रेडिओ

रेडिओ
तसा रेडिओ लहरींचा शोध लावणे हे पार १९ व्या शतकाच्या सुरुवातीच्या काळा पासून सुरु झालेले होते.उपलब्ध माहीती नुसार जर्मनीच्या हेनरिक रुडॉल्फ हर्ट्झ याने ध्वनी लहरीच्या शिस्तबद्ध आणि सूत्रबद्ध पणे प्रसारणाचा पहीला प्रयोग यशस्वी केला व आपला शोध निबंध १८८७ व १८९० साली प्रसिद्ध केला. पुढे २३ डिसेंबर १९०० साली इटलीचा शास्त्रज्ञ गुलेल्मो मार्कोनीने पहीलं उपकरण तयार करुन रेडिओ लहरींद्वारा संदेश वहनाचा पहीला प्रयोग यशस्वी करुन दाखवला आणि रेडिओचा जन्म झाला, साहजिकच रेडिओचे जनकत्व मार्कोनी कडे गेलं. पुढे १९२३ साली या रेडिओला ब्रिटीशांनी भारतात आणलं आणि १९२७ साली मुंबई केंद्र सुरु झालं.

भारतीयांच्या जीवनात जरी हा रेडिओ १९२३ साली आला असला तरी तो ब्रिटिश आणि उच्चभ्रूंच्या पर्यंत मर्यादित होता. खऱ्या अर्थाने तो सामान्यांपर्यंत पोहोचण्या करीता स्वातंत्र्योत्तर काळ उजाडावा लागला. तरीही १९५६ पर्यंत जवळपास ४ करोड लोकसंख्या असलेल्या आपल्या देशात एकूण २,७५,००० रेडिओ सेट्सची नोंद झालेली होती. पुढे पुढे त्याने आपले हात पाय पसरायला सुरुवात केली आणि सर्व सामांन्यांच्या घरात आणि हृदयात अढळ स्थान पटकावलं. हा रेडिओ सामान्य माणसाच्या आयुष्यात येण्यापूर्वी लोक देवळात किंवा ईतरत्र जाऊन हरिविजय किंवा पांडव प्रताप यावर किर्तनं ऐकत असत. बागेत किंवा चौपाटी सारख्या ठिकाणी फिरायला जात असत. किंवा चित्रपट, नाटक पहायला जात असत.

असो, तर या रेडिओ सेट चा शोध लावून मार्कोनी ने सामान्य माणसाच्या जीवनात घर बसल्या विरंगुळा मिळण्याची सोय करुन त्याचे जीवन आनंदमय करुन टाकलं. आमच्या सारख्या मध्यम वर्गीयांच्या घराचा तर तो अविभाज्या भाग बनून गेला. याचा दिनक्रम काहीसा पुढील प्रमाणे असे.

 पहाटेचा सूर्य उगवण्यापूर्वीच हा रेडिओ घरातल्या कर्त्या पुरुषा सोबत ( स्वतः पुरता चहा करणारा ) जागा होत असे. सुरुवातीला आकाशवाणीची धून झाली कि मग गंभीर सुरातले वंदेमातरम होई. त्यानंतर अत्यंत गंभीर सुरात व शक्य तितक्या खर्जातल्या आवाजात “दिल्ली केंद्र से समाचार”  हरि संधू किंवा बिमलेंदु पांडे अशा प्रकारची अवजड नांवं असलेली माणसं देत असत. पहाटेच्या त्या नीरव शांततेत त्या गंभीर आवाजातल्या बातम्या तितकेच गंभीर चेहरे करून ऐकणारी घरातली ज्येष्ठ मंडळी पहाताना गंमत वाटे. सर्व घरांमधून हाच प्रकार सुरु असे. हा सारा थोरांचा मामला आटोपला कि मग भूपाळी, भक्ती गीतं आणि भाव गीतं हे सुरु होई. मधे मधे ठरलेल्या वेळांत प्रादेशिक बातम्या होत असत. हे सारं होईस्तोवर ज्येष्ठांची कार्यालयाला निघण्याची वेळ होई. तो पर्यंत युवा वर्ग जागा होऊन रेडिओचा ताबा घेई व “विविध भारती का रंगारंग कार्यक्रम” सुरु होई. या कार्यक्रमात त्या काळातल्या सिनेमांची लोकप्रिय गाणी लावली जात. मधून मधून जाहीरातीही सुरु असत. त्यात वुडवर्डचं ग्राईप वॉटर, “तंदुरुस्ती कि रक्षा करता है लाईफबॉय” आणि “ये ढेर से कपडे मै कैसे धोऊँ अच्छा साबुन कौनसा लाऊ” ही धंतक का डबल बी अशा साबणाच्या, “आईगं वैतागले मी या केसांना” ही प्रकाशचं माक्याचं तेल किंवा डाबर आमला केश तेल, “सिर्फ एक सरीडॉन और सरदर्द से आराम,” अनासिन ईत्यादी जाहीराती असत. हे सारं काही सुरु असताना महीलांचं  स्वयंपाक पाणी चालु असे. सर्वाचं नाश्ता पाणी, जेवणखाण उरके पर्यंत दुपार होत असे. पुरुष मंडळी ऑफिसमधे, मुलं शाळा कॉलेजात गेलेली असत आणि घरातली गृहिणी घरातली कामं आवरुन स्वस्थ चित्ताने हुश्श करुन दिवाण खान्यात येऊन माहेर, रसरंग अशा मासिकाचा अंक हातात घेऊन पदराने घाम पुसत पंख्या खाली येऊन बसते.  रेडिओचं स्टेशन बदललं जातं. एक कान त्याच्या कडे असतोच.एव्हाना रेडिओने आपल्या मालकीणी  साठी विशेष कार्यक्रम सुरु केलेला असतो त्यात श्रुतिका, खाद्य पदार्थांची कृति, आरोग्य विषयक किंवा गृह सजावट विषयक कार्यक्रम, ताईचा सल्ला वगैरे ऐकणं चालू असतं. हे कार्यक्रम संपता संपता मुलं शाळा, कॉलेजातून येण्याची वेळ झालेली असते. साधारणतः सायंकाळी पाच ते सात पर्यंत या रेडिओ कडे विशेष कोणाचं लक्ष नसे. मुलं दप्तरं टाकून दूध वगैरे पिऊन बाहेर खेळायला निघून जात. तरुण – तरुणी नट्टापट्टा करुन फिरायला निघून जात. गृहिणी पुन्हा यजमानांसाठी चहा फराळ बनवण्याच्या आणि सायंकाळच्या स्वयंपाकाच्या गडबडीत मग्न होऊन जात. तर अशा वेळी या रेडिओचं अस्तित्व जाणवायच ते कोपऱ्यावरच्या ईराण्याच्या हॉटेलात. संध्याकाळी अगदी स्वस्तात वेळ घालवण्याचं ठिकाण म्हणजे हि प्रत्येक नाक्यावर मोक्याच्या ठिकाणी असलेली ईराण्याची हॉटेलं. एक चहा मागवला कि तासभर आरामात या ठिकाणी बसून रेडिओवरची गाणी ऐकायला मिळायची. गल्यावरुन मधनं, मधनं मालकाचा आवाज येत असे आणि पाठीमागे मोठ्या आवाजात हिंदी सिनेमातली गाणी सुरु असत. केसाचा कोंबडा काढलेले गुलछबू तरुण सिगारेटच्या धुराची वलयं काढत ही अवीट गोडीची गाणी ऐकत बसलेली असत. रेडिओ ही अव्याहत पणे आपलं काम चोख पणे करत असतो. ईकडे घरात सातच्या बातम्या सुरु झालेल्या असत. त्या होईपर्यंत मुलं घराकडे परतलेली असत. हात पाय तोंड धुऊन परवचा म्हणून झाल्या कि तासभर गृहपाठ, अभ्यास वगैरे सुरु होई तोवर हा रेडीओ शांत असे.  सायंकाळची जेवणं आटोपली कि नभोनाट्य, आपली आवड, बिनाका गीत माला, हवा महल, ठराविक श्रुतिका ( टेकाडे भाऊजी वगैरे )  हे त्या त्या वारांचे ते ते कार्यक्रम सुरु होत असत.   बिनाका गीतमाला हा कार्यक्रम तर ईतका लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचला होता कि अमीन सयानींची भाईयो और बहनो ही साद ऐकली कि लोक तहान भुक विसरुन रेडिओ सेट समोर कानांत प्राण आणून पुढील प्रत्येक शब्द अन् गाणं कानात साठवून घेत असत.  अशा वेळी ज्यांच्या घरी रेडिओ असत ते थोडा मोठ्या आवाजात रेडिओ लावत आणि ज्यांच्या कडे रेडिओ नसत ते रेडिओ असलेल्यांच्या घराच्या अवती भोवती घुटमळत हे कार्यक्रम ऐकत असत. रात्री नाट्यसंगीत व त्यानंतर शास्त्रीय संगीत असा हा रेडिओचा दिनक्रम असे. शनिवारी सकाळी कामगार विश्व आणि रविवारी लहानग्यांसाठी सकाळी गंमत जंमत, बालगीतं, नाटीका असे कार्यक्रम असत. दुपारच्या वेळेला चित्रपटांचे रेडिओ प्रोग्राम लागत असत, त्यात येऊ घातलेल्या सिनेमांची संक्षिप्त कहाणी ऐकवली जात असे व पुढे ऊत्कंठा शीगेला पोहोचली कि मग सांगितलं जाई “आगे क्या होता है? देखिए अपने नजदीकी सिनेमा घरों मे जाके” कि मग तरुण मंडळी ठरवत असत कि हा सिनेमा कधी पहायचा? किंवा पहायचा कि नाही.

ईतरही वेळी प्रसंगानुरुप कार्यक्रम चालू असत कसोटी क्रिकेट मालिकेच्या वेळी धावते समालोचन, पंतप्रधानांचे भाषण, जगात कुठे लढाई सुरु असेल तर त्या बाबतच्या बातम्या किंवा तज्ञ मंडळींची चर्चा वगैरे वगैरे. हे सर्व सुरु असताना ऐकणारे फार श्रद्धेने आणि तल्लीन होऊन ऐकत असत, ईतके कि काही विचारु नका. जणू काही नेहरु किंवा शास्त्री प्रत्यक्ष यांच्या दिवाण खान्यात येऊन यांच्याशी बोलताहेत. किंवा कसोटी भारत जिंकला तर यांचा पगार वाढून यांच्या जीवनमानात सुधारणा होणार आहे. एक वर्ग असा ही होता कि जो बीबीसी किंवा व्हॉईस ऑफ अमेरीका ऐकायचा आणि मग बोलताना त्यातल्या बातम्यांचे दाखले द्यायचा. यात मी बी बी सी किंवा व्हॉईस ऑफ अमेरिका ऐकतो याची ऐट मिरवण्याचाच भाग जास्त असे. एरव्ही देशांतर्गत घडामोडींचाच काय पण ्वतः रहात असलेल्या चाळीतील घडामोडींचाही ज्यांच्या आयुष्यावर काडीमात्र परिणाम होत नाही त्यांच्या जीवनात आंतरराष्ट्रीय घडामोडींनी काय परिणाम होतो हे त्यांचं त्यांनाच ठाऊक.

रेडिओ जसा ईराण्याच्या हॉटेलात असायचा तसाच तो न्हाव्याच्या दुकानात ही असे. न्हाव्याच्या दुकानातलं दृष्य ही पहाण्यासारखं असे. रेडिओवर काहीही सुरु असू दे सारी गिर्हाईकं निमुटपणे मान खाली घालून शांत चित्ताने ऐकत असतात. न्हावी अत्यंत गंभीर भाव चेहऱ्यावर वागवत तल्लीन होऊन कात्री आणि कंगव्याच्या आवाजाच्या तालात रममाण होऊन पुढ्यात बसलेल्या गिर्हाईकाचं डोकं ईकडे तिकडे किंवा वर खाली करुन भादरत असतो. न्हावीच तो, अनेकांच्या मुंड्या मारता मारता ज्ञानात भर पडलेली असतेच त्यामुळे रेडिओवर कोणत्याही विषयावर चर्चा सुरु असू दे हा त्यात भाग घेऊन गिर्हाईकाची परीक्षा घेणारच. क्रिकेट चालू असेल तर विजय मांजरेकर आणि विजय हजारेनी कसं खेळलं पाहीजे हे ही सांगणार. बातम्या किंवा आंतरराष्ट्रीय संबंधांबाबत चर्चा सुरु असेल तर ताश्कंद करारात काय अटी हव्या होत्या किंवा बांगला देश युद्धात युद्ध कैद्यांना सोडताना बदल्यात पाक व्याप्त काश्मीर सोडवून कसं घ्यायला हवं होतं हे ही सांगणार. रेडिओ ने सामान्यांच्या ज्ञानात किंवा माहीतीत किती असामान्य भर घातली होती हे यावरुन तुम्हाला समजेल.

हा रेडिओं लोकांच्या फार जिव्हळ्याचा होता. कधी लाकडी कॅबिनेट मधे तो येत असे तर कधी बॅकेलाईट कॅबिनेट मधे हा असे. वाल्व्हचा हा रेडिओ वाल्व्ह गरम झाल्यावर बोलू लागे. समोरील बाजुस प्लास्टिकच्या फूटपट्टी सारखी डायल असे त्यात आतून दिवे असत. डायलच्या दोन्ही बाजूस पांढरी बटणं चालू करण्यासाठी आणि स्टेशन बदलण्यासाठी. वरच्या अर्ध्या भागात कापडाची जाळी व त्याच्या आत स्पीकर, उजव्या बाजूच्या वरच्या कोपऱ्यात एक नीळा किंवा हिरवा छोटासा दिवा असे त्यात एक बाहुली सारखं कहीतरी दिसे, स्टेशन ट्यूनिंगच्या अचूकतेवर ती लहान मोठी होत असे. हे सारं फार मजेशीर वाटे. हा सेट घरात आला कि दिवाणखान्यात एका खास टेबलवर विराजमान होत असे. त्यावर क्रोशाने विणलेलं, नक्षीकाम केलेलं आच्छादन येई. घरा बाहेर त्याची लाकडी अँटेना लावली जाई., जवळच्याच ड्रॉवर मधे त्याचं लायसन्स ठेवलं जाई. अशी याची बडदास्त असे. आता हा जवळ पास सर्वच घरांमधुन नामशेष झालाय.
अलिकडेच मुंबईत चोर बाजारात मला यातले काही रेडिओ पहायला मिळाले अजूनही ते तिथे आहेत पण ते सिनेमा नाटकाच्या सेटवर जुन्या काळातला देखावा ऊभा करण्याच्या कामासाठी भाड्याने देण्या करीता असतात असं चौकशी अंती समजलं. ईतकी वर्ष रसिकांची अव्याहत आवाजी सेवा बजावल्यावर  आता त्याचं अस्तित्व हे त्याच्या स्वतःच्या ऊमेदीच्या काळाचे मूक साक्षीदार होण्या पुरते मर्यादित राहीलेले असल्याचे पाहून आणि ऐकून मन खिन्न झालं.

पुष्कराज चव्हाण
१८-०३-२०१६.

Comments

Popular posts from this blog

देव आनंद

भक्ती