ यांच्यासारखे दोन पाणीदार मोती माळेतून घरंगळले, तब्बल सत्तावीस सुवर्ण मोहरां सारखे सरदार धारातीर्थी पडले, लढवय्ये सैन्य तर चिल्लर खुर्दा उडवावा तसे कामी आले. तोफ गोळे, दारुगोळा, बंदुकीच्या फैरी ईतक्या वापरात आल्या की धरीत्रीनेही या भडीमाराने भाजून निघाल्यामुळे आकांत केला. आकाशात गिधाडांची ईतकी गर्दी झाली की सूर्यकिरणही महत्प्रयासाने धरती पर्यंत पोहोचले असतील. अगणित मानवी प्रेतांचा आणि मुंडक्यांचा त्या रणांगणावर खच पडला होता. माणसांच्या आणि जनावरांच्या रक्तामांसाचा आणि चिखलाचा रेंदा होऊन त्यावर कोल्ही, कुत्री, माश्या, तुटुन पडली होती. महाराष्ट्रात मळवट आणि चुडा भरलेल्या माघारणी सरणावर सती जायला तयार होत्या. संपूर्ण महाराष्ट्रात दुःखाच्या सावटाने काळोखी पसरली होती. मजल दरमजल करीत महाराष्ट्रापासून दिल्ली पर्यंत केवळ परकीय आक्रमण थोपवण्यासाठी आणि परतवून लावण्यासाठी गेलेले शूरवीर आपल्या प्राणांचं मोल देऊन आक्रमकांना थोपवण्यात संक्रांतीच्या दिवशी यशस्वी झाले. अब्दाली रिकाम्या हातांनी परतून गेला. हिंदुस्थानात काही गवसलं तर नाहीच परंतु स्वतःच्या देशात ही त्याचं काहीच उरलं नाही. मराठी सैन्य आग्या मोहोळ फुटावं तसं गनीमावर तुटुन पडलं होतं. गनीमही चकित झाला. दोन्ही कडून पराक्रमाची शर्थ झाली. रणांगणावर असलेलं एक आंब्याचं झाड तेवढं शिल्लक होतं जे या सगळ्याचं साक्षीदार होतं ते ही हा नरसंहार पाहून ढसाढसा ओक्साबोक्शी रडलं असेल. ते ही या युद्धाची झळ सोसून या वणव्यात काळं ठिक्कर पडलं. आज पानिपतवर ती जागा "काला आम" म्हणून ओळखली जाते. आजचा सूर्य मावळला, आजचा दिवस संपला पण अजूनही वेळ गेलेली नाही आपण पळभर का होईना आपल्या या वीरांचं स्मरण करुया आणि त्यांना आदरांजली वाहुया.
मित्रांनो पळभर का होईना पण मौन बाळगून त्यांचं स्मरण करुया.
🙏🏻पुष्कराज चव्हाण.
15. 01. 2020

Comments

Popular posts from this blog

देव आनंद

भक्ती