बाबु सायकलवाला

बाबु सायकलवाला

काही व्यक्तींचे तुमच्या आयुष्यात येण्याचे योग असतात आणि अशी माणसं तुमच्या आठवणीत कायमची रहातात. त्यापैकीच एक आमचा बाबू सायकल वाला. बाबु ही एक व्यक्ती नव्हे तर एक वृत्ती होती.
“बाबु सायकलवाला” हे नांव माहीत नाही अशी व्यक्ती दादर – शिवाजीपार्क भागात शोधून सापडणार नाही असा एक काळ होता. हे नांव ईतकं लोकप्रिय होतं कि नंतर गुगलवर सुद्धा ते पोहोचलं आणि फेसबुकवर सुद्धा या नावाने कम्युनिटी सुरु झाली.
लहानमुलांच्या गळ्यातला ताईत असलेला हा ईसम मोठ्यांमधेही तितकाच लोकप्रिय होता. श्यामलवर्णीय, मितभाषी, लाजाळू, भिडस्त ही आणि अशी अनेक विशेषणं अंगी असलेला बाबू सावळा असला तरी देखणा होता. लोकांना आपलंसं करणं त्याच्या स्वभावात होतं. दिलदार, मनमिळाऊ स्वभावाचा हा सद्गृहस्थ आपल्या लाजाळू आणि भिडस्त स्वभावामुळे हल्लीच्या काळात अपेक्षित अशी लौकिकार्थाने “प्रगती” करु शकला नाही. कारण, बाबुची धंदेवाईक नसण्याची वृत्ती.

आमच्या गल्लीच्या कोपऱ्यावर मेहेर प्रिमायसेस नांवाच्या बिल्डिंग मधे असलेलं “ बाबुसायकल मार्ट “ नांवाने ओळखलं जाणारं हे दुकान पूर्वी माधवराव भिसे नांवाच्या मालकाचं होतं. दुकानाचं नांव तेव्हा “ माधव सायकल मार्ट “ असं होतं. कोकणातून मुंबईत आलेला बाबूचा नोकरीचा शोध या दुकानापाशी येऊन थांबला. १३ – १४ वर्षाचा बाबू “ माधव सायकल मार्ट “ या भाड्याने सायकली देणाऱ्या दुकानात माधवराव भिसे यांच्या कडे नोकरीला राहीला व ईमाने ईतबारे पडेल ते काम मन लावून करु लागला.
 तो काळ वाहनांच्या भाऊगर्दीचा नव्हता. अगदी एका हाताच्या बोटावर मोजता येतील ईतक्याच मोटार गाड्या गल्लीत कोणा कोणाच्या मालकीच्या असत. सायकल घेणंही लोकांना त्या काळी मोठी गोष्ट वाटण्याचे ते दिवस होते. लोकं बहुदा पायी, सायकलने,  ट्राम, किंवा लोकल ट्रेन ने प्रवास करत असत. त्यात सायकलही भाड्याचीच असे. तर लोकांची ही गरज ओळखून भाड्याने सायकल मिळण्याची दुकानं त्याकाळात बऱ्यापैकी संख्येनं असत आणि त्यांचा धंदाही चांगला होई.अशा या काळात माधवराव आणि बाबू या दोघांनी मिळून अपार कष्ट करुन आपल्या व्यवसायाचा जम बसवला. पुढे कालांतराने माधवरावांना प्रकृतीच्या तक्रारी सुरु झाल्या आणि त्यांचे दुकानात येणे हळू हळू कमी होऊ लागले. बाबू आता एकटा दुकान सांभाळू लागला. आलेल्या गिर्हाईकाचे नांव रजिस्टर मधे लिहीणे,  त्याला सायकल दुकाना बाहेर काढून देताना वेळेची नोंद करणे, बाहेरुन आलेल्या सायकलची आल्याची वेळ नोंदवून हिशेब करुन भाड्याचे पैसे घेणे, सायकल दुकानात चढवून ठेवणे, ईतर सायकलींची दुरुस्ती करणं, पंक्चर काढणं ईत्यादी सर्व अवधानं दिवसभर एकहाती सांभाळून संध्याकाळी शेवटची सायकल आल्यावर सर्व सायकली दुकानात व्यवस्थित रचून ठेवल्यावर दुकान बंद करुन सर्व पैसे, हिशेब आणि दिवसभराचे रजिस्टर घेऊन बाबू माधवरावांच्या घरी ते घेऊन जात असे व तिथे ते सर्व दुकानाच्या चाव्यांसह देऊन मग आपल्या घरी जात असे. हा दिनक्रम पुढे वर्षानुवर्ष असाच चालू होता. एके दिवशी बाबूचा प्रामाणिकपणा व सचोटीचा व्यवहार पाहून माधवरावांनी काही मोबदला घेऊन दुकान बाबूच्या नांवाने करुन टाकलं. या कामात शेजारच्या ईराणी हॉटेलचा सध्याचा मालक जावेदच्या वडिलांनी मध्यस्थाची भूमिका बजावली शिवाय थोडीफार आर्थिक मदतही केली. दोन मराठी, हिंदूंच्या व्यवहारात एक ईराणी माणसाने मध्यस्ती करण्याचे आणि त्याचा शब्दाला एका हिंदू घरमालकाने मान देण्याचे परस्पर विश्वासाचे आणि जिव्हाळ्याचे संबंध मानण्याचे ते दिवस होते. “विश्वास पानिपतात गेला” असं ऐकवण्याचे दिवस नव्हते ते. असो, तर अशा प्रकारे बाबू दुकानाचा मालक झाला आणि आमच्या लेखी बाबू चा बाबूराव झाला.
वर सांगितल्या प्रमाणे बाबूच्या अंगात माणसं जोडण्याची कला जन्मतःच होती. त्याने अनेक पंथाची माणसं जोडली.त्यात राजकारणी मंडळी, उद्योगपती, खेळाडू असे अनेक लोक होते. त्याच्या या दुकानात एक पत्र्याची फोल्डिंगची खुर्ची असे त्या खुर्चीत बाबू व्यतिरिक्त कोणीही अगदी हक्काने मालक असल्याच्या थाटात बसे आणि बाबू मात्र मालक असून त्याच्या पायाशी बसून काळे झालेले कपडे घालून सायकल दुरुस्तीचे काम मान खाली घालून करत बसलेला असे. अर्थात खुर्चीत बहलेल्या माणसाला पैसे देणे घेणे, रजिस्टर लिहीणे ही जुजबी कामं करावी लागत व सदर व्यक्ती ती कामं आपलं समजून करत असे. त्या काळात त्याच्या दुकानातल्या खु्र्चीत बसलेल्यांमधे नावं घ्यायची झाली तर अनेक आहेत पण वानगी दाखल सांगायची म्हंटलं तर प्रिं. मनोहर जोशी, शरद पवार, सुशीलकुमार शिंदे, बाळू, सुभाष,दिलीप गुप्ते हे  तिघंही क्रिकेटपटू बंधू,  संदिप पाटील, एम्. एस् पाटील हे क्रिकेट पटू मुलगा आणि वडील अशी सर्वं प्रकारची मंडळी बाबू कडे येत असत. बाबू सर्वांशीच प्रेमाने, आपुलकीने आणि आदराने वागत असे पण बाबूची राजकीय निष्ठा “शिवसेनेशी” होती.
असा हा बाबू लहान मुलांच्या गळ्यातला ताईत होता. सुट्टी लागली रे लागली कि मुलं पहाटे सकाळी सहा वाजताच त्याच्या दुकाना पुढे येऊन ऊभी रहात. बाबू येऊन दुकान ऊघडे पर्यंत या मुलांच्या सहन शक्तीचा कडेलोट झालेला असे.  दुकानाच्या शटर जवळ ईतकी झुंबड ऊडे कि बाबूला शटर पर्यंत सुद्धा पोचता येत नसे. शटर ऊघडलं रे ऊघडलं कि बाबू बाहेर आणि पोरांचा लोंढा दुकानात. ज्याला त्याला आपली आवडती सायकल हवी असायची. काहींनी तर सुटी पडायच्या आधीच कोणती सायकल घ्यायची हे हेरून ठेवलेलं असे. अशा प्रकारे सगळं दुकान रिकामं झालं कि बाबू सकाळची झाड लोट करायला सुरुवात करे. या सगळ्या सायकली रजिस्टर मधे नोंद न होताच बाहेर निघून जात असत आणि बाबूला ही त्याची चिंता नसे. ज्यांना सायकल मिळाली नाही ती मुलं हिरमुसली होऊन दुकाना समोर ऊभी रहात मग बाबू त्या मुलांची समजूत काढायच्या कामाला लागे. मूल आई किंवा वडिलांबरोबर असेल तर आई वडिल समजूत नाही काढणार ईतक्या प्रेमाने तो त्या मुलांची समजूत काढत असे. हे असं दृश्य अखिल पृथ्वीवर तुम्हाला कुठेही दिसणार नाही हे मी तुम्हाला छातीठोक पणे सांगू शकतो. मी पाहीलेल्या भाड्याने सायकल देण्याच्या दुकानांपैकी हे एकमेव दुकान असं होतं कि जिथे सायकल नेण्या करीता ओळखीची गरज लागत नसे. कालांतराने अगदीच सावधगीरी बाळगायची गरज भासल्यास परीसरातल्या एखाद्या व्यक्तीचं नांव सांगितल्यावर बाबू सायकल देत असे. ईतर जवळ पासच्या दुकानांची रीत वेगळी होती. बाबूच्या दुकाना समोर सायकल साठी थांबलेली मुलं अर्धा तास एक तास सहज वाट बघत ऊभी रहात आणि मग हवी असलेली सायकल येताना दिसली कि त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघण्या सारखा असे. अशी मुलं थोडंसं अंतर धावत पुढे जाऊन त्या सायकलला हात धरुनच दुकाना पर्यंत येत असत. या सर्व प्रकारात सायकल पंक्चर झाली असेल किंवा मोडली असेल तर त्या घाबरलेल्या मुलांना बाबूच धीर देई व त्यांच्या कडून नुकसान भरपाई ही घेत नसे. अगदीच वांड किंवा मस्तीखोर मुलं असली तर केवळ त्यांना शिक्षा म्हणून जुजबी नुकसान भरपाई घेत असे. म्हणून तर बाबू सगळ्यांचा लाडका होता. त्या काळात मुलांना सायकल विकत घेऊन देण्या ईतपत लाड होत नसत.
या बाबूचं दुसरं एक वैशिष्ट्य म्हणजे गल्लीत शिरणाऱ्या प्रत्येक व्यक्तीवर याची नजर असे. काही वेळा तर तो ती व्यक्ती कोणत्या ईमारतीत शिरते आहे ते ही पहात असे. प्रसंगी कुठे जायचंय? कुणा कडे जायचंय हे ही विचारुन घेत असे. गल्लीतल्या लोकांनाही बाबू तितकाच प्रिय होता, आपल्यातलाच एक वाटायचा. घरात मुलं एकटी असतील तर ते बाबूला लक्ष ठेवायला सांगून जात. बाबू खाली मान घालून काम करीत असला तरी त्याची येणाऱ्या जाणाऱ्यावर बारीक नजर असे. परीसरातले काही जण तर सरळ बाबूला सांगत बाबू जरा जाऊन येतो हं आणि सायकल घेऊन आरामात बाजारहाट करुन अर्धा एक तासानेही येत आणि सरळ सायकल दुकानात ठेऊन चालू लागत बाबूही त्यांच्या कडे पैसे मागत नसे. तो पैसे मागू शकत नव्हता असं नाही मनात आणलं असतं तर अशा लोकांना खडसावून त्यांच्या कडून पैसे घेण्या ईतपत त्याची शारीरीक क्षमता होती पण त्याचे नियम काही वेगळेच होते. मला वाटतं तो स्वतःच्या खुशी करता हा धंदा करत होता. ऊदर भरण हे काही एकमेव उद्दिष्ट त्याच्या डोळ्या समोर नव्हतं. त्यलाही कुटुंबं होतं, बायको मुलं होती, घर होतं खर्च होता, हौस – मौज होती पण तो धंदेवाईक नव्हता. त्याच्या कडे पाहून असं वाटायचं कि तो लहान मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद फूलताना बघण्यातच समाधान मानायचा तीच त्याची कमाई होती तीच हसणारी, आनंदी मुलं डोळ्यात साठवून तो समाधानाने घरी जात असावा आणि थकल्या भागल्या शरीराने त्याला शांत झोप लागत असावी. बाबु हा व्यक्ती नसून ती एक वृत्ती होती.
 बाबू आमच्या गल्लीतल्या लोकांसमोर लहानाचा मोठा झाला होता. गल्लीतल्या वडीलधारी मंडळींना त्याचं फार कौतुक होतं त्याच्या लग्नाला गल्लीतली सर्व माणसं गेली होती. त्याच्या घरातल्या कार्यक्रमाचं गल्लीत निमंत्रण असे. लोकंही आवर्जून जात असत. लोकांना आलेलं पाहून तो ही खूश होत असे. त्याला ही गल्लीतले लोक आपल्या घरच्या कार्यक्रमांना बोलावत असत. कार्यक्रमाला जातानाचा बाबूचा थाट बघण्या सारखा असे. पांढरी स्वच्छ पँट त्यावर फिकट निळ्या रंगाचा नक्षीदार बुशकोट, गुळगुळीत दाढी केलेली असे, केसांना पोमेड किवा व्हँसलीन लाऊन कोंबडा काढलेला असे, मनगटावर खास समारंभात घालण्यासाठी ठेवलेलं सोनेरी घड्याळ आणि पायात पॉलिश केलेले चकचकीत काळे पंप शू असत. खरंच या वेशात रंगाने सावळा असलेला बाबू एकदम रुबाबदार दिसत असे.
या बाबू वर आमचं तरुण मुलांचही खुप प्रेम होतं. आमचं मन त्याच्या पुढे मोकळं करायला आम्हाला काहीच वाटत नसे. माझ्याच बाबतीत घडलेला एक प्रसंग सांगतो. माझे वडील एकदा हॉस्पिटलमध्ये आय. सी. यू. मधे होते. आई सातारा येथे माझ्या वडीलांची आई वारली होती म्हणून दिवस कार्य होई पर्यंत थांबणार होती. घरात फक्त मी आणि दोघीच बहीणी मी तिघांत लहान तरी मुलगा म्हणून जबाबदारी माझ्यावर होती. माझं वय चौदा पंधरा वर्षाचं असेल. वडिलांचे मित्र आणि ईतर आजूबाजूची मंडळी मदतीला होती पण कुटुंबातील वडील माणसं जवळ नव्हती त्या मुळे मनावर भयंकर दडपण आलं होतं. मला आठवतं एक दिवस मी हॉस्पिटल मधून घरी येत असताना मला गल्लीच्या कोपऱ्यावर बाबू भेटला त्याने मला दुकानात बोलावून माझ्या पाठीवर हात ठेऊन ईतक्या प्रेमाने  बाबा कसे आहेत म्हणून विचारलं कि माझ्या मनाचा बांध त्याक्षणीच फुटला आणि मी अक्षरशः ढसाढसा त्याच्या जवळ रडलो त्यानेही मला यथेच्छ रडू दिलं. मला जवळ घेऊन धीर दिला. माझंही ही मन हलकं झालं. असे आमचे त्याच्या बरोबर संबंध होते.
बाबुच्या समोर आम्ही लहानाचे मोठे होत होतो. काळ मजेत पुढे सरकत होता. आणि अचानक एके दिवशी हृदय विकाराच्या झटक्याने बाबू निवर्तल्याची बातमी सोसाट्याच्या वाऱ्यागत आमच्या गल्लीत शिरली. सर्वच जण दुःखाने हळहळले. परिसरात दुःखाची सावली पसरली. रात्री ऊशीरा शवयात्रा गल्लीच्या कोपऱ्यावर आली. काही वेळ तो अचेतन देह कोपऱ्यावर थांबवला होता. सर्व गल्ली दर्शनासाठी लोटली होती. लोकांच्या डोळ्यात अश्रु होते.  हे शेवटचं दर्शन होतं. आता बाबू पुन्हा दिसणार नव्हता. आता कोपऱ्यावर थांबून बोलायला तो भेटणार नव्हता. हिरमुसलेल्या मुलांची आता तो समजूत काढणार नव्हता. लोकं त्याच्यावर विसंबून मुलांना घरात ठेऊन बाहेर जाणार नव्हती. घराच्या चाव्या तो ठेऊन घेणार नव्हता. गल्लीत येणाऱ्या जाणाऱ्यांवर आता तो लक्ष ठेवणार नव्हता. करण आमचा बाबू आम्हाला, या जगाला, त्याच्या सायकल घ्यायला येणाऱ्या लाडक्या लहान मुलांना सोडून कायमचा परत कधीही परत न येण्याच्या दूरच्या प्रवासाला निघून गेला होता. तो खरंच एक अवलीया होता. आम्हा सर्वांच्या स्मरणात तो सदैव राहील.

पुष्कराज चव्हाण
०२/०४/२०१६.

Comments

Popular posts from this blog

देव आनंद

भक्ती