रिआंश

‘काल एका नवीन सिनेमातला डायलॉग ऐकला. खूप आवडला म्हणून शेअर करतो. आजोबा आणि नातवातला संवाद आहे.
      नातू: आजोबा,नातू म्हणजे काय हो?
     आजोबा: (जरा विचार करून) नातू म्हणजे ना, आजोबांच्या आयुष्यातला सगळ्यात शेवटचा Best friend. नातवा आधी खूप मित्र असतात. पण नातवा नंतर कोणीच best friend होत नाही.
     नातू: आजोबा,मग आजोबा म्हणजे काय हो?
     आजोबा: आजोबा म्हणजे नातवाच्या आयुष्यातला पहिला Best friend. जो शेवटच्या श्वासापर्यंत नातवाचा मित्रच असतो.
    नातू: मग आपण दोघं कोण?
    आजोबा: मी तुझा संपत आलेला काळ
                   आणि तु माझी नवी सुरूवात.’
हा मेसेज माझ्या भावाने आणि पत्नीने दोघांनीही मला पाठवला आणि मला  माझ्या नातवाच्या, चि. रिआंशच्या दोन अडीच वर्षापूर्वी म्हणजे त्याच्या जन्माच्यावेळी मनात आलेल्या विचारांची आठवण झाली. खरंच, 'रिआंश', माझा नातू जन्माला आला तेव्हा माझ्या मनात शेवटच्या दोन ओळी आल्या होत्या. आता नवीन अंश जन्माला आला आहे, आता आपला परतीचा प्रवास सुरु झालाय. हळू हळू आपण पुढे सरकत जाणार. आकाशात एक वेळ अशी असते की ज्यावेळी उगवणारा आणि मावळणारा दोघांचंच अस्तित्व नभांगणात असतं, ईतर कुणीही नसतं आणि जर असलंच तर त्यांची दखलही घेण्याची निदान या दोघांना तरी आवश्यकता वाटत नसते. त्या क्षणी आम्ही दोघंही त्याच अवस्थेत होतो. नभांगणात जसे ते दोघं एकमेकाकडे भान हरपून पहात असतात तसेच आम्ही दोघंही त्या पहिल्या भेटीच्या वेळी केवळ एकमेकांकडेच पहात होतो. सुखावलेल्या मनाने आणि मायेने ओथंबलेल्या नजरेने. सृष्टीच्या नियमानुसार प्रत्येकाचा प्रवास उगवतीकडून मावळतीकडे सुरुच असतो. त्यात सुख दुःखाचे भावनिक चढ उतार, भरती ओहोटी हे स्थित्यंतराचे प्रसंग येतच असतात  सामाजिक स्थान, गरीबी श्रीमंती हा सारा मनाचा खेळ असतो. संपत आलेला काळ नव्याने सुरु झालेल्या काळाचं मनोभावे स्वागत करत असतो. त्याच्या आगमनाने हर्षोल्हासाचे भाव मनामधे ईतकी गर्दी करुन असतात की ईतर कुठल्याही भावनांना तिथे जागाच नसते.
रिआंश जेव्हा लेबर रुम मधून दुपट्यात गुंडाळलेल्या अवस्थेत डॉक्टरांच्या कुशीत बाहेर आला तेव्हा मला असं वाटलं की जणू काही मीच माझ्या मुलीच्या पोटी जन्म घेतलाय. माझाच पुनर्जन्म झाल्याचा भास मला झाला. त्यानेही डोळे बंद असलेल्या अवस्थेत आपली नाजूक गुलाबी जीवणी पसरुन असं एक ओळखीचं अमूल्य हास्य त्याची पहिली भेट म्हणून दिलं की त्याचं शब्दात वर्णन करणं शक्यच नाही ते अनुभवायलाच हवं. आपलाच अंश आपल्याकडे पाहून हसत असतो. आपलंच बाळरुप आपल्याशी हसल्याचा भास होतो. हे ओळखीचं हसू म्हणजे जणू काही आपली खरोखरच जन्मोजन्मीची ओळख असावी असं असतं. सगळ्यात पहिल्या बेस्ट फ्रेंडला त्याच्या सगळ्यात शेवटच्या बेस्ट फ्रेंडने दिलेली ती पहिली वहिली मित्रत्वाची भेट असते. बाळंतीणीच्या खोलीत आल्यावर फोटो सेशन्स झाली, ते फोटो मित्र मैत्रीणी नातेवाईक यांच्या बरोबर शेअर केले गेले. नवागताच्या आगमनाची वर्दी साता समुद्रापार क्षणार्धात पोहोचतली सुद्धा. प्रत्येक नवीन घटना ही उत्सवी स्वरुपाची झाली. मग छंद जडला त्याला मांडीवर घेण्याचा, आपल्या बाल्यावस्थेत जी अंगाईगीतं गाऊन आपल्याला जोजवलेलं असतं तीच अंगाई गीतं त्याच चालीत म्हणून त्याला झोपवण्याचा, झोपेत असलेला तो निरागस चेहरा निरखत रहाण्याचा, झोपेतच खुदकन हसणाऱ्या बाळाला पहाण्याचा, दचकल्यावर त्याच्या ईवल्याशा छातीवर हात ठेवण्याचा, त्याच्या गालावर गाल टेकवून त्याला आश्वस्त करण्याचा. त्याला वारंवार हुंगण्याचा,  त्याच्या अंगाला येणारा एक विशिष्ट प्रकारचा हवा हवासा वाटणारा गंध उरात भरुन घेण्याचा. याव्यतिरिक्त आता दुसरं काही सुचतच नव्हतं. आयुष्यात आणखी काय हवं असतं? आता ईथून पुढे बेस्ट फ्रेंडने बेस्ट फ्रेंडला आधार देत हळूहळू जीवन प्रवास करायचा आपल्या जवळचं आपलं असलेलं ज्ञान, अनुभव त्याला देऊन होता होईल तो त्याचं जीवन उजळवण्याला हातभार लावायचा त्याचं थोडं नवीन ज्ञान आत्मसात करायचं आणि  सुपंथ धरुन आनंद यात्रा साजरी करायची. दोन मुलींच्या जन्मानंतरच्या आनंदाच्या प्रसंगानंतर फार मोठ्या कालावधीच्या अंतराने मिळालेला हा बेस्ट फ्रेंडच्या भेटीच्या सुखाचा परमोच्च बिंदू  परम सुखावह असाच आहे.

पुष्कराज चव्हाण
१ ऑगस्ट, २०१८


Comments

Popular posts from this blog

देव आनंद

भक्ती