माझा शैक्षणिक प्रवास
माझा शैक्षणिक प्रवास.
माणसाच्या जीवनावर त्याच्या सभोवतालच्या वातावरणाचा सतत प्रभाव पडत असतो आणि त्यातूनच तो घडत बिघडत असतो या गोष्टीवर माझा विश्वास आहे. प्रत्येक गोष्टीला जसा अपवाद असतो तसा या ही गोष्टीला काही अपवाद असेल नाही असं नाही. परंतु सर्वसाधारण पणे माणसाच्या जडण घडणीत सभोवतालच्या परिस्थिती चा महत्वाचा वाटा असतो हे मात्र खरं.
माझा जन्म हा शिवजीपार्क भागातल्या डॉ. ठाकूरांच्या निर्मल नर्सिंग होम मधला. ही बाब ईतरांच्या लेखी जरी नोंद घेण्याइतपत महत्वाची नसली तरी माझ्या बाबती मात्र निश्चितच खास अशी होती. दादर शिवाजी पार्क मधे जन्माला येणं आणि या परिसरात जीवन जगणं यासाठी त्या व्यक्तीचा ललाट लेख हा सटवाईने खास वेळ काढून स्वतःने लिहीलेला असावा लागतो असा माझा आपला एक समज आहे. त्याच प्रमाणे दादा रेग्यांच्या बालमोहन या विद्या मंदिरात शिक्षण घेण्याचे भाग्यही सर्वांच्याच वाट्याला येतं असं नाही. त्यसाठी सुद्धा पुर्वजनमीची पुण्याई गाठीशी असावी लागते. अशी पुण्याई माझ्या गाठीशी असावी कारण अशा या सरस्वतीच्या मंदिराच्या शिशुवर्गात १९६४ – ६५ साली मला प्रवेश मिळाला आणि माझा शैक्षणिक प्रवास सुरु झाला. ही शाळा, शिवाजी पार्क मैदानात सध्या जे आजी आजोबा ऊद्यान आहे त्याच्या समोरील बाजूस आहे. याठिकाणी शिशुवर्ग आणि बालवर्ग अशी दोन वर्ष काढल्यानंतर आताची जी शाळेची मोठी ईमारत डॉ. मधुकर बी. राऊत रोडवर ऊभी आहे त्या ईमारतीत ईयत्ता पहिली ‘अ’ या वर्गात आलो. शिशुवर्ग आणि बालवर्गात केवळ खेळणे, रंग, आकार ईत्यादी ओळखणे, जंगलजिम वर खेळणे, तीनचाकी स्कूटर चालवणे, बडबड गीते गाणे असे विविध प्रकार चालत असत आणि सर्वच मुलं यात खूष असत.
प्रत्येक शैक्षणिक संस्थेची आपली स्वतःची अशी एक संस्कृती असते तशी ती आमच्या बालमोहनचीही आहे. बालमोहन संस्कृती मधून आलेला विद्यार्थी किंवा विद्यार्थीनी जगाच्या काना कोपऱ्यात कुठेही गेलात तर तो आपल्यावरचा बालमोहनचा छाप किंवा ती संस्कृती सोडणार नाही हे तुम्हाला आढळून येईल इतका त्याचा प्रभाव आहे. दादांचा परीस स्पर्श झालेला एक अन् एक मुलगा, मुलगी आयुष्याच्या परीक्षेत अनुत्तीर्ण होणं केवळ अशक्य आहे.
एकूणच माझे पहिली ते चौथी पर्यंत बालमोहन मधे दिवस मजेत चालले होते. पुढे १९६९ – ७० साली आमच्या दादांनी पुणे जिल्ह्यातील तळेगांव दाभाडे या गावी तळेगाव – चाकण रस्त्यावरील भल्या मोठ्या माळरानावर आपल्या गुरुंच्या नावाने म्हणजे रामभाऊ परुळेकर या नावाने एक वसतिगृह युक्त शाळा सुरु केली आणि मुंबईतील शाळेतल्या मुलांच्या पालकांच्या घरी जाऊन त्यांना विनंती, आग्रह करुन मुलांना या शाळेत पाठवण्यास गळ घातली आणि दादांसारख्या व्यक्ती चा शब्द प्रमाण मानून पालकही मुलांना पाठवायला तयार झाले. दादा जसे ईतरांच्या कडे गेले तसे ते आमच्या कडेही आले होते. भाग्य आणि नशीब हे कोणत्या रुपात आणि कोणत्या वेळी तुमच्या दारावर दस्तक देईल हे फक्त त्या भाग्याला आणि नशीबालाच ठाऊक. दादा त्याच रुपात आले होते, माझ्या वडिलांना सांगत होते कि मी तळेगावला एक छानशी वसतिगृह युक्त शाळा सुरु केली आहे आणि तूमच्या मुलाला तुम्ही तिथे पाठवावं अशी माझी ईच्छा आहे. माझ्या वडीलांनीही मग मला तिकडे तळेगावला पाठवण्याचा निर्णय घेतला. छोट्या शाळेतून मोठ्या शाळेत येण्याचा प्रवास हा तसा काही मोठा नव्हता पण दादरच्या घरा जवळच्या शाळेतून तळेगावच्या वसतिगृह युक्त शाळेत जाण्याचा प्रवास मात्र सर्वच दष्टीने मोठा होता.
१९७१-७२ या शैक्षणिक वर्षात मी तळेगावला येऊन दाखल झालो. मला कल्पनाच नव्हती कि मी आता माझ्या आई वडीलांना सोडून ईतर अनोळखी मुलां बरोबर एकटा रहाणार आहे म्हणून. मी या समजात होतो की आपण नेहमी प्रमाणे फिरायला आलोय. आपापल्या पाल्यांना सोडून पालकांची परत जाण्याची वेळ झाली आणि लक्षात आलं कि आता आपण ईथेच रहायचं आहे. खरं तर आई वडील मला जेव्हा माझ्या खोलीत सोडायला आले होते तेव्हाच मला समजायला हवं होतं किंवा मला तसं वडिलांनी सांगीतलं ही असेल पण माझ्या ते लक्षात आलं नसेल. माझ्या वयाच्या अवघ्या दहाव्या वर्षी माझे आई वडील मला दूरच्या गावी शिक्षणासाठी केवळ दादांच्या शब्दांवर विश्वास ठेवून सोडून निघाले होते. पहिल्या मजल्यावरच्या माझ्या खोलीचे आडवे गज पकडून मी त्या दोघांच्याही दूर दूर जाणाऱ्या पाठमोऱ्या आकृती कडे पाहून किती वेळ टाहो फोडून रडत होतो कुणास ठाऊक. पण त्या दोघांनीही मनावर दगड ठेऊन परतीचा प्रवास सूरु केला होता. एकदाही मागे वळून पाहीलं नव्हतं. कदाचित त्यांनाही आपले अश्रू दाखवायचे नसतील. कमी अधिक प्रमाणात जवळपास सर्वांच्याच बाबतीत असंच चाललं होतं. आमच्या पेक्षा वयाने मोठी मुलं आमच्या पाठीवरुन हात फिरवत होती, आमची समजूत काढत होती, आमचं मन वळवण्याचा प्रयत्न करत होती. मी रडून रडून केव्हा झोपी गेलो हे समजलंच नाही. बऱ्याच वेळाने एका मोठ्या ईलेक्ट्रीक बेलच्या आवाजाने जाग आली तेव्हा जेवणाची वेळ झाली होती. सर्व मुलं ज्या दिशेने जात होती त्या दिशेने एकमेकांच्या पाठून आम्ही निघालो आणि तळ मजल्यावरील जेवणाच्या हॉल मधे आलो. तिथे दहा दहा मुलांना बसता येईल अशी जेवणाची टेबलं होती. ताटं मांडलेली होती आणि वाढपी वाढायला येऊन वाढायला सुरुवात झाली. पुन्हा घरच्यांची आठवण येऊ लागली पुढ्यात वाढलेलं अन्न अस्पष्ट दिसू लागलं आणि अश्रू घळघळा गालांवरुन वाहू लागले. भरल्या ताटावर घरच्या आठवणीने रडणं सुरु झालं. घास घशाखाली जाईना. मावशी, म्हणजे बाळ सरांच्या सौभाग्यवती आणि ताई म्हणजे फेणाणी बाई आईच्या मायेने पाठीवरुन हात फिरवून समजूत घालत होत्या. मनाला हळू हळू कळू लागलं होतं पण ते काही केल्या वळायला तयार होत नव्हतं. नेहमी जेवताना आईची वात्सल्यमुर्ती समोर पहाण्याची सवय त्या जागी वाढपी दिसत होते.
कसंबसं जेवण पोटात ढकलून तिथून निघून खोलीत येऊन बसलो. खोलीत एकूण वीस मुलं होती. प्रत्येकालाभिंतीत एक छोटं कपाट, एक लोखंडी पलंग आणि झाकण लावता येईल असं एक अभ्यासाचं लाकडी टेबल होतं त्यातच वह्या पुस्तकं ठेऊन त्याला कुलुप लावण्याची सोय होती. खोलीत सर्वजण एक मेकांची तोंडं पहात किंवा काहीबाही करीत बसले होते. झोपण्याच्या वेळी पुन्हा मुसमुसण्याचे आवाज पांघरुणांतून येऊ लागले आणि हळू हळू सारेजण रडून, थकून भागून निद्रादेवीच्या कुशीत विसावले.
दुसऱ्या दिवशी पहाटेचे सहा वाजता बेलच्या आवाजाने जाग आली आणि स्वावलंबी जीवनाचा पहिला दिवस सुरु झाला. घरी असताना थोडं प्रेमाने आई किंवा वडिलांनी ऊठवण्याची संवय होती. ब्रश वर पेस्ट लावून मिळायची. पण
आता ते मागे पडलं होतं. माधव ज्युलियनांच्या ‘दुरस्थ मातेस’ या कवितेतील ओळींप्रमाणे अवस्था होती. ‘ प्रातःकाली अतां तुझे नच घडे सुस्निग्ध तें दर्शन, कीं ज्याच्या शकुने सबंध मग तो जावा सुखाने दिन. लाभेना तुज हातचे गरिबिचे स्वादिष्ट ते जेवण, कीं जेणे मुठमूठ मांस चढुनी यावें मला मीपण.’ आता प्रत्येक गोष्ट ईलेक्ट्रीक बेलच्या सहाय्याने सांगितली किंवा कळवली जात होती. मुखमार्जनादि पातर्विधी उरकल्यानंतर तयार होऊन पी. टी. करीता मैदानावर जाणे भाग असे. मग आलं स्वतःचे कपडे स्वतः कपाटातून काढणे. परत घरची आठवण. अशा प्रकारे प्रत्येक गोष्टीत मग घरच्या संवयी बरोबर तुलना होऊ लागे आणि डोळे डबडबत असत. अंघोळीचं पाणी सेधक काढून देई पण व्हरांड्या पासून बाथरुम पर्यंत आम्हीच नेत असू अगदीच कुणाला नेता आली नाही तर तो सेवक नेऊन देई. बहुतेक सेवक खरंच खूप प्रेमळ होते. ते गमती जमती करुन मुलांना खुश ठेवण्याचा प्रयत्न करीत असत. पी.टी. झाल्यावर अंघोळी आवरुन ब्रेकफास्ट साठी आम्ही पुन्हा डायनिंग हॉल मधे जात असू. हे सर्व वेळेत होत असे. नंतर आम्ही एक दीड तास अभ्यास करुन शाळेत जाण्याची तयारी करायचो. शाळेची वेळ मुंबई च्या शाळे प्रमाणेच होती १०:४० ते ५:४० त्यामुळे १० वाजता जेवण जेऊन आम्ही सर्व शाळेकडे जायला निघायचो. आता ईथुन पुढे गंमत जंमत सुरु होई.
वसतिगृहातून बाहेर पडल्यावर खऱ्या अर्थाने आम्ही तळेगावच्या त्या माळावरच्या निसर्गरम्य वातावरणात दाखल व्हायचो. माळावरची जमीन मुरुमाची होती. माळ ईतका पसरलेला होता कि नजर जाईल तिथवर नुसता माळच माळ पण हा माळ रुक्ष नव्हता बऱ्यापैकी गवत आणि झाडं होती त्यावर. आजुबाजूला काही शेत जमीन ही होती. शाळा वसतिगृहा समोरच थोडी चढणीवर होती. अदमासे तीन चार फर्लांगभर अंतर असेल. आणि आमच्या दादांच्या बाळसरांच्या आणि मावशी आणि ताईंच्या मायेने आणि ममतेने तो संपूर्ण माळ भारलेला होता. त्यात तो मायेचा ओलावा भरलेला होता. वसतिगृहा च्या बाहेर पडल्यावर डाव्या हाताला दूरवर नजर फिरवली तर तिथे भंडारा डोंगर आहे. या ठिकाणी तुकाराम महाराज अभंग रचना करीत असत. तिथून अलीकडे आल्यावर ईंदुरी गांव लागे तिथे एक शिवाजीमहाराजांच्या काळातली गढी पडझड झालेल्या अवस्थेत का होईना पण ऊभी होती. ऊजवी कडे दूरवर हरण टेकडी नांवाची एक टेकडी होती. यादोघांच्या मधे आमच्या या दोन वास्तू ऊभ्या होत्या. जवळपास वस्ती अगदीच नगण्य असल्या कारणाने माळावर वारा फार सुरेख असे. पुढे शाळेच्या दिशेने वाटचाल करताना पायाखालचा रस्ता मुलांनीच श्रमदानाने बनवलेला माती आणि मुरुमाचा नागमोडी असा चढणीचा होता. आम्ही आपले रमत गमत मोकळी स्वच्छ हवा फुफ्फुसांमधे भरून घेत निवांत शाळेत जात असू. वाटेत आम्हाला आकर्षित करणारे रंगीबेरंगी दगड सापडत असत. जाता येताना आम्ही ते खडे वेचायचो आणि पाण्याने स्वच्छ धूवुन ते जपून ठेवायचो. माळावरच उगवलेल्या तुरीच्या शेंगा खायचो. असं करत करत आम्ही शाळेत पोहोचत असू. रस्त्याला आमच्या शिवाय कुणीही नसे. साधी बैलगाडी सुद्धा नसे. मोटर गाडी तर दुरचीच बात. शाळेची ईमारत बैठी, आडवी पसरलेली पण दोन ओळींत बांधलेली होती. दोन ओळींच्या मधे छोटे छोटे बगीचे बनवलेले होते. वर्गांच्या खिडक्या जमिनीपासून जेमतेम चार पांच फुट ऊंचीवर होत्या त्यामुळे त्या झाडांच्या सान्निध्यात बसूनच आपण शिकत असल्याचा भास होई. या झाडांच्या सावली मुळे गारवाही छान असे आणि वाऱ्याच्या मंद झुळुकाही अंगावर येत. त्यामुळे वातावरण प्रसन्न असे. शाळेसमोर ऐसपैस पसरलेलं मैदान होतं. मैदान ओलांडलं कि लगेच तळेगांव – चाकण रस्ता आणि रस्ता ओलांडल्यावर पुन्हा उतरणीचा माळ होता. त्यापलिकडे रेल्वे लाईन. रेल्वे लाईन पुढे गांव होता आणि त्याच्या ऊशाशी भेगडेवाडीचा डोंगर होता. ईकडे वसतिगृहा च्या मागील बाजूस डाव्याबाजूला एक भली मोडठ्ठी विहीर होती. विहीरी पलीकडे एका शेतकऱ्याच घर होतं. त्यापुढे त्याचं शेत होतं. या शेतकऱ्याची मुलं त्यांच्या दांडग्या कुत्र्याना घेऊन आणि तीरकमठा घेऊन कइही ना काही उद्योग करत फिरत असत. आमच्या वसति गृहा च्या कुत्र्याची आणि त्या कुत्र्यांची नेहमी जुंपे पण ती कुत्री फार तिखट होती अजिबात माघार घेत नसत. वसतिगृहा च्या उजव्या बाजूला गोठा होता. तिथे चार जर्सी गाई दादानी मुलांना चांगलं दूध प्यायला मिळावं म्हणून आणून ठेवल्या होत्या. एक एक गाय भरपूर दूध देत असे. जोडीला एक बैल जोडी होती, आणि छानशी बैलगाडी ही होती. बैलपोळा ही आम्ही आनंदात आणि ऊत्साहात साजरा करायचो. संध्याकाळी शाळा संपल्यावर आम्हाला आळीपाळीने घोडेस्वारी शिकवली जात असे. कर्जतच्या सुप्रसिद्ध दिवाडकरांची दोन मुलं प्रदिप आणि संदिप आमच्या बरोबर शिकायला होती. त्याना घोडेस्वारीची संवय होती म्हणून त्यांचे दोन अगदी ऊत्तम प्रतीचे घोडे त्यांनी तिथे आणून ठेवले होते आणि बरोबर दोन साईस पण ठेवले होते. हे दोघही साईस आम्हा मुलाना घोडेस्वारी शिकवत असत. रात्रीचं जेवण झालं की झोपण्या पूर्वी आम्हाला एक ग्लास दुध प्यायला देत असत. आठवड्यातून दोन दिवस नॉनव्हेज जेवण असे. महीन्यातून एक दिवस पार्टी असे त्याला आम्ही सहभोजन म्हणत असू. या वेळी सर्वांनी ठेवणीतले कपडे घालून जेवायला येण्याचा नियम असे. जेवणाच्या हॉल मधे दुतर्फा शिक्षक वर्ग यजमान बनून स्वागताला उभे रहात. आम्हु सर्वांना हात जोडून नमस्कारुन स्वागत स्वीकारत आपापल्या जागेवर जाऊन बसायचो आणि मग सामिष आणि निरामिस भोजनाचा आस्वाद घ्यायचो. अशा वेळी सुवासिक ऊदबत्त्या लावलेल्या असत आणि वातावरणात आनंद पसरलेला असे. एकूणच महीन्याकाठी आमची पालक मंडळी जी काही फी भरत असतील त्यापेक्षा अंमळे जास्तच देण्याचा शाळेकडून प्रयत्न होत असे. आठवड्यातून एकदा सिनेमा दाखवला जाई. फिरायला नेत असत. त्यात विविधता असे. निसर्गाची माहिती करुन देणे हा त्यामागचा एक उद्देश असे. गिरी भ्रमणाच्या प्रसंगी खुद्द गो. नी. दांडेकर आमच्या सोबत असत.
दादांनी आणि बाळ सरांनी बरीच प्रेमळ मंडळी सेवक वर्गात नेमलेली होती. त्यात नावं घेण्याजोगी माणसं म्हणजे रामा शिपाई, विनायक, शांताराम डुंबरे, गुणाजी असे अनेक जण होते. दादा आणि बाळसरांनी जणू काही ठरवलेलंच होतं कीं मुलांना घरची ऊणीव भासू द्यायची नाही. दिवसाचा कार्यक्रम ही असा आखलेला असे की मुलांना सवड मिळू नये आणि घरची आठवण येऊ नये. तरीही तिन्हीसांजेला मन थोड्या वेळा करीता ऊदास होई. ‘ आहे मनोहर तरी गमते उदास’ अशी अवस्था होई, त्या कवितेतील ‘विद्या, कला, कुशलता बहु जेथ होत्या। जै सृष्टिसुंदरीविलासनिवास होत्या.......’ या पंक्तींप्रमाणे सारं काही असून मन मात्र उदास होई. पण हे सारं काही सुरुवातीच्या काळात प्रत्येकाच्या बाबतीत होई. जसे जसे दिवस पुढे जात तसं तसं आम्ही त्या वातावरणात समरस होत असू.
या निसर्ग रम्य वातावरणात शिकताना खरंच खुप मजा येत असे. जून महिन्यात शाळा सुरु होत असल्याने आणि पुढील तीन साडेतीन महिने छान पाऊस असल्याने वातावरण सुखद आणि अल्हाददायक असे. शाळेतल्या कविता आम्ही या निसर्गाच्या सान्निध्यात शिकलो. त्या कविता आम्ही अनुभवल्या. ‘गवत फुला रे गवत फुला’ या कवितेतलं गवत फुल आम्ही आमच्या डोळ्याने पाहिलंय. श्रावण मासी हर्ष मानसी आम्ही अनुभवलंय. क्षणात सर सर करुन येणारी पावसाची सर आणि क्षणात पडणारं पिवळं धम्मक ऊन आम्ही अंगावर घेतलंय, प्रत्यक्षात अनुभवलंय. मोकळ्या रानावर पसरणारा वारा त्यावर डोलणारं गवत, सभोवतालची शेतं, हे सारं आम्हाला अनुभवायला मिळालं तिथे. शहरात फक्त कविता म्हंटल्या असत्या, घोकंपट्टी केली असती आणि परीक्षेत उत्तरं लिहीली असती. पण ईथे तळेगांवातल्या त्या वातावरणात आम्ही त्या प्रत्यक्ष अनुभवत होतो. बालकविंचा आनंदी आनंद गडे सर्व ठिकाणी भरलेला अनुभवलाय. बालकविंचेच हिरवे हिरवे गार गालीचे, हरित तृणांचे मखमालीचे हे आम्ही कवितेच्या पुस्तकांत वाचले ही पण प्रत्यक्षातही अनुभवले. मी ऐकलंय कि रविंद्रनाथ टागोरांनी निसर्गात मुलांना शिकवण्याची पद्धत सुरु केली होती शांतिनिकेतन मध्ये. पण ती दूरवर तिथे बंगालात होती. दादांनी आणि बाळसरांनी ती महाराष्ट्रात आणून दिली. आमच्या भाग्याने आम्हाला निसर्गाच्या कुशीत बसून शिकण्याची संधी मिळवून दिली. आम्ही केवळ पुस्तकी ज्ञान घेत नव्हतो तर आम्ही घडत होतो. सहजीवनाचे धडे घेत होतो. निसर्गाचं निजरुप अनुभवत होतो. तुकारामाला पांडुरंगाकडे निजरुप दाखवण्या करीता मनधरणी करावी लागली असेल पण दादांनी आमच्यासाठी निजरुपातला देव तुकाराम महाराजाच्या भंडारा डोंगराच्या समोर येऊन ठाकलेला असताना दाखवला. तुकाराम महाराज वैकुंठाला निघुन गेले होते आणि आम्ही वैकुंठाचं मनोहारी दर्शन नित्यही भूतलावर घेत होतो. घेता कीती घेशील दोहो करांनी अशी आमची अवस्था होती. सोबतीला बाळसर, मावशी, ताई आणि ईतर सेवक वर्गासोबत शिक्षकवर्गही असे. माणूस किती शिकला या पेक्षा तो कसा शिकला हे पाहिलं पाहिजे ते जास्त महत्वाचं आहे. चार भिंतीत गरगरणाऱ्या पंख्याखाली बसून निसर्ग वर्णन वाचण्या पेक्षा निसर्गाच्या पंखांखाली बसून निसर्ग वाचायला मिळणं ही किती भाग्याची गोष्ट आहे सांगा पाहू? त्या माळरानावर श्रावण मासी हर्ष मानसी शिकताना शाळेच्या अंगणातून आभाळात दिसणारे श्रावणातल्या ऊन पावसाच्या खेळात दिसणारे इंद्रधनुष्य किती विलोभनीय दिसत असे. शिशीरातल्या कोवळ्या ऊन्हात शेळ्या – मेंढ्यांना चारणारा धनगर, त्याच्या अंगावरची घोंगडी, त्याचं चटकदार रंगाचं मुंडासं हातातली विळा टोकाला बांधलेली काठी, एका हातात ऊचलून धरलेलं कोकरू तोंडाने चित्र विचित्र आवाज काढत संपूर्ण कळप एकत्र ठेवणं, बरोबरची त्याची पळणारी चपळ, चलाख कुत्री आणि सकाळची शांत निवांत वेळ हे नैसर्गिक चित्र आम्ही तळेगावात अनुभवलंय. या शाळेत आमच्यासाठी सर्व सण साजरे होत असत. सणावारी गोडधोडाचं सुग्रास जेवण आम्हाला मिळत असे. रंग खेळायला मिळत असत. छान छान गोष्टी ऐकायला मिळत,संक्रांतीच्या दिवसांत दादा मुंबई हून पतंग, तिळगूळ घेऊन येत. एकूणच काय तर जे जे मुलांना घरी मिळत असे ते ते किंबहुना कांकणभर जास्तच देण्याचा दादा आणि बाळसर प्रयत्न करीत असत. मी तीन वर्ष या शाळेत होतो पण जो काळ मी आणि माझ्या ईतर मित्रांनी ईथे घालवला तो आयुष्यात स्वप्नवत वाटावा असा होता. दादा गेले, आमच्या मधे आमच्यातलेच एक होऊन मित्रत्वाच्या नात्याने रहाणारे बाळसर अचानक हात सोडून निघून गेले, ताई तर त्यांच्या अखेरच्या दिवसात माझ्या समोरच्या फ्लॅट मधे त्यांच्या भावा कडे रहात होत्या तिथेच निवर्तल्या. आयुष्यात रक्ताच्या नात्यातली नसून सुद्धा रक्ताच्या नात्याहूनही नात्याची दाट साय देणारी मायेची माणसं एक एक करुन काळाच्या पडद्या आड निघून गेली. आता आम्ही मुला नातवडांना माया देण्याच्या वयाचे झालो पण ती मायेची पखरण आपल्यावर अजूनही होत रहावी असं आजही अधून मधून वाटतं. आजही माझे जेवणाच्या बाबतीत नखरे आहेत तेव्हाही होते मावशी शेजारी बसून पानातलं सर्व संपवायला लावत. मागे एकदा मी माझ्या पत्नीला आणि मुलीला तळेगावची शाळा दाखवायला नेलं होतं तेव्हा मावशी भेटल्या होत्या त्यांनी माझ्या पत्नीची ओळख करुन दिल्यावर पहिला प्रश्न विचारला तो म्हणजे “ भाज्या खातो कागं हा सगळ्या? नखरे न करता? “ माझ्या मुली आणि माझी पत्नी माझ्या तोंडा कडे बघतच राहील्या. त्यांना प्रश्न पडला असेल ईतक्या वर्षांनी ईतकी मुलं हाता खालून जाऊन सुद्धा नेमकं हे कसं लक्षात राहीलं यांच्या? याला म्हणतात माया, ममता अंतःकरणापासून झोकून देऊन सेवाभावी वृत्ती ने काम करणं. अशी ही स्वप्नवत वाटणारी शाळा मिळण्यास खरंच पूर्व जन्मीची पुण्याई गाठीशी असावी लागते आणि सुरुवातीलाच म्हंटल्या प्रमाणे सटवाईने खास सवड काढून त्या भाग्यवंताचा ललाटलेख लिहिलेला असावा लागतो.
पुष्कराज चव्हाण
२१-०५-२०१६

Comments
Post a Comment