आजोळच्या आठवणी
आजोळ च्या आठवणी.
आज माझ्या मित्राच्या, नितीन तगारेच्या बंगल्यावर तळेगाव मुक्कामी, सकाळचं ऊन शेकत बंगल्या बाहेर खुर्च्या टाकून बसलो होतो. हवेत गारठा छान होता, आम्ही, म्हणजे मी आणि नितीन गप्पा मारत मारत गरम गरम चहाचा आस्वाद घेत होतो. पायाशी श्वान कुटुंबीयही ऊन्हाची ऊब घेत बसले होते. हवेतल्या त्या गारठ्याने आणि सकाळच्या शांत वातावरणाने मला माझ्या बालपणीच्या, आजोळी सुटीत घालवलेल्या काळात अलगद नेऊन ठेवलं.
माझं आजोळ नाशिकचं. आम्ही लहान असताना सुटी पडली कि नाशिकला आजोळी जाण्याची ओढ लागायची. आणि मग प्रवासाला निघायचा दिवस जवळ आला कि आदल्या रात्री झोप म्हणून काही लागत नसे. रात्री कमीत कमी तीन चार वेळा तरी आई वडीलांना सकाळ झाली का म्हणून मी विचारे किंवा माझ्या चुळबुळीची चाहुल लागून आईच झोपेतल्या झोपेत दटावे “झोप रे अजून वेळ आहे सकाळ व्हायला”. आई सकाळी लवकरच ऊठे आणि प्रवासात खायला म्हणून भाजी – पुरी किंवा तिखट -.मीठाच्या पुऱ्या, लोणचं वगैरे बांधून घेत असे. एरवी सुटीच्याच काय पण शाळा असे त्या दिवशी सुद्धा लवकर न ऊठणारा मी थोड्याशा खुडबुडीने लगेच ऊठून बसत असे. स्वत:ची स्वत: तयारी करुन तयार होत असे. आणि मग आमची निघण्याची लगबग सुरु होई. १९६७ – ६८ सालात पर्यटन क्षेत्र हे आजच्या ईतके प्रगत झालेले नव्हते, त्या मुळे त्या काळाला साजेशी ट्रंक, टीफिन आणि पितळेचा फिरकीचा पाणी पिण्याचा तांब्या घेऊन आम्ही प्रवासाला सज्ज होत असू. मी, माझी आई आणि दोघी बहीणी असे आम्ही चौघंच जण. वडिल गल्लीच्या कोपऱ्यावर जाऊन टॅक्सी घेऊन येत असत. त्यावेळी टॅक्सीज या अँबेसेडोर, हीलमन, मॉरीस अशा ऐसपैस गाड्या असत त्यामुळे ड्रायव्हर शेजारी दोन माणसं सहज दाटीवाटी न करता बसू शकत. मला खिडकी पेक्षा ड्रायव्हर शेजारी बसायला खूप आवडे. मी सतत ड्रायव्हरचं निरीक्षण करीत बसे. बहुतेकदा सरदारजी ड्रायव्हर असत. त्या काळात बॉम्बे सेंट्रल डेपो किंवा दादर टी. टी. सर्कल येथून बसेस निघत असत. आम्ही बऱ्याचदा दादर टी.टी. हून बस मधे बसायचो. त्याकाळी बसेस सुद्धा स्वच्छ असत. लाल रंगाची बस आणि त्याला पिवळा पट्टा दरवाजा पर्यंत सरळ आणि दरवाजा कडे आल्यावर तो पट्टा वळण घेऊन खालच्या दिशेला अगदी खालच्या पायरी पर्यंत येऊन थांबे. एस् टी त चढतानाही पायऱ्यांवर असलेली कंडक्टरची घडी घालता येणारी सीट खुणावत असे, मला तीचंच कुतुहल फार. माझ्या प्रवासातल्या आवडीच या अशा फिर विचित्र असत. पळती झाडे पाहूया वगैरे काही नाही सगळं बकवास. ड्रायव्हरच्या शेजारी बसणं, कंडक्टर बरोबर सलगी करुन त्याच्या त्या सीटवर थोडावेळ का होईन बसायला मिळवणं, टांगे वाल्याच्या शेजारी बसून लगाम आणि चाबुकावर ताबा मिळवणं हे असले आई वडीलांना माझ्या भविष्या बद्दल चिंतेत टाकणारे पण मला थ्रिलींग वाटणारे ऊद्योग मी प्रवासात करत असे.
असो, तर सकाळी साडे सहा सात वाजता आमचा प्रवास सुरु झाला कि मजल दर मजल करत तो दुपारी साडेबारा एक च्या सुमारास नाशिकला घरी येऊन संपत असे. १८८ कि.मी. चा प्रवास करायला तब्बल साडेचार पाच तास लागत. आजच्या कळात आजच्या पिढीला हे फार विचित्र वाटेल. पण त्याकाळात ईतकी प्रगत वाहनं आणि रुंद, सपाट रस्ते नव्हते. दादरहून बस निघाली कि ठाणे, कल्याण, भिवंडी, शहापूर, आसनगांव, कसारा, ईगतपुरी ईथल्या डेपोंना भेट देत देत गाडी नाशिक आगारात दाखल होई. प्रत्येक डेपोत बस थांबली कि कंडक्टर सांगत असे गाडी फक्त दहा मिनीटं थांबेल, आणि ड्रायव्हर कंडक्टरची जोडगोळी एकत्र चहा नाष्ता करायला उतरे. त्याकाळात माणूस वेळेचा गुलाम नव्हता, त्यामुळे सारं काही निवांत पणे चाले. डेपोतला माणूस येई तो पाण्याची नुसतीच नळी असलेली झारी घेऊन येई आणि रेडीएटर मधे पाणी घालून एस् टी ला थंड करी. बाजूच्या खिडक्यामधून लेमनच्या गोळ्या, पेपर मिंट, आलेपाक ईत्यादी विकणारे विक्रेते, चहा – वडे वाले, रेवडी – गंडेरी वाले, केळी, मोसंबी, संत्री ईत्यादी फळं विक्रेते त्यांच्या खास ठेवणीतल्या आवाजात प्रवाशांना साद घालत फिरत. डेपोच्या कोपऱ्यात नाथपंथीय रसवंती गृह चरकाला बांधलेल्या घुंगरा आवाजाच्या लयीने भसाड्या आवाजात गाणी म्हणत रस काढून ग्राहकांना पाजण्यात मग्न असत. ग्लासांचे छोटे छोटे क्रेट त्याच्यावर घोंघावणाऱ्या माश्यांसकट घेऊन त्या रस वाल्याकडची पोरं एस टी च्या अवती भवती विकण्या साठी फिरत असत त्यात जोडीला असला तर एखादा जिंजर लेमन वाला बाटल्यावरुन ओपनर फिरवत ट्रींग ट्रींग करत फिरत असे. शहापुर, आसनगांव, ईगतपुरी अशा ठिकाणी रेल्वे लेवल क्रॉसिंगला गाडी ऊभी राहीली कि रुईच्या किंवा पळसाच्या पानांच्या द्रोणांतून करवंदं, जांभळं, खीरा (काकडी), शेंगा, राय आवळे, बोरं वगैरे रानमेवा विकणाऱ्या कातकरी, आदीवासी बायका पोरं गाडीला येऊन बिलगत. कसाऱ्याला डेपो नव्हता त्यामुळे बस हाय वे वरच एका हॉटेला समोर थांबे या हॉटेलात वडे छान मिळत. हा अशा प्रकारे रमत गमत सारा प्रवास होत असे. आता खूप बदल झालाय. रस्ते सरळ झालेत, सपाट झालेत आणि प्रवासाची ती मजा ही आता भुई सपाट झालीय. चांगली चांगली हॉटेलं आली पण पूर्वीच्या त्या गावठी हॉटेलांची चव आता या हॉटेलांच्या पदार्थांत सापडत नाही.
तर हा असा प्रवास करत आम्ही आमच्या आजोळी पोहोचत असू, आम्हाला उतरवून घ्यायला एखादा मामा आलेला असे. त्यांना पोस्ट कार्ड टाकून प्रवासाची तारीख आणि बस मुंबईहून निघण्याची वेळ आगाऊ कळवलेली असे त्याप्रमाणे अंदाजे पोहोचण्याच्या वेळेला ते येत असत. ऊतरल्यावर एखादा ऊमदा तरतरीत घोडा जोडलेल्या, सजावट केलेल्या टांग्यातून आमची सवारी नीघे आणि सरळ मेन रोडवरच्या १०८४, चांदवडकर लेन, गाढवे वाडा, या पत्तयावर येऊन थांबे. हा वाडा सरदार गाढवेंचे निवास स्थान होता. कलांतराने त्यांनी नवीन वास्तुत स्थलांतर करुन या वाड्यात बिऱ्हाडं भाड्याने ठेवण्यास सुरुवात केली. त्यापैकी एक बिऱ्हाड शिंदेंचं म्हणजे माझ्या आजोबांचं. माझे आजोबा हे सत्यशोधक समाजाच्या विचारसरणीचे होते. अगदी सरळ मार्गी, प्रेमळ आणि पापभिरु माणूस. माझी आई धरुन त्यांना सात मुलं. चार मुलगे आणि तीन मुली. माझी आजी एकदम हुशार, चतुर आणि सुगृहिणी होती. आजोबा शेतकी खात्यात होते पगार तसा बेताचाच होता पण आजीची माहेरची शेती होती आणि ती लेकी वारसाची असल्याने धान्याची कमतरता नसे. त्यामुळे घरात खाण्या पिण्याची कमतरता कधीच नव्हती. चारही मुलं कमावती झाल्यावर थोडी आणखी सुबत्ता आली. या गाढवे वाड्यातल्या घरात फार मजा येई. वाड्याला एक मोठ्ठा भक्कम दरवाजा होता त्यातून आत आल्यावर थोडंस अंगण व वाड्याची आडवी ईमारत. मधोमध पहील्या मजल्या वर जाण्या साठी लाकडी जीना होता. या जीन्याच्या दोन्ही बाजूला घरं होती. दर्शनी भागात तळ मजला आणि पहीला मजला होता. तळ मजल्यावर मध्यभागी वाड्याच्या मागील बाजूस जाण्या करीता एक बोळ होतं आणि या बोळाच्या मध्यभागी डावी उजवी कडे दुसऱ्या मजल्यावर जाण्यासाठी जीने होते. हे जीने आणि बोळ खूप अंधारे असत, अगदी बोगदा असतो तसे. घरांच्या भिंती मातीच्या आणि जमिनी शेणाने सारवलेल्या असत. आधी सारवण्याचं काम आजी व मावशा करीत असत, नंतर आजीच्या जोडीला सून आली. या सारवलेल्या घरात ऊन्हाळ्यात ऊष्मा जाणवत नसे आणि हिवाळ्यात थंडीचा बोचरे पणा येत नसे हि याची खासियत. घर तीन खोल्यांचंच पण ऐसपैस होतं. या घरात सुट्टीच्या काळात कधी कधी आम्ही दहा नातवंडं मिळून एकूण सतरा अठरा जण सुखनैव रहात असू. वाड्याच्या मागील बाजूस एका कोपऱ्यात एक आड होता आणि त्याला लाकडाचा रहाट होता हा आड फार खोल आणि काळोख असलेला होता त्यामुळे त्याच्या जवळ जाण्यास आम्हा मुलांना भिती वाटे. बाकी संपूर्ण वाडाभर आम्हा मुलांचा उच्छाद चाले पण कोणाची तक्रार नसे.
अगदी पहाटे गोधडीतली ऊब अनुभवताना रस्त्यावर चे निरनिराळे आवाज ऐकू येत. पेपर विकणारी मुलं “ गांवकरी “ “ देशदूत “ अशी वर्तमान पत्राच्या नावांच्या आरोळ्या ठोकत फिरत असत, दुध वाले दूधाच्या चरव्या सायकलवर लावून रतीब घालायला जात असत त्याचा खडखड आवाज, चरवीतनं दूध भांड्यात ओततानाचा चूळ्ळं करुन येणारा आवाज, वासुदेवाचा तंबोरा – चिपळ्यांसह येणारा गाण्याचा आवाज, घरात अगदी आत माजघराच्याही बाहेर पाणी भरण्याचा आवाज, बंबात भर घालण्याचा आणि सरपण किंवा शेणाच्या गोवऱ्या फोडण्याचा आवाज, सडा शिंपडण्याचा आवाज या सर्व आवाजांसह सकाळ ऊजाडे. आम्ही हातात बिटकोचं काळं माकड छाप दंत मंजन किंवा बंबाखालची राख हातावर घेऊन दात घासून, तोंड धुऊन स्वयंपाक घरातल्या मातीच्या चुली समोर येऊन बसायचो, चुलीतल्या निखाऱ्यांमुळे तिथे फार छान ऊबदार वातावरण असे. तिथुन ऊठावंसंच वाटत नसे. आई, मावशी, मामी चहा आणि आम्हा मुलांना दूध देण्याच्या गडबडीत असायच्या ते झालं कि सगळ्यांच्या अंघोळी उरकण्याची घाई सुरु होई तो पर्यंत बायका नाश्त्याची तयारी करीत व सर्वांना नाश्ता देऊन झाला कि आजी, मावशी आणि मामी एका मोठ्या लोखंडी घमेल्यात धुण्याचे कपडे घेऊन सरळ नदीवर जायला निघत त्यांच्या बरोबर मी ही जात असे, मला नदीवर जायला खूप आवडत असे. तिथलं वातावरण विलोभनीय असे. नदीचं वाहतं पाणी त्यात कपडे धुणाऱ्या स्त्रीया, समोरील काठावर डुंबणारी मुलं, खालच्या बाजूस गाई, बैल धुणारे शेतकरी असं रम्य वातावरण त्या ठिकाणी असे. ईकडे या स्त्रीया नदीवर धूणी धुवायला गेल्या कि घरी आई आणि मामी स्वयंपाकाला लागत व दुपारच्या जेवणाची तयारी सुरु होई आजोबा बजारहाट करायला निघत आणि मामा मंडळी आपापल्या कामाला जात. मग पोटात पडेपर्यंत आमचा धुमाकूळ चालत असे. दुपारी सपाटून भूक लागे मग पितळी फुलं लावलेल्या सागवानी पाटावर बसून चुलीवर शिजवलेलं सुग्रास ऊन ऊन भात, आमटी, पोळी किंवा भाकरी, भाजी, शिंकाळ्यातून ऊतरवलेल्या दह्याची कवड, पापड, लोणचं, चटणी असं अनेक पदार्थांनी भरलेलं जेवणाचं ताट समोर आल्यावर मग हाता तोंडाची लढाई सुरु होई. ऊदर भरण झालं कि आजोबांनी आणलेल्या पिशव्या तपासायच्या, त्यात भुईमुगाच्या शेंगा, रसरशीत पेरु, हुरडा असले प्रकार सापडले कि त्याचा फडशा पाडायचा. तोपर्यंत बायकांची जेवणं होऊन आवरा आवर होई मग सारेजण मधल्या खोलीत बसून गप्पाटप्पा चालत आम्ही पोरं कुणाच्या ना कुणाच्या तरी मांडीवर डोकं ठेऊन त्यांच्या गप्पा ऐकत ऐकत झोपी जात असू. चार साडेचार वाजता पुन्हा चहा पाणी व्हायचे त्यावेळेस फरसाण, नाशिकचा सुप्रसिद्ध चिवडा किंवा बुधा हलवाईची जिलेबी सोबत असे. नंतर एखाद्या मामावर सर्व भाचरांना फिरवून आणण्याची जबाबदारी असे मग सारी मुलं तयारी करुन बागेत फिरायला. संध्याकाळी पुन्हा गारठा पडायला सुरुवात झाली कि दिवेलागणीला सगळे घरात. हात पाय धुऊन शुभंकरोती वगैरे म्हणणं. त्यात जो कोणी व्यवस्थित परवचा म्हणेल त्याला आजोबा विशेष बक्षीस देत असत. बहुतेकदा ते सर्वांनाच मिळत असे. नऊ वाजता नगरपालीकेच्या घड्याळाच्या मनोऱ्यातून भोंगा होई आणि रस्त्यावरची सारी दुकानं बंद व्हायला सुरुवात होई. रस्त्यावरची गर्दी निवळे व थकलं भागलं नाशिक आपापल्या घरट्यात विश्रांती साठी त्या दिवसाची निवृत्ती घेई. घरा घरात रात्रीची जेवणं चालू असताना दुरुन लग्नाच्या वरातीच्या बँडचा आवाज ऐकू येई. नाशकात त्या काळी लग्नाच्या वराती निघत असत. या वराती अगदी पहाण्या सारख्या असत. नवरा नवरीला एका सुंदर सजवलेल्या उघड्या गाडीत बसवलेले असे त्यावर नक्षीदार छत्री असे. सर्वात पुढे बँड पथक असे त्यांचे पोशाख एकदम आकर्षक रंगाचे असत आणि सर्व वाद्यं चमचमणारी पितळी किंवा स्टेनलेस स्टीलची असत. त्या पाठीमागे गॅसचे दिवे डोक्यावर घेतलेल्यांचे पथक असे. त्या पाठीमागे सजवलेली नवरा नवरीची गाडी आणि त्याच्या मागे सर्व वऱ्हाडी मंडळी. अशी ही देखणी वरात असे. बँडवर त्या त्या काळातली हिंदी मराठी सिनेमातली गाणी वाजवली जात. अशी वरात आली कि आम्ही जेवणाच्या ताटावरुन सुद्धा ऊठुन धावत सुटायचो आणि वरात गेली कि पुन्हा ताटावर. मग नवरी कशी सुंदर होती, तीचा पोशाख कसा होता, नवरा कसा नवरी समोर बावळट दिसत होता किंवा तिच्या मानाने चांगलाच होता बरं? असे संवाद बहीणींमधे आणि घरातल्या स्त्री वर्गाला सांगत असताना कानावर पडत. आमच्या डोळ्यासमोर मात्र बराच वेळ बँड वाल्यांचा तो रुबाबदार पोशाख आणि ती चकचकीत वाद्यंच तरळत असायची. नवरा नवरी आणि त्यांचं दिसणं हे खिजगणतीतच नसे आमच्या. एकंदर काय तर एरवी आमचीच मजा असे. आई, मावशी वगैरेंना माहेर पणी आल्याचा आनंद असे. त्यात त्यांचेही सिनेमाला जाण्याचे वगैरे कार्यक्रम होत असत. मी एकुलता एक भाचा असल्याने सर्वात जास्त माझे लाड होत असत. प्रतयेक मामा मावशी आपापल्या परीने काही ना काही लाड करत असे. फिरायला नेत असत. त्याकाळात नाशकात ठिकठिकाणी आईस्क्रीम सोड्याची दुकानं असत तिथे नेऊन वेगवेगळ्या रंगाचे आणि स्वादाचे आईस्क्रीम सोडा पाजत कधी रात्री उशीरा हलवायाच्या दुकानात नेऊन पेलाभर गरम गरम वर जाडसर साय घातलेलं आटवलेलं दुध प्यायला देत, असे एक ना अनेक प्रकार होत असत.
सुट्टीचे सर्व दिवस असे असीम आनंदात घालवल्यावर पुण्याची मंडळी पुण्याकडे जायला निघत असत आणि आम्ही मुंबईकर मुंबई ला यायला निघत असू. दरवर्षी येणं जाणं आणि पंधरा वीस दिवस रहाणं होत असून सुद्धा सुना मुली नातवंड निघाली कि स्थानिक मामा मामी आणि आजी आजोबांचे डोळे पाणावायचे नातवंडांचे असंख्य पापे पुन्हा पुन्हा घेतले जायचे, लेकी सुनांचे चेहरे पुन्हा पुन्हा कुरवाळले जायचे, गळा भेटी व्हायच्या आणि सारे जण आपापल्या मार्गी लागायचे. आम्ही ही पुढच्या सुट्टीतल्या योजना मनातल्या मनात घोळवत निघायचो. मनात थोडा आनंदही असायचा कारण मामा मामीने आणि आजी आजोबांनी आमच्या मुठीत खाऊ साठी म्हणून दोन पाच रुपयाच्या नोटा कोबलेल्या असायच्या. मामा स्टँडवर सोडायला टांग्या मागून सायकल वर यायचा आणि बस हलली कि डोळ्याच्या कडा पुसत माघारी फिरायचा.
मणसाचं बालपण कितीही श्रीमंतीत किंवा ऐष आरामात जावो पण त्याच्या बालपणी जर त्याला आजोळचं भरभरुन प्रेम मिळालं नसेल तर त्याने खरी श्रीमंती आणि ऐष आराम काय असतं हे पाहीलंच नाही असं म्हंटलं तर अतिशयोक्ती होणार नाही. मी ही श्रीमंती भरभरुन अनुभवली आहे. तसं पाहीलं तर फारच लहान सहान गोष्टी आम्हाला कोड कौतुकात मिळत असत पण त्या पाठची माया आणि त्यातून मिळणार सुख आणि आनंद हे अपरंपार असे. स्वर्ग सुख, स्वर्ग सुख म्हणतात ते या पेक्षा वेगळं काय असतं?
पुष्कराज चव्हाण
दिनांक – ३/२/२०१६
तळेगांव.

Comments
Post a Comment