रिगलच्या निमित्ताने......

रिगलच्या निमित्ताने......
               हल्ली व्हॉट्स अप् म्हणा फेसबुक म्हणा किंवा ईतर काही म्हणा पण सोशल मिडिया मुळे आपल्या माहितीत चांगल्या-वाईट माहिती, बातम्या, अफवा या साऱ्यांची भर पडत असते. काही खऱ्या काही खोट्या असतात. पण त्या आपल्यापर्यंत पोहोचतात हे मात्र खरं. आपणही त्या गोष्टी पुढे पाठवत असतो. कधी तशाच्या तशा किंवा कधी कधी खरं खोटं तपासून मग. पण प्रसारण हे सुरुच असतं.
             तशीच आज एक बातमी आली (खरी की खोटी रिगल वालेच जाणोत.) की दक्षिण मुंबईत असेलेलं रिगल सिनेमागृह लवकरच काळाच्या पडद्याआड जाणार आहे. हे वाचलं मात्र, स्मृती पटलावरची जमा झालेली धूळ वाऱ्याच्या झोताने उडावी तशी उडू लागली, स्मृती पर्णे झर झर उलटू लागली.
                अगदी फार पूर्वी नाही पण अगदी अलीकडे म्हणजे साधारणपणे ८० च्या दशकाच्या काळात आमच्या युवावस्थेत असताना आम्ही मित्रद्वयींनी म्हणजे मी आणि माझा मित्र हिमांशु पंडित ने तिथे त्या परिसरात घालवलेला काळ डोळ्यासमोर आला. त्यासुमारास आम्ही नुकतेच पैसे कमवायला लागलो होतो. त्यामुळे थोड्या प्रमाणात का होईना पण चैन करता येत असे. शिवाय लॅच कि आणि गाडीची चावी हातात असल्याने रात्री उशीरा गुपचुप येउन झोपताही येत असे. साधारणपणे सायंकाळी घरातून निघून कुलाबा भागात मॉन्डेगार मधे एक बीयर आणि पोटभर चिकन खाऊन किंवा बगदादी मधे चिकन हाणून, कधीतरी लिओपोल्ड मधे जेऊन जवळच रिगल मधे सिनेमा बघायला जायचं आणि सिनेमा झाला की गेट वे ऑफ इंडियाच्या ताजच्या समोरच्या फूटपाथवरील कट्टयाच्या कडेकडेने फेरफटका मारणे, कट्टयावर बसून रात्रीच्या शांत वेळेत येणारा समुद्राच्या पाण्याच्या डुचमळण्याचा डुबुक डुबुक असा आवज ऐकत आणि बांधलेल्या बोटी हलताना पहात बसायचं, दूरवरच्या जहाजांवरच्या लुकलुकत्या दिव्यांकडे पहात बसायचं, तिथे काय चालत असेल, कसं वातावरण असेल याचे मनातल्या मनात तर्क करायचे, किंवा बॅलार्ड पीयरच्या सूनसान गल्ल्यांमधून एक चक्कर मारुन परत घरी यायचं हा आमचा कार्यक्रम असे.
            तर सांगायचं म्हणजे त्या रिगलमधे शिरल्यावर तिथल्या गारेगार वातावरणात अगदी आपण खूप श्रीमंत झाल्याचा एक फील यायचा आणि चेहऱ्यावर आपोआप बेफिकिरी झळकायची. आजूबाजूला उच्चभ्रू घरातली माणसं किंवा तरुण मुलं मुली वावरत असत. शानेल 5 किंवा ब्रूट, चार्लीचा  घमघमाट सिगारेटच्या धुरात मिसळून एक वेगळाच चार्म वातावरणात भरत असे. आत शिरलं की पॉपकॉर्न, मटन पॅटीस, समोसा वगैरेच्या खमंग वासाची त्यात भर पडे. पायऱ्या चढताना शेजारीच आधाराला असलेल्या पितळी बारचा थंडगार स्पर्श,पायाखाली पावलं रुततील असा मऊ, गुबगुबीत लाल रंगाचा गालीचा, भोवतालचं पाईन वुड फिनीशचं वुडन पॅनेलींग, मिरर वर्क, मंद दिव्यांची दुधट पिवळ्या रंगाची प्रकाश योजना या साऱ्या गोष्टींनी त्यात भर पडत असे. रिगलची पहिली संगमरवरी पायरी चढतानाच मधूनच थंड हवेचा झोत अंगावर यायला सुरुवात होते. बेसमेंटमधल्या पार्किंग एरिया मधून लीफ्टने थिएटरच्या ईमारती मधे येण्याची सोय असलेलं हे मुंबईतील पहिलं थिएटर, तसंच १९३० मधलं आर्ट डेको शैलीचंही मुंबईतील पहिलं थिएटर ज्याचं डिझाईनींग १९ व्या शतकातील प्रसिद्ध आर्किटेक्ट ई. डब्लू. स्टिव्हन्सन च्या मुलाने म्हणजे चार्ल्स स्टिव्हन्सनने केलं. रिगलचे पारसी मालक फ्रामजी सिध्वा हे अत्यंत रसिक आणि चोखंदळ होते. थिएटरचं इंटिरिअर आणि मिरर वर्क त्यांनी झेकोस्लोवाकीयाचा आर्टिस्ट कार्ल सचरा ( सशरा ) याच्या कडून करुन घेतलं आणि रिगलचा दर्जा एका अत्त्युच्च पातळीवर नेऊन ठेवला.
पुढे मेट्रो, सेंट्रल प्लाझा, न्यू एम्पायर, ब्रॉडवे, एरॉस ही सारी थिएटर्स १९३३ च्या सुमारास झाली पण रिगल ते रिगलच त्याची सर ईतर थिएटर्सना नाही असं माझं मत आहे. ईथे प्रदर्शित झालेला पहिला सिनेमा हा लॉरेल अँड हार्डीचा डेव्हील्स ब्रदर या नावाचा होता.
खरं तर मुंबईत थिएटर्स साधारणपणे १९ व्या शतकाच्या अखेरीस सुरु झाली. ब्रिटिशांच्या काळात व्हिटी स्टेशन समोर टिव्होली नांवाने १८७९ साली व्हिक्टोरियन शैलीतला एक हॉल सुरु झाला जिथे सुरुवातीला परफॉर्मिंग आर्ट चे शोज होत असत. कालांतराने सुमारे १९२८ साली त्याचे नांव बदलून ते कॅपिटॉल झाले आणि तिथे सिनेमा शोज व्हायला लागले. दरम्यानच्या काळात १९०५ मधे लॅमिंग्टन रोडला गिरगावात ईम्पिरियल थिएटर सुरु झालं. १९११ साली रॉयल टॉकीज सुरु झालं जिथे फक्त डॉक्युमेंटरीज दाखवत असत आणि नंतर १९३० च्या सुमारास सिनेमा दाखवण्यास सुरुवात झाली. १९१४ साली धोबीतलाव जवळ एडवर्ड सिनेमा सुरु झालं . विशेष म्हणजे गरीबांनाही सिनेमा पहाता यावा म्हणून एका पारसी फॅमिलीने न्यू रोशन नावाने एक थिएटर सुरु केलं ज्या थिएटरचे आता आता पर्यंत तिकिटाचे दर केवळ १० ते ३० रुपया पर्यंतच होते.
आपल्या शहराच्या वैभवात भर घालणारी आणि प्रेक्षकांना काही काळ का होईना चंदेरी, चमचमणाऱ्या एका वेगळ्याच दुनियेची सफर घडवून त्यांचं मन रिझवून त्यांच्या विवंचना विसरायला लावण्याचं पुण्यकर्म करणारी ही वैभव शाली, वास्तुशास्त्राचे आणि कलात्मकतेची उत्तम दर्जाची वास्तु शिल्पे केवळ अर्थशास्त्राचे गणित जुळत नाही म्हणून काळाच्या पडद्याआड निसटून जाताना पाहून मन उदास होतं. परंतु विरविरलेल्या भरजरी वस्त्र लेवून उभ्या राहिलेल्या, रया गेलेल्या विपन्नावस्थेतल्या या एके काळच्या  वैभवशाली सांस्कृतिक ठेव्याला अशा दयनीय अवस्थेत रस्त्याच्या कडेला उभं असलेलं बघण्यापेक्षा त्याना स्मृती पटलावर पूर्वीच्या वैभवात बघायला कोणालाही केव्हाही आवडेल. आता ते प्रिमियर शोज त्या लांबसडक चकाकणाऱ्या गाड्या, त्या झगमगणारे पोशाख करुन लाल गालीच्या वर उतरणाऱ्या नाजूक पावलांच्या तारका, रुबाबदार सिनेनट, झगमगणारी रोषणाई, लोकांची नट-नट्यांना बघायला होणारी गर्दी, त्यांना पाहून उमटणारे चित्कार काही काही त्या वास्तुंच्या नशीबी येणार नसतं. आता नशीबी आलेलं उपेक्षिताचं जीवन जगत विकासाचा हातोडा कधी पडतोय याची वाट बघत तग धरुन रहायचं एवढंच काय ते हाती उरलेलं असतं
                आमच्या सांस्कृतिक जीवनाला समृद्ध करण्यात आपला वाटा उचलणाऱ्या या वास्तुपुरुषांना मानाचा मुजरा.
©पुष्कराज चव्हाण
०९-०७-२०१९

Comments

Popular posts from this blog

देव आनंद

भक्ती