तिचं आठवणीत रहाणं

तिचं आठवणीत रहाणं.............

कशी कुणास ठाऊक पण आज पहाटे जरा लवकरच जाग आली. घड्याळात पाहीलं तर पहाटेचे पावणे सहा वाजले होते. बाहेर पहाटेची शांतता होती. हिवाळा असल्याने हवेत सुखद गारवा होता. मी फ्रेश होऊन गॅसवर चहाचं आधण चढवून बाल्कनीच्या स्लायडिंग विंडोज ऊघडल्या, पहाटवारा अलगद हळुवार पणे सोबत गारवा घेऊन मला बिलगत घरात शिरला. त्या स्पर्शाने एकदम ताजं तवानं वाटलं. वाफाळत्या चहाने भरलेली कपबशी घेतली आणि रेडीओ ऑन करुन बैठकीच्या खोलीत कंप्युटर चेअर वर येऊन बसलो. एफ् एम् रेन्बो वाहीनी वर पहाटेची सुश्राव्य गाणी लागली होती. अगदी उजाडण्यापुर्वीची वेळ होती, आणि अचानक ती गवळण लागली, रात्र काळी, घागर काळी.......... सुरेल शब्द कानावर पडत होते, आणि त्याच बरोबर तीची आठवण आली. तीची आठवण आली कि मन काहीस अस्वस्थ होतं, तसं तीचं वय हे जाण्याचं नव्हतं. काळाने अगदी अकाली तिला या जगातनं अलगद ओढून नेलं, पाठीमागे तिच्या दोन गोंडस मुली आणि यशस्वी उद्योजक पति यांचे पाश तोडून तिला नेलं.
तिची माझी पहीली ओळख १९७४-७५ साली मी रामभाऊ परुळेकर विद्यानिकेतन या तळेगावच्या शाळेतून पुन्हा बालमोहन मधे आलो आणि ईयत्ता आठवी “क” मधे दाखल झालो त्यावेळी झाली. मला तो प्रसंग अगदी लख्ख आठवतोय, पहिल्या दिवसाचा तो पहिला तास होता आणि बाई वर्गात आल्या. शिकवायला सुरुवात होणार ईतक्यात पहिल्या दुसऱ्या बाकावर बसलेली “ती”, ऊठुन ऊभी राहीली आणि म्हणाली  “बाई, एक नवीन मुलगा वर्गात आलाय त्याला त्याचं नांव सांगायला सांगा”. मी एकदम चमकलो, चुणचूणीत, चेहऱ्यावर हुशारीचं तेज आणि जोडीला असलेली थोडीशी शिष्ठपणाची झाक, अशी लोभस व्यक्तीमत्वाची “ती” ऊभी होती. दिसताक्षणीच छाप पाडणारं हसू चेहऱ्यावर होतं. बस्स हीच ती ओळख. त्याकाळच्या बालमोहनच्या अलिखित नियमा प्रमाणे मुला-मुलींत बोलणं होत नव्हतं त्यामुळे नंतर विशेष कधी बोलण्याचा प्रसंग येत नसे. परंतु कधीतरी बोलण होत असे. भरपुर आत्मविश्वास आणि धीट पणा होता तिच्यात. शाळेपासून अगदी चार पाच ईमारती सोडून असलेल्या एका ईमारतीत ती रहायची. ऊजळ वर्ण असलेली ती, दोन घट्ट वेण्या घालत असे, मध्यम बांधा आणि नीटनेटकेपणा अंगात असलेल्या “ती” चं स्वभावा प्रमाणेच अक्षरही सुंदर होतं, वर्गात पहीला दुसरा नंबर असे तीचा. मोकळ्या अन् मनमिळाऊ स्वभावाच्या “ती” ची शालांत परीक्षे नंतर कधी भेट होण्याचा प्रसंग आला नाही.
शाळा सुटल्याला २८ वर्ष झाली आणि आमची पुन्हा भेट झाली. रीयुनियन होतं. ईतक्या वर्षांनंतर भेटल्यानंतर आम्ही सारे भरभरुन बोललो. ती सुद्धा बोलली, भरपुर बोलली, पुन्हा भेटायचं ठरलं आणि सर्वांनी एकमेकांचा निरोप घेतला. दरम्यानच्या काळात एकमेकांना तुरळक फोन झाले. पूर्वीचाच मोकळेपणा, तेच हसू, तोच आत्मविश्वास वागण्या बोलण्यात होता पण कुठेतरी जाणवत होतं कि कुठेतरी काहीतरी चुकलंय हिच्या बाबतीत, पण काही कळायला मार्ग नव्हता. तिने घरी यायचं आमंत्रण दिलं होतं आणि मी काही महिन्यांनी पुण्यात एकदा तिच्या घरी जाऊन आलो. नवरा, मुली सारे भेटले आणि आतुन “ ती “ आली. तिला पाहता क्षणी मी कमालीचा हादरलो अगदी मुळापासुन, प्रचंड धक्का बसला मला तिला पाहून. डोक्यावर एकही केस नव्हता पण चेहरा मात्र पूर्वी सारखाच होता. अगदी प्रेमळपणाने हसून माझं स्वागत केलं तिने. तिच्या मुलींची आणि नवऱ्याची ओळख करुन दिली. मुलींपैकी एकीने चहा, पाणी आणून दिलं आणि ते सारे आपापल्या कामावर जाण्याकरता घराबाहेर पडले. मी गप्पच होतो. तेवढ्यात तीनेच म्हंटलं अरे काही दिवसांपूर्वीच परत केमो  घ्यावी घ्यावी लागली म्हणून केस गेलेत. तेव्हा उलगडा झाला कि हेच चुकलंय देवाचं. त्याला समजलंच नाही कि आपण काय करतोय. आमच्या ईकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या आणि काही वेळाने मी निघालो. निरोप द्यायला ती दारवाजा पर्यंत आली आणि मी बाहेर पडलो.
पुढे बरेच दिवस ती आणि तिचं ते असं असणं डोक्यात धिंगाणा घालत होतं. मनात अनेक प्रश्नांचं काहूर माजलं होतं. हे असं का? कुठे काय चुकलंय?  हे दुरुस्त होणार नाही का? तिचं सारं आयुष्यच विस्कटलं गेलं होतं.
शाळेत अत्यंत हुशार असणारी, नेहमी पहील्या एक दोन नंबरावर असणारी, बक्षीसं मिळवणारी ती, मनापासून मोकळं हसणारी, सर्वांशी मित्रत्वाने वागणारी ती पुढे रुईया कॉलेजात बारावी पर्यंत छान शिकत होती. मधेच कधीतरी काश्मीरच्या ट्रीप ला गेली आणि तिथे पर्यटनाला म्हणून पुण्याहून आलेल्या एका मुलाच्या प्रेमात पडली. आयुष्य हळू हळू वळण घेत होतं. भावी जोडीदाराच्या सांगण्यावरुन मेडिकल ला जाऊन डॉक्टर होण्याचा विचार तिने बदलला आणि पुढे बी. एस्. सी केलं. काश्मीर ट्रीप हा आयुष्याचा टर्निंग पॉईंट ठरला. आणि भविष्यात एक निष्णात डॉक्टर म्हणून नावजली गेली असती अशी “ती” एक संसारी स्त्री म्हणून आपली कुटुंबाच्या बाबतीतली कर्तव्य बजावू लागली. आपल्या साऱ्या महत्वाकांक्षा बाजूला ठेवून स्वतःकडे दुय्यम भूमिका घेऊन संसारात रमू लागली. मनातली उर्मी काही शांत बसू देत नव्हती. तीने नेचरोपथीचा दोन वर्षाचा कोर्स करुन त्यातल्या त्यात आपली ईच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न केला.
मानवी आयुष्यातली अनिश्चितता हा नियतीचा एक आवडता खेळ. यात कोण, कधी आणि कसा सापडेल आणि त्याचं काय होईल हे प्रत्यक्षात त्या नियतीलाही कदाचित ठाऊक नसेल. हसरी, खेळकर ती प्रत्यक्षात एक शापित जीवन जगत होती. आयुष्य कलाटणी घेत होतं आणि भविष्यात होऊ घातलेली ऊलथा पालथ तिला जाणवत नव्हती.
आज तीची आठवण येण्याच कारण म्हणजे. सकाळी रेडिओ वर लागलेली ती गवळण, “ रात्र काळी, घागर काळी..... मला ही गवळण एकदा अचानक आठवली आणि मी सतत ती गुणगुणत होतो पण काही केल्या तीचा अर्थ काही समजत नव्हता. बऱ्याच जणांना विचारलं पण संपूर्ण गवळण आणि अर्थ काही केल्या कोणी सांगू शकत नव्हतं. शेवटी तिची आठवण झाली. म्हंटलं तिला विचारुया. सरळ फोन लावला आणि तिला विचारलं. म्हणाली दोन दिवस दे तुला ऊत्तर पाठवते. सांगितल्या प्रमाणे तिने एस एम एस करुन ऊत्तर पाठवलं आणि बरेच दिवसाची माझी अस्वस्थता संपवली.
पुढे काही महीन्यांनी ऐकिवात आलं कि तिची तब्येत फारच बिघडली आहे म्हणून. मी आणि माझा अगदी जवळचा मित्र हिमांशु पंडित तिला भेटायला गेलो. आधी फोन केला होता. कोणालाही न भेटणारी ती, तिने स्वतः दरवाजा ऊघडून आमचं हसतमुखाने स्वागत केलं. आश्चर्याची बाब म्हणजे अशा अवस्थेतही तिच्या घरात ती एकटी होती. आम्ही तिघांनीही भरपुर गप्पा मारल्या, मग म्हणाली आता तुम्ही जेवूनच जा. जेवण तयार करुन बाई गेल्या आहेत आपण तिघं जेवून घेऊ. तुम्हीच गरम करा आणि आपली तिघांची ताटं घेऊन वाढून घ्या. ती खुर्चीत बसून कुठे काय ठेवलंय ते सांगत होती आणि आम्ही घरात ईकडची काडी तिकडे न करणारे तिच्या सांगण्याप्रमाणे कामं करत होतो. तिघंही गप्पा मारत मारत जेवलो आणि नंतर थोड्या वेळाने तिचा निरोप घेतला. आनंदी वाटली. म्हणाली बरं वाटलं तुम्ही आलात म्हणून. आम्ही मुंबई ला परत आलो. काही दिवसांतच ती गेली. अचानक सगळ्या मित्र, मैत्रिणींचा हात अलगद सोडवून घेऊन ती हवेत विरघळावी तशी या जगातून निघून गेली. वाऱ्याची झुळूक अंगावरुन निघून जावी तशी ती गेली.
तसं पहायला गेलं तर एक शालेय वर्गमित्र या पलिकडे आमचं एकमेकांशी  काहीच नातं नव्हतं. संपर्कही अगदीच तुरळक होता. पण तिचं आठवणीत रहाणं हे फार विलक्षण आहे.
रेडिओ वर दुसरं गाण सुरु झालं होतं. वाऱ्याची गार झुळूक अंगावरुन जात होती, खिडक्याचे पडदे मंद गतीने हलत होते आणि मी तिचं आठवणीत रहाणं अनुभवत होतो.
पुष्कराज चव्हाण
दि. १३/०१/२०१६.

Comments

Popular posts from this blog

देव आनंद

भक्ती