आपला रमाकांत
आपला रमाकांत.
शनिवारी १९ तारखेला, मी आणि माझे व्याही पुण्याला काही कामा निमित्ताने गेलो होतो. जाताना एक्सप्रेस वे ने गेलो आणि एक्सप्रेस वे ने प्रवास फारच रुक्ष आणि एकसुरी होतो म्हणून येताना जुन्या मुंबई पुणे हायवे ने येण्याचे ठरवले.
आता हा जुना हाय वे सुद्धा छान मेंन्टेन केलाय. बरं, वाटेत सर्व जुनी आठवणीतली ठिकाणं लागल्याने त्या आठवणी मनातल्या मनात आठवत आठवत प्रवास मजेत चालला होता. तेवढ्यात विषय रमाकांतच्या वड्याचा निघाला आणि ठरलं कि रमाकांतचा वडा खाऊन मग पुढे जायचं.
आता हा जुना रस्ताही एकमार्गी झालेला असल्या कारणाने घाट उतरुन झाल्यावर रमाकांत कडे जायचं असल्यास अर्धा कि.मी. मागे यावं लागतं तसे मागे येऊन रमाकांतच्या दारात येऊन ठेपलो. एकंदरीत तिथली अवस्था पाहून फार वाईट वाटलं. गतवैभवाच्या खुणा अंगावर वागवत एखादा राजा जसा दिसावा तसा हा रमाकांत दिसत होता. हो, रमाकांत हा त्या हायवे वरचा राजाच होता. त्याला भेटल्या शिवाय आणि त्याचा महसूल दिल्याशिवाय एकही प्रवसी मार्गस्थ होत नसे. पण आज दारात आमची गाडी सोडल्यास एक ही गाडी ऊभी नव्हती. एकही गिर्हाईक आत बसलेले नव्हते. दुपार ऊतरणीला लागली होती, रस्त्यावरील वाहतुक संथ होती, रस्ता सुद्धा सुस्तावलेलाच होता. हॉटेलात ती पूर्वीची लगबग नव्हती. मालकांपैकी एक गल्ल्यावर मॅनेजर बरोबर रिकामपणच्या फुटकळ गप्पा मारत होता. त्याच्याही चेहऱ्यावर उत्साहा पेक्षा निराशाच ओसंडून वाहत होती. दोन जुने वेटर दात कोरत एकमेकांशी बोलत ऊभे होते. एक नोकर केर काढत होता आणि भटारखान्यातही नीरव शांतता होती, कारागीर आत्ता ऑर्डर येईल मग येईल म्हणून आशाळभूतपणे बाहेर पहात बसले होते. आणि आम्ही प्रविष्ट झालो. रमकांत ने निद्रिस्तावस्थेत कूस बदलल्यागत चुळबूळ केली. नोकर सरसावले, वेटर्सनी गप्पा आवरत्या घेतल्या, भटारखानाही थोडाफार आळस झटकून सावधान अवस्थेत आला. आम्ही ए.सी. सेक्शन कडे जात असल्याचे पाहून मालकांनी "बसा ना साहेब बाहेर बसा" अशी सूचना वजा विनंती केली आणि आम्ही बाहेरच्याच सेक्शन मधे बसून ऑर्डर दिली, दोन प्लेट बटाटा वडा आणि दोन प्लेट पुरी भाजी. आणि हात धुवायला जाताना माझी नजर ए सी सेक्शन कडे गेली तर तिथे सगळं अडगळीचं सामान आणि धूळ यांचं साम्राज्य. पुन्हा एकदा वाईट वाटलं.
काही वेळा ने एक स्थानिक गिर्हाईक आलं आणि त्याने चहाची ऑर्डर दिली. थोड्या वेळाने आणखी दोघं लोकल आले आणि मिसळीची ऑर्डर दिली गेली. बस्स येवढीच काय ती आम्हाला धरुन पाच गिर्हाईकं आमचं सगळं खाऊन होईपर्यंत तिथे होती.
माझं यांत्रिक पणाने खाणं चालू झालं आणि मन भूतकाळात गेलं. आठवणींचे पट भराभरा उलगडू लागले आणि मी थेट रमाकांतच्या त्या वैभवाच्या काळात जाऊन पोहोचलो. दारात असंख्य चकचकीत देशी-विदेशी गाड्या दाटी वाटीने ऊभ्या असत, काहींचे चालक त्यांच्या जवळच ऊभे राहून जुजबी देखभालीचे काम करत मालक बाहेर यायची वाट पहात किंवा चहा घेत ऊभे असायचे. एक एक गाडी येऊन ऊभी रहायची आणि त्यातून ऊच्चभ्रू किंवा ऊच्च मध्यम वर्गीय कुटुंबीय उतरत होती आणि उत्साहाने हसत खिदळत हॉटेलात शिरत होती. मध्यम वर्गीय आणि सामान्य माणसं समोरच असलेल्या एस् टी स्टँड वर ऊतरुन येत होती. सांगण्याचा हेतू हा कि गरीब - श्रीमंत - लहान - मोठा असा एकाही धर्मा पंथा चा पांथस्थ नव्हता कि जो रमाकांत च्या दरबारात हजेरी लावत नव्हता. मालकाची क्षुधा शांति झाली, वाहनाचा दम खाऊन झाला कि पांथस्थ पुढील प्रवासाला मार्गी लागत. रात्रं दिवस लगबगीचं वातावरण असे. थोड्या थोड्या वेळाने गल्ला भरुन वहात असे.
आता हे सर्व लुप्त झालं होतं. तोच पूर्वी दिमाखात ऊभा असणारा रमाकांत हताश होऊन समोरच्या सुस्त रस्त्याकडे पहात दुपारच्या टळटळीत ऊन्हात हताशपणे ऊभा असलेला पाहून अंगावर काटा ऊभा राहीला. बटाटा वड्याची चव तीच पूर्वीचीच होती, आकार ही तोच पूर्वीचाच होता पण आपला रमाकांत तोच नव्हता. काळाच्या ओघात तो थकलेला वाटला, वार्धक्याच्या जाणीवेने मायूस वाटला, गिर्हाईकांनी पाठ फिरवल्याने अगतिक झाला होता.
मला खुपखूप वाईट वाटलं. मी भरल्या पोटी देवा कडे प्रार्थना केली कि "हे परमेश्वरा या रमाकांतला पुन्हा एकदा त्याचं गत वैभव प्राप्त करुन दे" कुणास ठाऊक माझी प्रार्थना त्याच्या पर्यंत पोचली कि नाही? कि तो ही टळटळीत दुपारी त्याच्या गारेगार शयन कक्षात वामकुक्षी घेत होता?
त्याने ऐको न ऐको पण तुम्ही मात्र पुढील खेपेस जाल तेव्हा पूर्वीच्या आठवणी करुता का होईना एकदातरी या राजाच्या दरबारात हजेरी लावूनच पुढे जा, तो तुम्हाला निराश नाही करणार याची खात्री बाळगा.
पुष्कराज चव्हाण
२१-१२-२०१५.

Comments
Post a Comment