शाळा

शाळा.
आजीच्या जवळी घड्याळ कसले आहे चमत्कारीक. ही कविता ऐकली, आणि बालमोहन शाळेतला वर्ग डोळ्यासमोर ऊभा राहीला.
साधारणपणे जूनच्या पहिल्या पंधरवड्याच्या अखेरीस शाळा सुरु होत असे. चांगली दीड दोन महीने कंटाळा येईस्तोवर हुंदडून उन्हाळ्याची सुट्टी जशी जशी संपायला येते तसतशी मुलांना शाळा कधी एकदा सुरु होईल याची ओढ लागलेली असते. आमच्या सारख्या काही जणांना भले शाळेत जाऊन काही नोंद घेण्या ईतपत कामगीरी  येत नसली तरी शाळा सुरु होण्याची मात्र एक सुखद हुरहुर मनाला लागत असे. सरते शेवटी एकदाचा तो दिवस उजाडतोच. तो दिवस जसा जवळ जवळ येत असतो तस तशी त्याची वर्दी घरात अधून मधून आई, वडील किंवा थोरली भावंडं देत असत. " आठ दिवसांनी शाळा सुरू होणार आहे  सगळं सामान आवरलंय ना?" वह्या पुस्तकांना कव्हर्स घातली आहेत का? ई. ई. (बंदोबस्त चोख आहे ना?) ठराविक सुरातली खातरजमा करणारी प्रश्नांची झड पावसाच्या झडी प्रमाणे मधे मधे अंगावर येतच असते.
सुटीच्या शेवटच्या दिवसांमधे सर्व नवीन वस्तुंची खरेदी झालेली असते. त्यात प्रामुख्याने नवीन कंपास बॉक्सची खरेदी ही अनावश्यक बाब असतानाही होतेच. वास्तविक पहाता एखादंच करकटक किंवा कंपास किंवा अर्ध वर्तुळ असलं काही तरी हरवलेलं असतं आणि ते दुकानात सुट्टं मिळतही असतं तरीही नवीनच बॉक्स हवा म्हणून गाडी अडून बसलेली असते. युनिफॉर्म होत असतानाही तो कसा घट्ट होतो याचा ऊत्तम अभिनय पालकांच्या समोर चक्क घालून दाखवून ऊघड ऊघड करुन दाखवला जातो. जुनं काहीच नको असतं. रेनकोट- टोपी, छत्री, पावसाळी जोडे असा सर्व सरंजाम नवा पाहीजे असतो आणि तो मिळवला ही जातो. स्टेशनरीच्या दुकानात तर भयंकर गर्दीतून त्या दुकानदाराच्या नोकरापर्यंत पोहोचणे आणि हवी असलेली वस्तु मिळवणे हे म्हणजे शाळेत प्रवेश मिळवण्या सारखे असे. एकवेळ प्रवेश पटकन् मिळेल पण त्या गर्दीत त्या नोकराची मेहेरबानी मिळवणं कठीण होत असे. नंतर मोर्चा वळे तो पुस्तकांच्या दुकाना कडे. दादर मधील बहुतेकांचे आयडियल शिवाय पान हलत नसे. पाठ्यपुस्तक मंडळाचा सर्व संच बहुतेक जण तेथुनच विकत घेत असत. युनिफॉर्म प्लाझा सिनेमा समोरच्या एक दोन दुकानात मिळत असत. वह्या मात्र वेग वेगळ्या प्रकारच्या असत त्यात सरकारी कागदाच्या वह्यांपासून ते रजत, जागृती, स्कॉलर,  अशा डिलक्स वर्गवारीत मोडणाऱ्या गुळगुळीत कागदाच्या व चमकदार गुळगुळीत मुखपृष्ठाच्या वह्या मिळत असत. त्याकाळात भगव्या रंगाचा चपटा प्लास्टिकचा ओमेगा कंपनीचा कंपास बॉक्स फार महागडा आणि आकर्षक असा मिळत असे. मला आजही तो कंपास बॉक्स लक्षात आहे. भूमिती कळत होतं कि नाही ही गोष्ट अलाहिदा. शिवाय फाऊंटन पेन मधे कॅम्लिन, प्लाटो, हि देशी नावं पायलट, हिरो या नावांच्या हातात हात घालून चालत असत. आज ही माझ्याकडे प्लाटोची दोन फौंटन पेन्स संग्रही आहेत. नटराजच्या लालचुटुक पेन्सिल्स, अप्सराच्या निळ्या ड्रॉईंग पेन्सिल्स, परागचा शार्पनर या साऱ्या वस्तु सुरुवातीच्या काळात फार जपुन वापरल्या जात.
एकदा हा सारा सरंजाम गोळा झाला कि मग ही सारी वस्त्रप्रावरणं आणि नव्या दप्तरातली नवीन आयुधं अंगा खांद्यावर वागवत हे सारे ऊद्याचे होऊ घातलेले सारस्वत सरस्वतीदेवीच्या मंदिरात तिच्या उपासनेला मोठ्या उत्साहात निघतात. त्यात सगळ्याच प्रकारचे ऊपासक असतात. काहींना त्यांच्या कुवती नुसार पुढे पुढे फळं मिळतात तर काही ऊपासक बिचारे ऊपासच करतात.
शाळेत वर्गात शिरल्यावर मात्र अगदी प्रसन्न वातावरण असतं. परीटघडीतले चापून चोपून ईस्त्री केलेले युनिफॉर्म बहुतेकांच्या अंगावर असतात. नवीन वह्या आणि पुस्तकांचा एक विशीष्ट नवेपणाचा दरवळ असतो. नव्या कोऱ्या वहीच्या नव्या कोऱ्या पहील्या पानावर नव्या कोऱ्या न गळणाऱ्या फौंटन पेन ने कधी एकदा लीहीतो या साठी हात आसुसलेले असतात. सगळ्यांच्या चेहऱ्यावर एकमेकांना भेटल्याचा आनंद ओसंडून वहात असतो. सगळीकडे कसं आनंदी वातावरण असतं. त्यात टारगट पोरं आपापली गिर्राहाईक शोधत असतात. सराईतांची आपापली गिर्हाईकं निश्चित केल्याच्या ईशाऱ्यांची देवाण घेवाण होते. सालस, निरुपद्रवी मुलं कळपातून वेगळं पडलेल्या कोकरां सारखे भिरभीरत्या नजरा घेऊन सावध पणाने दबकत दबकत वर्गात शिरत असतात. कुठे खुट्टं झालं कि डोळे मिटून जणूकाही असतील तिथेच जागेवर बसुन रहातील अशाप्रकारे. मुलींच्यात ही काहीशा सौम्यप्रमाणात हेच चाललेलं असतं त्यांची भक्ष्य ही ठरलेली असत. कोणत्या गरीब स्वभावाच्या मुलीला चिमटे कसे काढायचे  वगैरे गोष्टींचे बेत आखणं सुरु व्हायचं. शाळेची घंटा झाली कि मग अंतर मम विकसित करी ने सुरुवात व्हायची.
शाळेचे दिवस हे फार मेजेशीर असत. मुख्यत्वे पावसाळा, हिवाळा आणि थोडासा ऊन्हाळा अशा दिवसांत शाळा असे. पावसाळ्याच्या दिवसांत खुप छान वाटे. मला स्वतःला विशेषतः शनिवारची सकाळची शाळा फार आवडत असे. शनिवारी अगदी थोडा वेळ असे शाळा तेव्हा. आणि दुसऱ्या दिवशी रविवारची सुट्टी असे म्हणून जरा ऊत्साह असे. खुप अंधारुन आलेलं असायचं बाहेर. शाळेत सर्व दिवे दिवसा ढवळ्या लक्ख लागलेले असत. बाहेर पावसाचा धिंगाणा ढगांच्या गडगडाटासह आणि विजांच्या कडकडाटासह चालू झालेला असतो. शाळा सर्व विद्यार्थ्यांना, शिक्षकांना आणि सेवक वर्गाला आपल्या कवेत घेऊन आतुन दिव्यांच्या प्रकाशात आणि बाहेरुन मुसळधार पावसाने चिंब न्हाऊन निघत असते. अशा प्रसंगी त्या ईमारतीचा चेहरा आपल्या बाळांना आणि कुटुंबातील सर्वांना सुरक्षित ठेवल्याच्या भावनेने सुखात असलेल्या कृतकृत्य माते सारखा दिसत असावा असं मला नेहमी वाटत असे. वर्गात शिक्षक वर्ग सुद्धा थोडासा प्रसन्न मूड मधे असे. शिकवणं आणि शिकणं फार लोभसवाणे पणाने सुरु असतं. "आजीच्या जवळी घड्याळ कसले" किंवा "दिवस सुगीचे सुरु जाहले" सुरु असतं. मधेच मोठ्ठा गडगडाट किंवा कडकडाट झाला कि मुलांसह शिक्षकही खिडकीच्या बाहेर काही काळ निसर्गाच्या त्या रौद्र पण हव्या हव्याशा वाटणाऱ्या रुपाकडे स्तिमित होऊन, मंत्रमुग्ध होऊन पहात रहातात. तेवढ्यात तास संपल्याचा टोल होतो आणि सगळेजण भानावर येतात. कधी मधली सुट्टी किंवा कधी दहा मिनिटांची सुट्टी झालेली असते. मग पुन्हा खिडकी तून किंवा हॉल जवळच्या बाल्कनीतून जलधारांचा आणि पागोळ्यांचा खेळ पहाणं सुरु होई. मुलांची कॅन्टीन मधे झुंबड ऊडत असे च्याऊ म्याऊ, बटाटा वडा ज्याच्या त्याच्या हातात कोंबला जात असतो व पुढे तो रमत गमत पोटात विसावत असतो.
मधल्या सुट्टी नंतरचं वातावरण जरा निराळं असे. वातावरणात डबे खाऊन झाल्यानंतरचा संमिश्र वास पसरलेला असतो. त्यात सकाळचे प्रसन्न वातावरणातले नव्या कोऱ्या वह्या पुस्तकांचे वास कधीच लोप पावलेले असतात. कोणी कोपऱ्यावरच्या बुवाकडून गटागट नावाच्या गोळ्या चघळत येतो, कुणी जीरागोळ्या, कुणी करवंद, कुणी बोरं. मुलींच्या बाजुने बोरं, राय आवळे, चिंचा, ईत्यादींचे वास येत असतात त्यात नुकत्याच खाल्लेल्या भाजी पोळी वगैरेचा वास रेंगाळलेला असतोच. काहींचे चेहरे तृप्त तर काहींचे अपचन झाल्यागत. मग काय पुढे आणखी भर. बाहेरचं वातावरण कुंद त्यात आणि यांची भर, त्यामुळे वर्गातलं वातावरण धुंद. चेहरे मात्र मक्ख. स्कॉटलंड यार्ड पोलीस सुद्धा हुडकून काढू शकणार नाहीत ईतके हे बेरड.
 मधल्या सुट्टी नंतर पुढे वेळ थोडा सुस्तावलेला असे सरकता सरकत नसे. फक्त तीन पिरीयड्स जायचे असत ते ही प्रत्येकी पंचेचाळीस मिनीटांचे. तरीही घंटा कधी वाजतेय या कडे लक्ष असे. एकदाची शाळा सुटली कि मग धान्याचं पेव फुटल्यागत सगळी पोरं ओसंडून वहायला लागत. जीना उतरताना तर ईतकी गर्दी असे कि कोण कोणा बरोबर आहे हे कळतच नसे. एकदा तर एक मुलगा चक्क एका बॉयकट केलेल्या मुलीला आपला मित्र समजून तिच्या खांद्या वर हात ठेऊन संपूर्ण जीना उतरलेला मी पाहीला आहे. आणि नंतर लक्षात आल्यावर त्याची उडालेली भंबेरी सुद्धा पाहीली आहे. बरं, गर्दी ईतकी की मुलीला वाटलं शेजारच्या मुलीनेच खांद्यावर हात ठेवलाय. अशा गमती जमती होत, रस्त्यातनं एकमेकांच्या खोड्या काढत. एकमेकांना भिजवत घराकडे वाटचाल सुरु झलेली असते. शाळेची ईमारत मात्र कौतुकाने आणि आईच्या मायेने या आपल्या लेकरांकडे डोळे भरुन पहात असते. ती ही दमलेली असते. तिलाही पुन्हा ऊद्या परत येणाऱ्या तिच्या लेकरांच्या स्वागतासाठी, त्याना कवेत घेण्यासाठी ताजतवानं होऊन दोनही हात पसरुन ऊभं रहायचं असतं.
या माऊलीचे आपल्या लेकरांवर अनंत ऊपकार असतात. लेकरं आता मोठी झालेली असतात. आपापल्या क्षेत्रात यशस्वी झालेली असतात. लेकरांनाही तीची ओढ असते. त्यांनाही वाटत असतं तिला भेटावं, तिच्या कुशीत शिरावं, ती ऊब पुन्हा पुन्हा अनुभवावी पण आता ते शक्य नसतं. सुरक्षा रक्षकांना ओलांडून नव्या व्यवस्थापनाची परवानगी मिळवून आईच्या कुशीत शिरणं तिच्या लेकरांना मान्य नसतं. ती तशीच बाहेरुन तिचं दर्शन घेतात. काही काळ आपल बालपण आठवतात आणि त्या रम्य आठवणीच्या सुखद भावना कुरवाळत कुरवाळत मार्गस्थ होतात.
©पुष्कराज चव्हाण
दि. १०.०३.२०१६

Comments

Popular posts from this blog

देव आनंद

भक्ती