नंदू

नंदू

आज सकाळी पावणे पाचालाच जाग आली. हवेत दमटपणा जास्त असल्याने गरम होत होतं म्हणून एसी चालू करुन पुन्हा झोपण्याचा प्रयत्न केला पण पुन्हा काही झोप येईना मग म्हंटलं चला सगळ्यांना गुड मॉर्निंग मेसेज पाठवुया म्हणून फोन ऑन केला. फोन सुरु केला आणि नंदूची तीव्र आठवण आली. ही गुड मॉर्निंग मेसेज पाठवायची सवय मला खरं तर नंदूमुळेच लागली. आधी रोज त्याचे नियमितपणे मेसेजेस येत असत , मग मी त्याला आणि ईतरांना गुड मॉर्निंग मेसेज करायला लागलो आणि आता ती सवय पडून गेली. पण ही सवय लावणारा आमचा नंदू.
हेमंत (नंदू) रामकृष्ण जोशी. जन्म ७ जून १९६२. न्यूमरॉलॉजी प्रमाणे ७ हा अंक ज्याचा असतो तो सर्वांशी जुळवून घेणारा आणि जगन्मित्र असा असतो. जर हे खरं असेल तर नंदू अगदी तसाच होता.
नंदू माझ्या आयुष्यात आला तो साधारणपणे १९८०-८१ साली. आमची पहिली भेट झाली ती रुपारेल कॉलेजच्या कँटीनच्या कट्टयावर. बरेच दिवस मी त्याचं नाव नंदू हेच समजत होतो नंतर समजलं या ईसमाचं नाव हेमंत रामकृष्ण जोशी आहे. घरातलं नाव नंदू म्हणून आम्ही सारे त्याला नंदूच म्हणायचो. साधारणपणे नीटनेटके पणाने रहाण्याची आवड असलेल्या नंदूची अंगकाठी म्हणजे पाच फूट आठ इंच उंची, गव्हाळ वर्ण, मध्यम बांधा, कुरळे केस बोलके डोळे आणि सदैव हसतमुख चेहरा. सदैव अस्वस्थ असणारा आणि तितकाच पराकोटीचा कष्टाळू, दयाळू अंतःकरणाचा आणि तिरकस बोलून समोरच्याची चेष्टा करणारा आणि स्वतःची केलेली चेष्टा खिलाडू वृत्तीने स्वीकारणारा हा जगन्मित्र. नंदू माझा अत्यंत जीवलग मित्र, अगदी पाठीवरच्या भावासारखा जवळचा मित्र. कदाचित सर्वांच्याच तितकाच जवळचा तो असावा असं मला वाटतं. दादरच्या साने गुरुजी विद्यालयात दहावी पर्यंत शिक्षण पूर्ण केलेला नंदू पुढे त्यावेळेच्या रिवाजा नुसार घराच्या जवळ असलेल्या रुपारेल कॉलेज मधे कला शाखेत दाखल झालेला होता. तिथे त्याच्या वर्गात बालमोहन शाळेत माझ्या वर्गात जे माझे मित्र होते त्यांची त्याच्याशी प्रथम ओळख झाली आणि कालांतराने त्या ओळखीचं मैत्रीत रुपांतर झालं. मी रुईया कॉलेज मधे होतो त्यामुळे माझी आणि नंदूची ओळख ही माझ्या बालमोहन मधल्या त्याच्या रुपारेल कॉलेजच्या वर्गात असलेल्या मित्रांमुळे झाली.
तर हा नंदू, माटुंग्याच्या बॉम्बे ग्लास वर्क्स च्या ईमारतीत रहात असे. त्याचे वडील टेक्सटाईल मिल मधे नोकरीला होते. जानेवारी १९८२ साली मुंबईत दत्ता सामंत यांच्या नेतृत्वाखाली जो गिरणी कामगारांचा संप झाला त्यात हजारो कुटुंबांवर जे संकट ओढवलं त्यातलं एक कुटुंब रामकृष्ण जोशींचं ही होतं. घरात खाणारी पाच माणसं आणि कमावणारी व्यक्ती एकच होती त्या व्यक्तीच्या हातालाही आता काम नव्हतं. परिस्थिती डगमगून जाण्या सारखी बिकट होती. भावां मधे नंदू मोठा त्यामुळे त्याने आता हातभार लावणं साहजिकच अपेक्षित होतं. नंदूने न डगमगता परिस्थितीने दिलेलं आव्हान अगदी निधड्या छातीने आणि मोठ्या हिंमतीने पेललं. मला वाटतं तेव्हा तो बी. ए. च्या पहिल्या वर्षाला असावा. त्याने आधी घरोघरी वर्तमानपत्र टाकण्याच्या कामाने सुरुवात केली सकाळी साडेचार वाजता त्याचा दिवस सुरु होत असे आणि ते काम साधारणपणे साडे सात वाजे पर्यंत आटोपून नंदू कॉलेजला येत असे. लेक्चर्स अटेंड करुन किंवा बुडवून आमचा अड्डा कॉलेज कँटीनच्या कट्टयावर जमत असे. या आधी सांगितल्याप्रमाणे मी तेव्हा रुईया कॉलेजला होतो पण सगळे मित्र रुपारेलमधे होते. रुईया सकाळचं असे म्हणून तिकडचं आटोपलं की सरळ रुपारेल वर येत असे. नंतर पूर्ण दिवस रुपारेलवर टिंगल टवाळ्या आणि त्या वयात करण्यात यायचे ते सारे उद्योग चालत असत. नंदू आवश्यक त्या विषयांची लेक्चर्स अटेंड करुन झाली की थोडावेळ आमच्या बरोबर टाईमपास करायचा आणि नोकरीवर जायचा. हो, तो सुप्रसिद्ध गायिका उत्तरा केळकर यांचे पति विश्राम केळकर जे इंटिरिअर डेकोरेशन चा व्यवसाय करायचे त्यांच्याकडे सहाय्यक म्हणून काम करीत असे. हे सारं काही करुन म्हणजे सकाळी वर्तमानपत्र टाकून, कॉलेज अटेंड करुन त्यानंतर नोकरी करुन ते ही वेगवेगळ्या साईट्सवर जाऊन तिथली कामं पाहून, सप्लायर्सना भेटून माल साईटवर पोहोचवण्याची व्यवस्था करुन, संध्याकाळी घरी जायचा. पुन्हा आम्ही त्याला कधी विचारलं की नंदू आज रात्री सिनेमाला जायचं का? तर हा पठ्ठया यायला तयार. पण त्यातही उत्तर देताना हा चेहरा गंभीर करून उत्तर देणार बघू, नंतर सांगतो मग आम्ही सारे त्याच्यावर चिडायचो आणि म्हणायचो सरळ हो किंवा नाही मधे उत्तर दे. तर हा म्हणायचा जाताना हाक मारा. मग आम्ही म्हणायचो की नाही आम्ही हाक मारणार नाही तू डायरेक्ट थिएटरवर ये तरी हा अडून बसायचा म्हणायचा ठीक आहे नाही येत मग. शेवटी आम्ही म्हणायचो ठीक आहे आम्ही हाक मारतो मग स्वारी तयार व्हायची. वर आणि हे ही ऐकवं लागे की हेच जर आधी म्हणाला असतात तर वाद झाला असता का ईतका? असं म्हणून पुन्हा आमच्या तंगड्या आमच्या गळ्यात अडकवायचा. आमच्यात त्यावेळी पैसे कमावणारा नंदू हा एकटाच होता आम्ही आपले पॉकेट मनी वर गुजराण करणारे. काहींना तो ही नसे. त्यामुळे त्याला लहर आली की तो सगळयांना विचारायचा चहा कोण कोण घेणार? आम्ही सात आठ जण असायचो सर्वच हमखास एका सुरात मी पिणार म्हणायचे मग नंदूशेठ कँटीनच्या पोऱ्याला ऑर्डर देणार अरे चार चहा आठ मधे आणि एक मँगोला आण. अशी ऑर्डर सुटली की सगळे म्हणायचे नाही नाही आम्हाला पण मँगोला हवा. मग हा अगदी आढ्यताखोरीचा आव आणून आम्हाला विचारायचा मी तुम्हाला विचारलं का मँगोला पिणार का म्हणून? नाही ना? चूपचाप चहा प्या. मग आम्ही चिडून त्याच्या मागे पळायचो आणि थोडावेळ पळापळी करुन परत येऊन त्यालाच बुकलून त्याच्या पैशाने मागवलेला चहा प्यायचो. पुढील खेपेला त्याने चहा विचारला की आम्ही म्हणायचो मँगोला पिणार. मग तो म्हणायचा विचारलेल्या प्रश्नाचं हो किंवा नाही मधे उत्तर द्यायचं आगाऊ पणा करायचा नाही. हे असं अनेकदा व्हायचं आणि सगळेजण खूप हसायचो. तुम्हाला वाचून कदाचित कल्पना येणार नाही पण ती जी काही धमाल असायची ती कमालीची असे. बरं आम्हा प्रत्येकाच्या कुटुंबातही तो तितकाच प्रिय होता. माझं त्या सुमारास म्हणजे १९८८ साली नुकतंच लग्न झालं होतं. ८९ ला मला मुलगी झाली. माझा आंतर जातीय विवाह होता. त्यामुळे अशा दांपत्याच्या वाट्याला जे येतं ते माझ्या व माझ्या पत्नीच्या वाट्याला आलं होतं. मी त्यावेळेस नोकरी करीत होतो. उमेदवारी चे दिवस होते त्यामुळे ऑफिस मधून घरी यायला उशीर होई त्यामुळे मुलीला फिरायला घेऊन जाणं होत नसे. अशावेळी नंदू संध्याकाळी स्कूटर घेऊन घरी येत असे आणि माझ्या मुलीला फिरायला नेत असे. चौपाटीवर नेऊन मेरी गो राऊंड वर बसवून पुन्हा घरी आणून सोडत असे. हे काही मी किंवा माझ्या बायकोने सांगितलं म्हणून तो करत नसे पण त्याचा तो स्वभावच होता. कोणाला काय हवंय किंवा कोणासाठी काय करणं आवश्यक आहे हे बरोब्बर ओळखून ते तो करीत असे.
तर हा नंदू ईतर बाबतीतही धडपड्या, हात मोडून घेणं हा तर त्याच्या डाव्या हाताचा खेळ. एकदा कळसूबाई च्या हाईकला जाताना ट्रेन मधून शेजारच्या मुलाला खिडकीतून हात बाहेर काढून कळसूबाईचा डोंगर म्हणून एका डोंगराकडे हात दाखवताना बाहेरच्या खांबावर हात आपटून हात मोडून घेतला. झालं. हाईक रद्द करुन सारे जण मुंबईत परत. तोच हात त्यानंतर चार पाच वेळा तरी या चळवळ्याने मोडून घेतला असेल.
कॉलेजची वर्ष अशी मजेत जात होती सगळेजण व्यवस्थित ग्रॅज्युएट झाले. पुढे नंदूने लॉ कॉलेजला प्रवेश घेतला. नंदूला पर्यटनाची फार आवड होती. कुठे जायचं म्हंटलं की त्याचा उत्साह बघण्या सारखा असे. एकदा आम्ही तीघा चौघा मित्रांनी गोव्याला जायचा बेत ठरवला आणि नंदूला सांगितलं, तो ही उत्साहात तयार झाला. नेमका निघायच्या दिवशी नंदूचा लॉ च्या पहिल्या वर्षाच्या वार्षिक परिक्षेचा शेवटचा पेपर होता. बस दुपारी तीन वाजता ताडदेव ए सी मार्केट कडून सुटणार होती. नंदूचा पेपर १२ ते ३ चा होता तो म्हणाला मी पेपर देऊन लवकर येतो तुम्ही माझ्यासाठी थांबा. दिड वाजेपर्यंत नंदूचा पत्ता नव्हता शेवटी त्याला न घेताच आम्ही निघालो. तो पेपर अर्धवट टाकून आला होता पण आम्ही तिथे नव्हतो आम्हाला बस सुटण्याची भिती होती म्हणून आम्ही निघून गेलो होतो. त्याच्या उत्साहावर विरजण पडलं खूप दुखावला गेला असणार तो तेव्हा. नंतर मात्र आम्ही त्याला सोडून कधीही कुठेही गेलो नाही. हसत खेळत मजेत दिवस जात होते. पुढे एक दिवस नंदू कडून समजलं की नंदू ज्यांचा सहाय्यक म्हणून काम करत होता ते, म्हणजे श्री. विश्राम केळकर हे प्रकृतीच्या कारणास्तव काम बंद करण्याचा निर्णय घेत आहेत आणि नंदूवर पुन्हा नवीन काम शोधण्याची पाळी येणार आहे. साधारणपणे १९८६-८७ चा सुमार असेल. आम्ही सर्वांनी त्याला म्हंटलं की एव्हाना तुला या कामाची चांगली माहिती झालीच आहे तर तू स्वतः का नाही एक्झीक्युशनची कामं घेत? हळूहळू जम बसेल. झालं, नंदूला हे पटलं आणि त्याने तसं करण्याचा निर्णय घेतला. एका आर्किटेक्ट मित्राच्या मदतीने त्याने काम सुरु केलं आमच्या पैकी काही मित्रांनीही आपापल्या घरची काही कामं काढली आणि नंदूला करायला सांगितली.  हळू हळू नंदूचा धंद्यात जम बसू लागला जरा चांगली, म्हणजे कॉर्पोरेट क्लायंट्सची कामं नंदू आता करायला लागला. ज्या सोसायटीच्या आवारात तो ऑफिस एक सी. ए. फर्म आणि आर्किटेक्ट बरोबर शेअर करत होता त्याच सोसायटीच्या आवारात स्वतंत्र ऑफिसची जागा नंदूने भाड्याने घेतली. नंदूची प्रगती त्याच्या अथक परिश्रमांमुळे अपेक्षे प्रमाणे होत होती. दरम्यान साधारणपणे  १९९३ साली नागपुरातले निवृत्त पोलिस अधिकारी पटवर्धन यांच्या सुस्वरुप आणि शालीन सद्गुणी मुलीशी भाग्यश्री, हिच्याशी नागपुरात साखरपुडा झाला आणि १९९४ साली मुंबईत नंदू आणि भाग्यश्री यांचा विवाह सोहळा संपन्न झाला. भाग्यश्री पटवर्धन, भाग्यश्री जोशी होऊन लक्ष्मीच्या पावलांनी नंदूच्या आयुष्यात आणि आम्हा मित्रांच्या परिवारात आली. दूधात साखर विरघळावी तशी ती आमच्यात सामावून गेली. यथावकाश त्यांना मुलगा झाला. ईकडे धंद्यातली घोडदौड सुरुच होती. आता कामाचा व्याप वाढत होता.  नंदूने आता वेगळं घर घ्यायचं ठरवलं आणि माहिम मधेच एक वन बेडरुम हॉल किचनचा ओनरशीपचा फ्लॅट घेतला. काही अवधीतच एक मारुती 800 दारात उभी राहिली. कामं सुरुच होती. छोटी छोटी कामं करत आता कॉर्पोरेटची कामं सुरु झालेलीच होती त्यात आता भर पडू लागली. प्रसिद्ध पर्यटन कंपनी एस् ओ टी सी ची सर्व भारतातील ऑफिसेसची कामं त्याच्याकडे आली. काही बँकांची कामं येऊ लागली. नंदूचं फिरणं वाढत गेलं एकाच वेळी अनेक ठिकाणी साईट्स सुरु असत. वेळेवर काम द्यायचं म्हणून हा ही कधी कधी रात्रभर साईट वर उभं राहून सकाळी दिलेल्या वेळेत काम पूर्ण करुन साईट क्लायंटला सोपवत असे. आता आमच्या भेटी गाठी कमी व्हायला लागल्या. तरीही मित्र मित्र आम्ही अधून मधून भेटत होतो. आता नंदूने माहिम मधेच राहत्या घराच्या पुढे एक गल्ली सोडून असलेल्या गल्लीत एका नवीन टॉवर मधे आठव्या मजल्यावर एक छानसा दोन बेडरुमचा फ्लॅट घेतला कारण एव्हाना कुटुंबात दोन सदस्य वाढले होते. एक मुलगा आणि एक मुलगी. कुटुंबाचा चौकोन पूर्ण झाला होता. छोटी गाडी लहान पडायला लागली तशी मोठ्या गाड्यांची खरेदीही होत गेली. कलौघात घराजवळच एका ईमारतीत ऑफसची खरेदी झाली. तिथूनच जवळ पडेल अशी सोयिस्कर ठिकाणी इंडस्ट्रीयल इस्टेट मधे वर्कशॉप साठी जागेची खरेदी झाली. विजय पताका आता दूरवर फडकू लागली होती. आता परदेशी वकीलातीचीही कामं नंदू करु लागला होता. सारं कसं अगदी स्वप्नवत वाटावं असं सुरु होतं. मुलं मोठी झाली. मोठा मुलगा यशोधन इंजिनिअरिंग ला गेला धाकटी ईशा आर्ट्सला गेली. आई वडिलांच्या संस्काराने मुलं ही सद्गुणी, लाघवी झाली. आम्ही सारेच मित्र काळाच्या ओघात आपापल्यापरीने प्रापंचिक सुख उपभोगत होतो. एकमेकांना लग्न समारंभात भेटत होतो. त्यातही प्रत्येकासाठी काहीतरी करण्याची त्याची उर्मी त्याला स्वस्थ बसू देत नसे. मग कोणा कडे लग्न कार्य निघालं की त्यांना केळवण करणे. लग्नात काही हवं नको ते पहाणे. काही लागलं तर सांग असं पुन्हा पुन्हा बजावून सांगणे. मित्रांच्या कौटुंबिक सोहळ्यांना सर्व कामं बाजूला ठेऊन आवर्जून उपस्थित रहाणे. हे सारं काही सुरुच असे. उत्साहाचा अखंड खळाळता झराच होता तो. सोसायटीतल्या सर्व कार्यक्रमात पुढाकार घेणे हा ही भाग त्यात असे. गणपती तर त्याचं आवडतं दैवत. गणपतीवर त्याची अपार श्रद्धा. नेमाने दर मंगळवारी उद्यान गणेशाचं दर्शन घेणारच. संकष्टी, अंगारकीचे उपवास करणार. घरात पूजा अर्चा नेमाने करणार . देवानेही त्याला कशाची उणीव ठेवली नाही. घरात गणेशोत्सव फार थाटात होत असे. फुलांची आरास अगदी डोळ्यांत साठवून ठेवण्यासारखी होत असे. आई वडिलांना ही त्याने कधी अंतर दिलं नाही. वडिलांची तर त्यांच्या आजारपणात अक्षरशः अगदी श्रावणबाळा सारखी सेवा करताना मी त्याला पाहिलंय. हे सारं काही असं सुरळीत आणि आनंदात चालू असताना तो माणसंही जोडत गेला. जीवन प्रवासात तो चालत राहिला सोबत माणसं जोडली जात होती आणि कारवाँ बनत गेला. जिंदगी की राह पर वो चलता रहा, लोग जुडते गये और कारवाँ बनता गया. ईतकं सहज वाटावं असं हे सारं घडत होतं.
दुष्ट नियती मात्र त्याच्यावर लक्ष ठेऊन होती. तिला कुठे तरी दुष्टावा साधायचा होता. जणू काही ती सतत त्याच्या मागावर होती अगदी संधी मिळण्याची वाटच पहात होती. पण तारणकर्ता गजानन त्याच्या पाठीशी उभा होता तो काही केल्या नियतीला डाव साधू देत नसावा. आणि अचानक एकदा कुणाच्याही ध्यानी मनी येणार नाही अशी ती बातमी वीजेचा लोळ अंगावर यावा तशी कानांवर येऊन धडकली. दिवस होता १५ मे २०१८ आणि वेळ होती दुपारी २:३० वाजताची. त्या दिवशी अमावस्या होती अमावस्या समाप्तीची वेळ सायंकाळी ५:१८ ची. खरं म्हणजे हे सारं काही आपण विचारात घेत नाही पण आपल्या कुणावर तरी प्रसंग गुदरला की आपल्या मनात या गोष्टी येतातच. रोज दुपारी मोबाईल बंद करुन झोपणारा मी त्या दिवशी चुळबूळ करत पडलो होतो. फोन बंद केला होता पण झोप काही येत नव्हती म्हणून साधारण पणे तीनच्या सुमारास फोन चालू केला तर एका मित्राचा मेसेज होता की नंदूचा अपघात झालाय आणि तो फोर्टीस रुग्णालयात आहे. काही सुचेना सरळ कपडे बदलले आणि मुलुंडला फोर्टीस मधे जाण्यासाठी निघालो. मधेच आणखीन एक धक्का बसला की नंदू कोमात आहे. मन गलबललं. डोळ्यासमोर नंदूच्या सर्व गोष्टी आणि घटना चलचित्रासारख्या तरळू लागल्या. डोळे पाणावले. मन आक्रंदत होतं. पण कुठेतरी एक आशा होती की आज मंगळवार आहे गणपतीचा दिवस आहे आणि तो आपल्या भक्ताला यातून सहीसलामत बाहेर काढेल. फोर्टीस मधे गेल्यावर घटनाक्रम समजला तो असा की नेहमी प्रमाणे सकाळी नवाच्या ठोक्याला नवरा बायको ऑफिसमध्ये जाण्यासाठी घरातून बाहेर पडले. मुलाची फायनल ईयरची इंजिनीयरींगची फायनल परिक्षा म्हणून तो ही बाहेर पडला तीघं ही आपापल्या ठिकाणी पोचून कामाला लागले. ऑफिसमध्ये जाऊन तिथली कामं बघून नंदू, त्याचा सहकारी सचिन आणि ड्रायव्हर सुभाष हे तिघं नंदूच्या स्कोडा गाडीतून पावणे अकराच्या सुमारास साईट व्हिजीटला जायला निघाले. आणि नियतीचा खेळ सुरु झाला.  आधी लोअर परेल येथे क्लायंट व्हिजीट केली. तिथे काही वेळ गेला. नंतर ठरलं ठाण्याची साईट पहायला जायचं कारण त्याचा सहकारी सचिन सुट्टीवर जाणार होता तेव्हा साईट विषयी जाणून घेणं गरजेचं होतं सचिनच्या गैरहजेरीत क्लायंटचा फोन आला तर साईटची माहिती असणं गरजेचं होतं म्हणून तो स्वतः जात होता. लोअर परेल हून निघाल्यावर ट्रॅफिकजाम मधे गाडी अडकली म्हणून वेग वेगळ्या मार्गांवरुन पुढे जाणं सुरु होतं. काही केल्या गाडी काही वेग पकडेना शेवटी सचिन म्हणाला सर तुम्ही परत ऑफिसला जा मी ट्रेनने साईट वर जाऊन परत येऊन तुम्हाला सर्व रिपोर्ट देतो. पण नंदू काही केल्या तयार होत नव्हता. बराच वेळ असाच गेला शेवटी ड्रायव्हर सुभाषही म्हणाला सर आज नको जाऊया ट्रॅफिक खूपच जाम आहे. सचिन जातो म्हणतोय तर जाऊन येऊ दे. पण नाही नंदू काही ऐकायला तयार नाही. अखेरीस गाडी ईस्टर्न एक्सप्रेस हायवेला लागली. गजनानाने पाठीराखा होऊन नियतीला हुलकावण्या देऊन आपल्या भक्ताला यातून सोडवण्याचा प्रयत्न केला पण आज नियती काही पाठ सोडायला तयार नव्हती. अनेक रस्ते बदलून झाले पण ट्राफिक जाम मधून काही सुटका होत नव्हती. सचिन आणि सुभाष च्या माध्यमातून नंदूला ठाण्याला जाण्यापासून परावृत्त करण्याचा गजाननाचा प्रयत्न अपुरा पडला. गाडी वेगाने शुभ अशुभातलं अंतर कापत निघाली होती. गाडीतले सारे जण कामाच्या गोष्टींमधे व्यस्त होते. नियती मागावर होतीच. ऐरोलीचा फ्लाय ओव्हर ओलांडताना नंदूने सुभाष ड्रायव्हरला फ्लाय ओव्हर संपल्यावर लघुशंके साठी गाडी थांबव म्हणून सांगितलं. पूल ओलांडल्यावर गाडी बाजूला उभी राहिली. नंदू आणि सचिन दोघंही खाली उतरुन सर्विस रोड ओलांडून पलिकडे लघुशंके साठी गेले. सचिन त्यानंतर गाडी कडे परत आला. आता मात्र नियतीला नंदू एकटाच बेसावध क्षणी सापडला. नियती बेस्ट बसच्या रुपात सर्विस रोड वरुन भरधाव वेगात आली.नंदू बेसावध होता कारण दुपारची वेळ होती सर्विस रोडवर वाहतूक अगदी नसल्या सारखीच होती. त्यातून आणि बेस्ट बसेस ना सर्विस रोडवर येण्याला परवानगी नसते. असं असतानाही ती बस त्या रोडवर आली. ईतके अडथळे आणि संकेत मिळूनही नंदू त्या ठिकाणी गेला अगदी ओढून नेल्या सारखा गेला. आणि जे घडू नये ते घडलं. म्हणूनच मी मघापासून नियती नियती म्हणतोय ते याच कारणासाठी. नंदू रस्ता क्रॉस करण्यासाठी वळला मात्र आणि बसने त्याला समजण्याच्या आत त्याला धडक दिली. सचिन आवाज झाला म्हणून मागे वळून पहातो तर त्याचे साहेब रस्त्यावर पडलेले दिसले. तो धावतच जवळ गेला आणि कंडक्टर आणि ड्रायव्हर सुभाषच्या मदतीने नंदूला गाडीत घातलं आणि जवळच असलेल्या फोर्टीस हॉस्पिटलमध्ये नेलं पंधरा मिनिटांत उपचार सुरु झाले. आम्ही काही मित्र होता होईल तितक्या कमी वेळात हॉस्पिटलमध्ये पोहोचलो. भाग्यश्री त्याची पत्नी रेल्वेत नोकरीला आहे ती ही तातडीने व्हि.टी.हून निघून मुलुंडला पोचली. नंदूच्या ईमारतीतले शेजारी पाजारी पोहोचले. डॉक्टरांनी सायंकाळी ब्रेन डेड म्हणून घोषित केलं पण तरीही प्रयत्न सुरुच होते. लाईफ सपोर्टिंग सिस्टीम चालू होती. परिस्थितीशी झुंज देणाऱ्या नंदूची आता नियतीशी झुंज द्यायला सुरुवात झाली होती. आयुष्यात झुंज देत देत प्रत्येक झुंज जिंकत यशाची शिखरं पादाक्रांत करणारा नंदू ही झुंज ही जिंकेल अशी आम्हाला आशा होती आम्ही सारे बाहेर उभे होतो आत आय सी यू मधे नंदूची आणि नियतीची झुंज सुरु होती. पण आता नंदूची गात्रं झुंज देऊन देऊन थकली होती. जवळपास अडतीस वर्ष हा माणूस सतत काम काम करत होता. आता खरं तर सुख, वैभव उपभोगायचे दिवस येत होते. मनात आणखी काही मनसुबे पूर्णत्वाला नेण्याचे बेत ठरत होते आणि ईतक्यात ही अमानवी शक्तीशी झुंज देण्याची वेळ आली होती. तब्बल तीन दिवस त्याने नियतीशी झुंज दिली अखेरीस नियतीने डाव साधला. काळा पुढे शरीर हतबल झालं. नंदूची जीवन ज्योत अखेरीस १७ मे २०१८ रोजी मालवली. माळेतला एक मणी निखळला. मन विदीर्ण झालं. आतल्या आत भावनांचा कल्लोळ झाला. हमसून हमसून रडावसं वाटत होतं. पण आलेले अश्रू पुन्हा आत ढकलून आम्ही उसनं अवसान दाखवत होतो. त्या माऊलीचा आणि तिच्या कच्चा बच्चांचा विचार मनाला तसं करु देत नव्हता. एक चांगला आणि जीवलग मित्र आता दूरच्या कधी परत न येण्याच्या प्रवासाला निघून गेला होता. कुणाशीही न बोलता शेवटची भेट न घेता माळेतून एक मणी अलगद निसटून हरवला.
आता राहिल्या त्या आठवणी. त्याच्या पत्नीचा आणि मुलांचा खंबीरपणा आम्ही पाहिला त्यांनीही वास्तव स्वीकारलंय. पण माझ्या मनात सतत हाच प्रश्न येतो की हे आमच्या नंदूच्याच बाबतीत असं का व्हावं?  देव करतो ते चांगल्यासाठीच करतो असं आपण म्हणतो. यात काय चांगलं केलं त्याने? तो खरंच आहे का? असेल तर त्या वेळी तो कुठे होता? या घटनेने अनेक प्रश्न मनात निर्माण झाले. आणि हे प्रश्न नेहमी सतावत राहतील.
त्याचं कलेवर पाहिल्यावर असं वाटत होतं की तो शांतपणे झोपला आहे. आणि गोविंदाग्रजांच्या ओळी बदलून म्हणावसं वाटलं,

करु नका गलबला अगदी। लागली झोप मम सखयाला!
आधीच झोप त्या नाही। कामाचा एकच चाळा!
जागताच वाऱ्यासरसा। कामाचा घेईल आळा!
                    वाजवू नका पाऊल!
                    लागेल तया चाहूल!
                    झोपेचा हलका फूल!
मग झोपायाचा कुठला! राजहंस माझा निजला!
ईथुन पुढे सर्व आनंदाच्या प्रसंगात एका माणसाची उणीव मात्र कायम राहील. नंदू तुझी आठवण आली नाही असा दिवस कधी जाणार नाही. आमच्या मनात तू कायमचा राहशील.
मित्रा अलविदा!!!

पुष्कराज चव्हाण
दिनांक – २६-०५-२०१८


Comments

Popular posts from this blog

देव आनंद

भक्ती