धर्मसत्ता, राजसत्ता आणि संभ्रमित वर्तमान.

धर्मसत्ता, राजसत्ता आणि संभ्रमित वर्तमान.

शालेय शिक्षणात आपल्याला ईतिहास या विषया सोबत नागरिक शास्त्र हा एक विषय अभ्यासक्रमात होता. त्यात शिकल्याचे आठवते की लोकशाहीचे तीन प्रमुख आधारस्तंभ असतात आणि त्यातील एक म्हणजे लोकसभा किंवा विधीमंडळ ज्याला हिंदीत संसद असं म्हणतात आणि ज्या ठिकाणी लोकहिताचे कायदे बनवले अथवा पारीत केले जातात, न्यायपालिका हा दुसरा स्तंभ ज्या द्वारे विधी मंडळाने बनविलेल्या कायद्यांच्या आधारे न्यायदान कले जाते, त्यानंतर तिसरा स्तंभ म्हणजे प्रशासन ज्याद्वारे राज्यात कायदा, सुव्यवस्था आणि प्रशासनाचे काम होते. अभ्यासक्रमात त्यावेळी नसलेला आणि अलिकडे सर्वमान्य असलेला असा एक चौथा स्तंभ यात सामील झाला आहे तो म्हणजे प्रसार माध्यमं. या चारही ठिकाणी “उडदामाजी काळे गोरे” या न्यायाने गांभीर्याने, सत्शील व अभ्यासू वृत्तीने व न्यायाने वागणारी जशी माणसं आहेत तशीच उथळ, भ्रष्ट मनोवृत्ती, गुन्हेगारी प्रवृत्तीची पार्श्वभूमी असलेलीही माणसं आहेत. आताच्या काळात आणखीन एक पाचवा स्तंभ यात जोडला जाऊ लागला आहे, आणि तो म्हणजे धर्मसत्ता. आणि हा पाचवा स्तंभ हाच सध्या चिंतेचा विषय होऊन बसलेला आहे.
धर्मसत्तेने राजसत्तेवर अंकुश ठेवता कामा नये किंवा राजकारणात दखल देऊ नये तसंच राजसत्तेने धर्मकारणात ढवळा ढवळ करु नये असे अलिकडेपर्यंत पाळले गेलेले संकेत आहेत. एकमेकांचा वेळी प्रसंगी सल्ला घेणे किंवा चर्चा करणे ईथपर्यंत ठिक आहे. परंतु अंतिम निर्णय घेताना त्या निर्णयावर एकमेकांचा एक दुसऱ्यावर प्रभाव असता कामा नये. धर्मसत्ता ही एका विशिष्ट लोक समूहाच्या पुरता मर्यादित असून राजसत्ता ही कोणत्याही विशिष्ट लोकसमूहा पुरता मर्यादित नसून तिचे उत्तरदायित्व हे सर्व प्रजेला असते. परंतु हे निकष आज सर्रासपणे गुंडाळून ठेवल्याचे दिसते. सध्यस्थितीतल्या काही प्रसंगांवरुन असं निदर्शनास येते की धर्मसत्ता ही राजसत्तेवर आपला प्रभाव वाढविण्यात बऱ्यापैकी यशस्वी होत आहे. आणि खरी चिंतेची बाब हीच आहे. आजकाल धर्मकारणातली मंडळी राजकारणात सर्रासपणे वावरताना दिसतात ईतकंच नव्हे तर राजकारणात पदं ही भूषविताना दिसतात. धर्मकारण किंवा अध्यात्मात असलेल्या या मंडळींचा विलासी, ऊपभोगी आणि ऐषोआरामी वृत्ती असण्याकडे कल वाढू लागलेला असून त्यावरच समाधानी न रहाता सत्तालोलुपता वाढीस लागून सत्ता काबीज करण्याकडे ही त्यांचा कल वाढू लागलेला दिसतो. हे ही नसे थोडके म्हणून की काय आता यांच्यात भांडवल शाही वृत्तीचा ही शिरकाव होताना आढळून येते.
विजीगिषु वृत्तीला विनयशीलता आणि सुसंस्कृत पणाचे कोंदण असेल तर ती आदर्शवत आणि ईतरांना प्रभावित करणारी ठरते व ती लोकसंख्येवर राज्य न करता लोकांच्या मनावर अधिराज्य करते. परंतु त्यास दंभ, उन्माद आणि गर्वाचा दर्प येत असल्यास ते सर्वांनाच असह्य होते आणि हाच कालानुरुप होणाऱ्या परिवर्तनाचा एक सर्वसाधारण नियम आहे. सध्याचे चित्र हे राजकीय आणि धार्मिक उन्मादाचे असल्याचे दिसते आणि यातूनच अराजकतेच्या दिशेने आपली वाटचाल सुरु झाल्यासारखे वाटते. एकूणच मानव जातीला जर कोणता मोठा शाप लाभलेला असेल तर तो जाती संस्थेचा आणि धार्मिक विद्वेशाचा. माणसाचं माणसाशी दैनंदिन व्यवहारात एकमेकांशी वागताना याचा कुठेही लवलेश नसतो परंतु आत कुठेतरी मनाच्या किंवा मेंदूच्या कोणत्यातरी कोपऱ्यात हा जाती विषयक किंवा धर्मविषयक असलेला अवाजवी अभिमान सुप्तावस्थेत जागृत असतो आणि त्याचा त्याठिकाणी वावर सदैव, अव्याहतपणे सुरुच असतो. ज्यावेळेस तो उघडपणे प्रकट होतो त्यावेळेस माणसाची ती विजीगिषु वृत्ती अचानक जागी होते आणि आक्रमकपणा धारण करते. अशा वेळी मैत्री, संबंध, सहकारी, सहाध्यायी हे संबंध संपुष्टात येतात. या वृत्तीला मग यथावकाश, पद्धतशीरपणे सदैव चेतवत रहाण्याचे काम त्या त्या जाती धर्माचे नेते मंडळी करीत असतात. आता नेता या शब्दाचा मला समजलेला अर्थ असा की “जी व्यक्ती आपल्या आदर्श वर्तणुकीने लोकांना प्रभावित करुन सन्मार्गावरुन आपल्या मागून यशस्वीपणे ईप्सित ध्येयाप्रत नेते तो नेता” परंतु हल्ली सर्वच राजकीय व धार्मिक नेत्यांच्या बाबतीत ठळक पणे दिसणारी एक बाब ही आहे की लोकांनी त्यांचं अनुकरण करुन त्यानुसार आपली वर्तणूक ठेवण्या ऐवजी ही नेते मंडळीच लोकानुनय करुन लोकांना खूष ठेवण्याच्या मागे लागलेली असतात. लोकांच्या हिताचं काय आहे त्यापेक्षा लोकांना काय आवडेल ते देण्याकडे यांचा कल असतो आणि त्यासाठी सारी धडपड आणि खटाटोप चाललेला असतो. यात आपण समाजाचं किंवा येणाऱ्या भावी पिढीचं किती नुकसान करतोय किंवा भविष्यात याचे होणारे परीणाम किती गंभीर असतील याचा विचारही यांच्या मनाला शिवत नाहीत. आज ज्याच्याकडे आपल्याला आदर्श म्हणून पहाता येईल असा एक ही धार्मिक अथवा राजकीय नेता शोधूनही सापडत नाही.
अलिकडच्या काळात राजसत्ता आणि धर्मसत्ता यांनी न्यायपालिकेच्या क्षेत्रात चालवलेली ढवळाढवळ किंवा अतिक्रमणाची उदाहरणेही वाढत चालल्याचे पहातो. त्यात उघड उघड न्यायव्यवस्थेवर तोंडसुख घेणे, नींदा करणे, न्यायाधीशांची एखाद्या दाव्यात मनाप्रमाणे निकाल न दिल्याने बदली करणे, प्रसंगी हिंसाचार, जाळपोळ, हत्या यांसारखे प्रकार करणे. ही सर्व ऊदाहरणे पहावयास मिळतात. प्रकरण न्याय प्रविष्ट असताना निदर्शनं करणे, न्यायाधीशांवर किंवा वकीलांवर दबाव आणणे यात आता लोकांना गैर काही वाटेनासे झाले आहे. लोकशाहीचा पहिला स्तंभ आणि पाचवा स्वयंघोषित स्तंभ लोकशाहीच्याच तिसऱ्या स्तंभाला खिळखिळा करताना हतबलपणाने पहाण्याचे हे दिवस आपणच नाही का आपल्यावर ओढवून घेतले? हा प्रश्न एकदा आपण प्रत्येकाने स्वतःला विचारायला हवा. आपल्याला नक्की काय हवंय हेच आपल्याला कळेनासं झालंय की काय? चंगळवादाची आणि भौतिकसुखाची साधनं आपल्याला सहजतेने उपलब्ध करुन देऊन त्यात आपल्याला मग्न ठेऊन या अपप्रवृत्ती आपलं उखळ पाढरं करुन घेत असताना आपण आपल्या भावी पिढीच्या भवितव्याला तिलांजली देत आहोत हे ही लक्षात न येण्याईतपत आपण बधीर झालेलो आहोत का?
लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणवल्या जाणाऱ्या प्रसारमाध्यमांनाही आता या सर्वांतून अलिप्त रहाता येत नाही. समाज प्रबोधनाच्या महत्वाच्या कार्याची जबाबदारी असलेल्या यास्तंभालाही कशाचे सोवळे राहिलेले दिसत नाही. कालौघात हा ही आता एक व्यवसाय झाल्याने त्या। अनुषंगाने जाणे त्यांनाही भाग आहेच. जाहीराती मिळवणे, कागदाचा कोटा व ईतर व्यावसायिक गरजांसाठी यांनाही प्रसंगी राजसत्ता आणि धर्मसत्तेपुढे लाचार व्हावे लागतेच की मग आशावेळी अधःपतन होण्यापासून कसे राहील? मला सांगा आजकालच्या या धावपळीच्या युगात वर्तमानपत्रातले अग्रलेख किंवा प्रबोधनपर लेख किती लोक वाचत असतील? माझ्या मते केवळ निवृत्त झालेले लोक सोडले कींवा ज्यांच्याकडे अगदीच भरपूर वेळ आहे अशी काही मर्यादित मंडळी हे अग्रलेख वाचत असावीत. त्यात आपण असं धरुन चाललो की ही मंडळी तरुण पिढीला मार्गदर्शन करतील. अरे पण तरुण पिढी यांच्या तावडीत सापडायला तर पाहिजे. आणि समजा सापडलीच तर त्या पिढीच्या मनाला या गोष्टी भिडल्या तर पाहिजेत? त्यांची मनं तितकी संस्काक्षम राहिली आहेत का? शनिवार संध्याकाळच्या ग्लासांच्या किणकिणाटात किंवा चमकणाऱ्या मॉल किंवा हॉटेल मधील खाद्य संस्कृती किंवा बॉलिवूड च्या चमचमाटात आणि झगमगाटात या पिवळट कागदावर खरडलेले विचार कोणाला दिसतात आणि ऐकू येतात? एखाद्या डे चा डे लाईट मधे भर रस्त्यात खून होतो आणि त्यात त्याच्याच क्षेत्रातल्या व्यक्तीचा हात असतो यात आलंच की सारं काही. मग वाहीन्याही कोणाचं तरी मांडलिकत्व पत्करतात. पत्रकारही संध्याकाळी कोण बसवतंय याची चाचपणी करत असतात. लाळघोटेपणा करत निर्भिड पत्रकारीता चालू असते.
वरील या सर्व प्रकारात समाजातला खालचा, उपेक्षित वर्ग आंधळा होऊन दळत असतो आणि निर्ढावलेली, निर्लज्ज कुत्री पीठ खात असतात. आणि दर पांच वर्षांनी ही निर्वस्त्र झालेली अराजकता लोकशाहीचं सोंग घेऊन निर्लज्जपणे आपल्याला खुणावत असते.
पुष्कराज चव्हाण
दि. २७.०८.२०१७

Comments

Popular posts from this blog

देव आनंद

भक्ती