कहाणी आमच्या ईराणीची
भारतीय संस्कृतीची जडण घडण होण्यात भारतीय लोकांबरोबरच ईतर देशातल्या लोकांचा देखील महत्वाचा वाटा आहे हे सर्वमान्य असावे असे मला वाटते. यात ब्रिटिश, मोघल, डच, पोर्तुगीज, यांच्यासह अगदी आपणा सर्वांना परीचित असलेल्या ईराणी नागरीकांचा समावेशही आहे. यात आपण ज्यांना सरसकट ईराणी म्हणून संबोधतो असे झरत्रुष्टाची आणि अग्नी ची पूजा करणारे पारशी आणि अल्लाला मानणारे आणि कुराण पठण करणारे मुसलमान नागरीकही आले. या ईराणच्या स्थलांतरीतांनी हिंदुस्थानात येऊन हिंदुस्थानी संस्कृतीत स्वतःला सामावून घेताना ते स्थानिकांच्या जीवनात दूधात साखर मिसळून जावी तसे एकरुप झाले. सांस्कृतिक देवाण घेवाणीत मग खाद्य संस्कृती ही आली आणि उद्योग व्यापार उदीम याचाही भाग आला. पारसी- ईराणी लोकांनी हिंदुस्थानाभर विविध क्षेत्रात आपल्या वैशिष्ट्याचा एक अमीट ठसा उमटवला आहे. अगदी टाटा, गोदरेज यांच्यापासून ते बोमन ईराणी, अरुणा ईराणी ते अर्षद वारसी पर्यंत. ऊद्योग, व्यापार, वास्तु रचना, विज्ञान, वैद्यकीय, कला, क्रिडा, राजकारण, दानधर्म, हॉटेल एकही क्षेत्र असं नाही कि ज्यात यांनी आपलं स्थान निर्माण केलं नाही. ही भली माणसं ईराण मधून हिंदुस्थानात यायला लागली ती माझ्या माहीती प्रमाणे १५ व्या किंवा १६ व्या शतकाच्या सुमारास.. त्या काळी उपलब्ध वाहतुक साधनांनी सुमारे अडीच हजार कि.मी. अंतराचा प्रवास करुन भारताच्या पश्चिमे कडील समुद्र किनार पट्टीच्या प्रदेशातून ते त्याकाळच्या हिंदुस्थानात प्रवेश करते झाले आणि गुजरात आणि महाराष्ट्रात त्यांनी आपलं बस्तान बसवायला सुरुवात केली.
आपणा सर्वांचे सुपरिचित, लाडके नाक्या नाक्यावर असणारे ईराणी हॉटेलवाले हे त्यातलेच. खरं तर या विषयावर अनेकांनी अनेकदा बरंच कांही लिहून झालंय त्यामुळे मी निराळं आणखी काय लिहीणार? असाही एक प्रश्न माझ्या मनात आला होता. पण मग मी म्हंटलं आपण आपल्या नाक्या वरच्या ईराणीची कहाणी लिहूया. आणि लिहीता झालो.
मी रहातो त्या शिवाजीपार्क भागात एके काळी अक्षरशः डझनभर ईराणी हॉटेल्स होती. आज मितीस केवळ एक ईराणी हॉटेल या भागात शिल्लक आहे आणि ते म्हणजे “ लाईट ऑफ भारत रेस्टॉरंट “. बाकी सर्व मोक्याच्या जागांमधे ईतर व्यवसाय सुरु झाले आणि गमंत म्हणजे बारा पैकी फक्त दोन जागांमधे आज रेस्टॉरंट सुरु झाली आहेत. ती ही ईराणी रेस्टॉरंट्स नसून “ईतर” या वर्गात मोडणारी आहेत. ईराणी आणि पारसी लोकांनी उडप्यांसारखा धंदा नाही केला कदाचित त्यांनी “ ........ जाणीजे यज्ञ कर्म” हे कुठेतरी ऐकलं असावं आणि आपण काहीतरी पवित्र कर्म करण्या साठी या क्षेत्रात आलो असून आपणास आपले काम श्रद्धेने आणि मन लावून करावयाचे आहे अशी खूणगाठ मनाशी पक्की केली असावी कारण त्यांचं वागणं तसंच होतं. त्यांच्या हॉटेलमध्ये तुम्हाला एक कप चहाची ऑर्डर देऊन पंख्या खाली बसून कितीही वेळ बसता येत असे पण तुमच्या डोक्यावरचा पंखा बंद होणार नाही किंवा कोणी तुम्हाला “ साब, और क्या चाहीए” असा प्रश्न विचारुन तुम्हाला अप्रत्यक्ष पणे सुचवणार नाही कि आता उठा आमची जागा खाली करा धंद्यावर परिणाम होतोय आमच्या. आता तर हे उडुपी लोक स्पष्ट सांगतात “ साब दुसरा गिर्हाक वेटींग मे है जरा जल्दी करो”. ईराण्याकडे असला मनाचा कद्रु पणा नव्हता, किंवा नाही. ते ही पोटा पाण्या साठी काम करत होते ते कधीच लोभी, लालची वाटले नाहीत. उलटपक्षी त्यांचं वागणं हे दिलदारपणाचं आणि आतिथ्यशील होतं.
तर एके दिवशी ईतर ईराणी स्थलांतरीतां प्रमाणेच गुलाम हुसैन साकी नावाचा एक मुलगा १३ व्या वर्षी आपल्या मामुजानचं म्हणजे मोहम्मद सादिकचं बोट धरुन शिडाच्या जहाजातून ईराणच्या “ यझ्द “ (“ Yezd “) प्रांतातून १९३० च्या सुमारास मुंबई बंदरात दाखल झाला. मुलाचं वय हे काम करण्याचं नव्हतं तेव्हा मामुजान ने छोट्या गुलामला जेव्हा म्हंटलं कि आता आपल्याला कामकाज सुरु करायला हवं, काय? करशील ना काम? छोट्या गुलामला शिक्षणाची आवड होती त्यामुळे तो आपला भाबडे पणाने म्हणाला “ नाही मामुजान मी शिकणार, मला शिकायचंय.” झालं मामुजान मोहम्मद सादिकची तळपायाची आग मस्तकाला भिडली आणि लगेच त्याचा हात छोट्या गुलामच्या कानशीलाला जाऊन भिडला आणि तिथे जाळ निघाला. “ काही शिकायचं वगैरे नाही, निमूटपणे कामाला लाग.” असं मामू गरजला. बिचारा गुलाम हुसैन, लहानच, तो मामा पुढे काय बोलणार? शिवाय अनोळखी प्रदेश, या ठिकाणी मामाचाच आधार, त्यामुळे ऐकणं भाग होतं. छोटा गुलाम नोकरीला लागला आणि पडेल ते काम करु लागला. गुलामचं बस्तान बसवून मामा हैदराबादेस रवाना झाला तिथून पुढे रंगूनला गेला आणि तिथेच स्थायिक झाला. ईथे गुलाम हुसैन कधी हॉटेलात फडका मारुन तर कधी बाहर वाला चं काम म्हणजे हॉटेल बाहेरच्या ऑर्डरींचं खाद्य, पेय पुरवणाराचं काम करु लागला. वेळी प्रसंगी मालक जे सांगेल ते काम करीत राहीला आणि पैसा गाठीशी जोडत राहीला. दिवसा मागून दिवस जात होते गुलाम हुसैन मोठा होत होता, प्रगती करत होता. मोठा होता होता गुलामचा गुलाम भाई झाला. लोक त्याला त्याच्या प्रामाणिकपणावर आणि सचोटीच्या व्यवहारावर खुष होऊन आदराने गुलामभाई म्हणून संबोधू लागले. गुलामभाईंनी आतापावेतो हॉटेल आणि दुकान व्यवहारातले सर्व बारकावे जाणून घेतले होते. एव्हाना निकाह ही झाला होता. सुस्वरुप बेगम “अख्तर सुलताना” आता गुलामभाईंच्या आयुष्यात आली होती यथावकाश अल्ला ताला च्या मेहेर नजरने एक चाँदसी बेटी पैदा झाली आणि १९४९ साली लालबुंद गोरागोमटा सुदृढ जावेद जन्माला आला. गुलामभाईंचा संसार हळू हळू आकार घेऊ लागला. आता गुलाम भाईंना तिघांच्या पालन पोषणाची जबाबदारी पार पाडायची होती आणि गल्ला सांभाळण्याच्या नोकरीच्या पगारात हे थोडं जिकिरीचं होऊ लागलं होतं. आता गुलामभाईंच्या डोक्यात स्वतःचं हॉटेल का काढू नये असे विचार घोळायला लागले. वयाच्या १३ व्या वर्षापासून पडेल ते काम केल्याने गाठीशी बक्कळ अनुभव होता. अल्लातालाची मेहेरनजर तर होतीच मग काय हरकत आहे बिस्मिल्ला करायला? असं म्हणून अल्लाचं नांव घेऊन गुलामभाई जागेच्या शोधात निघाले. संपूर्ण मुंबई भर शोध घेऊन गुलामभाई दादर, शिवाजी पार्क येथील मोडक ईंजिनीयरांच्या उद्यम बंगल्या समोरच्या रानडे रोड वरच्या कोपऱ्यावर येऊन थांबले. दोन्ही हात कमरेवर ठेऊन गुलाम भाईंनी आजूबाजूस पाहीले. त्या चौकाला एकूण पांच रस्ते येऊन मिळत होते. मध्यभागी एक गोलाकार ऊद्यान होतं. जागा मोक्याची होती. वर्दळ बऱ्यापैकी होती. चौपाटी आणि शिवाजीपार्कला फिरायला येणाऱ्यांचीही संख्या चांगली होती. मध्यम वर्गीय पांढरपेशा बुद्धीजीवी लोकांची वस्ती होती त्यामुळे धंदा करण्यास सुरक्षित आणि योग्य जागा होती. गुलामभाईंनी ठरवलं कि या जागी आपण आपलं हॉटेल सुरु करायचं. गुलामभाई मनात मनसुबे रचत आपल्या रहाण्याच्या ठिकाणी आले. आपलं स्वप्न साकार होण्याच्या मार्गावर आहे, प्रत्यक्षात उतरण्याच्या बेतात आहे हे जाणवल्यावर माणसाची जशी अवस्था होते तीच अवस्था त्या रात्री गुलामभाईंची होती. रात्र कशीबशी सकाळ होण्याची वाट पहाण्यात घालवली आणि सकाळ होताच आंघोळ, चहा – नाश्ता ऊरकून पायात चपला सरकवल्या आणि तडक मोडकांच्या बंगल्यासमोरील ईमारतीत म्हणजे “मेहेर प्रिमायसेस” मधे येऊन दाखल झाले. त्या काळात जागा लवकर भरत नसत आणि व्यवहार विश्वासाने आणि प्रेमाने होत असत. गुलामभाईंनी घर मालकाला भेटून व्यवहार पक्का केला. वर्ष होतं १९५८. एव्हाना छोटा जावेद आठ वर्षाचा झाला होता. दरम्यानच्या काळात मामूजान ना जन्नत किंवा जहन्नुम नसीब झालेली होती. मोहम्मद सादिकचा रंगून मधे इंतेकाल झाला होता. गुलाम भाईंना हे कळवण्यात आलं होतं, पण मामुजान ने शिकू न दिल्याचा राग गुलामभाईंच्या मनात ईतका होता कि त्यांनी जनाजा ला येणार नाही म्हणून कळवलं. आणि दफनविधी लोकांनीच उरकला.
ईकडे काळाची चक्र ऋतु चक्रा च्या हातात हात घालून फिरत होती. गुलामभाई आता “ लाईट ऑफ भारत, रेस्टॉरंट अँड जनरल स्टोअर्स “ चे मालक झाले होते. गुलामभाईंना आता लोकं आदराने आणि प्रेमाने गुलामसेठ म्हणू लागले. गुलाम हुसैन साकी हे त्यांचं पूर्ण नांव होतं आणि समाजात त्या नांवाला आता थोडंफार वजन प्राप्त झालं होतं.
गुलामसेठनी एक कल्पकता दाखवलेली होती ती म्हणजे हॉटेल, जनरल स्टोअर्स आणि त्याकाळी जनरल मेडीसिन या प्रकारात मोडणारी औषधं विकण्याचं एक लायसन्स मिळत असे अशी तीनही लायसन्स मिळवली आणि आपला व्यवसाय सुरु केला. त्यांच्या या हॉटेल वजा दुकानात शिवणाच्या सुई पासून स्टेशनरी, बल्ब, डोकेदुखी-अंगदुखीची औषधं, गोळ्या, चॉकलेटं, पाव, अंडी, टूथब्रश, पेस्ट, दंतमंजन वगैरे सर्व कांही मिळत असे. षट्कोनी संगमरवरी टेबलं आणि वेताच्या गोल काळ्या खुर्च्या, गल्लयाचा काऊंटर म्हणजे तीन फूट उंचीचं आणि दहा बारा फूट लांबीचं शोकेस चं कपाट. त्यावर गोल, चौकोनी सरळ ऊभ्या रहाणाऱ्या आणि तिरप्या ऊभ्या रहाणाऱ्या बरण्या. कपाटाच्या एका भागात पांव, ब्रेड वगैरेंसाठी जागा. ईतर भागात सिगारेट, विडी तत्सम सामान ठेवायला जागा. हॉटेलला एकूण तीन मोठ मोठी शटर्स, दोन शटर्सच्या मधल्या भिंतींना मोठ मोठी काचेची तांवदानं असलेली कपाटं. त्यात अगदी बिस्कीटां पासून डिटर्जंट साबणा पर्यंत सारं काही नीट लावून ठेवलेलं असे. शटर्सच्या अर्ध्या भागांत चार फूट उंचीच्या शो केसेस त्यात एका शोकेस मधे एका भागात वेफर्स आणि एका भागात पेस्ट्रीज असत एका शोकेस मधे सगळं स्टेशनरीचं सामान असा सगळा जामानीमा असे. आतील भागात भटारखाना. अशी या हॉटेलची अंतर्गत रचना होती. व्यक्तीमत्व खुप प्रेमळ होतं. त्यांच्या प्रेमळ, मृदुभाषी स्वभावा मुळे गिर्हाईकी जमायला वेळ लागला नाही. परिसरातल्या ग्राहकांनी गुलामभाईंना आपली पसंती चांगला प्रतिसाद देऊन दर्शवली होती. गुलामभाईंना पण खुप हुरुप आला होता. नियमित सकाळी साडेपांच वाजता ते हॉटेल ऊघडत असत. सगळ्या शोकेसेस स्वतः साफ करत असत. नोकरांना टेबलं – खुर्च्या लावण्यास आणि माल लावण्यास स्वतः मदत करीत असत. हॉटेल रात्री अकरा वाजेपर्यंत अव्याहत पणे चालू असे. आता गुलामभाईंनी दादर मधे रहाण्यासाठी एक घर भाड्याने घेतलं आणि १९६० साली आपलं कुटुंब हैदराबादेहून मुंबईला आणलं. जावेद तेव्हा दहा वर्षाचा होता. काळाची चक्र आपल्या गतीने फिरत होती. गुलामभाई आपल्या वाटचालीवर खुष होते. मनोमन परवरदीगारचा शुक्रिया अदा करत होते. जावेद ही मोठा होत होता.
जावेद आता वीस वर्षाचा झाला होता. दिसायला ऊमदा, भरदार शरीरयष्टीचा गोरापान जावेद एखाद्या सिनेनटा सारखा दिसे. कोणी त्याला फिरोज खान म्हणे तर कोणी आणि काही. परिसरातल्या मुलींना तो आवडू लागला. गुलामभाईंच्या चाणाक्ष नजरेने हे ओळखलं आणि त्याला आपल्याच नातेवाईकाच्या “कॅपिटल” नावाचं हॉटेल अगदी हाकेच्या अंतरावर होतं तिथे गल्ला सांभाळण्यास नोकरीला लावून दिलं. जावेद आता हाताशी आला होता तेव्हा आता त्याचाही निकाह लावून द्यायला पाहीजे असं अब्बाजान गुलाम हुसैन साकी यांच्या मनात यायला लागलं शिवाय आता आपणही थकतोय हे ही जाणवायला लागलं म्हणून त्यानी १९७८ – ७९ च्या सुमारास जावेदचा ‘ फातिमा सूघरा ‘ बरोबर निकाह लावून दिला. आणि स्वतः हज – उमरा करायला मोकळे झाले.
आता ‘ जावेद गुलामहुसैन साकी ‘ याच्या हातात कुटुंबाच्या धंद्याची सूत्र आली. जावेद ही आपल्या वडीलां सारखाच मिठ्ठास वाणी असलेला आणि सर्वांशी प्रेमाने वागणारा होता. आल्या गेल्या गिर्हाईकाला बॉस, सर अशी विशेषणं लावून मान द्यायचा. आया बहीणींना सिस्टर, भाभी म्हणून संबोधे. लहान मुलांचे लाड करत त्यांच्या हातात गोळ्या चॉकलेटं बळे बळे कोंबे. समवयस्क लोकांशी थट्टा मस्करी करे. लोकांना आता जावेद जवळचा वाटू लागला होता. अधून मधून गुलामसेठ सुद्धा गल्ल्यावर बसत. आम्ही तरुण मुलं जमण्याची ती एक हक्काची जागा झाली होती. कमीत कमी आत बाहेर मिळून तीस चाळीस जण असत. आम्हा पैकी कोणी ना कोणी तिथे दिवसभर सापडणारच. त्या काळात जीवन उगाचच व्यस्त नव्हतं, वेळ आणि वेळेला धाऊन येणारी माणसं दोन्ही स्वस्त होतं. गुलामसेठ आमच्या वडिलांच्या वयाचे होते. त्यांचं सगळ्यांच्या हालचालींवर लक्ष असे पण ते कोणाला जाणवत नसे. एकदा आमच्यातलाच एक जण हॉटेल बाहेर उभा राहून ईतरांबरोबर गप्पा मारतोय असं भासवून गल्लीतल्या एका मुलीच्या घरा कडे बरोब्बर अँगल लावून ऊभा रहायचा आणि तीला बघत रहायचा. गुलामभाईंनी हे ओळखलं आणि बाहेर येऊन त्याला हाताने हलवून म्हंटलं “ अरे बेटा राजन मै कबसे तुम्हे बुला रहा हूँ तुम्हारा ध्यान कहाँ है? अंदर आ जाओ होटल खाली पडा है, क्यू धूप मे बाहर खडे रहते हो? कोई समझेगा कि तुम लडकी पर लाईन मार रहे हो. चलो अंदर आ कर बैठो”. तो मुलगा बिचारा खजील होऊन आत येऊन बसला. असं हमेशा खेळीमेळीचं पण मर्यादशील वातावरण या हॉटेलात असे. या ठिकाणी मी कधीच रेडिओ किंवा ज्यूक बॉक्स च्या गाण्यांचा गोंगाट ऐकला नाही. तरीही गुलामभाईंकडे किंवा जावेदकडे हमेशा गर्दी असे. हर प्रकारची माणसं ईथे यायची अगदी टॅक्सी वाल्यां पासुन ते राजकारणी, खेळाडू आणि मोठ मोठे सरकारी बाबू लोक सुद्धा ईथे हजेरी लावत. प्रबोधनकार ठाकरे यायचे, श्रीकांतजी ठाकरे ही येत असत आणि जाताना आपल्या लाडक्या लेकी साठी तिच्या आवडीचा बन-मस्का आठवणीने घेऊन जात असत हे आज ही जावेदला आठवतंय. श्रीकांतजींची लेक आता येवढी मोठी झालीय कि तिचा मुलगा आता कॉलेजात जातो तरीही जावेद भाई तिला विचारतो “ जयू, तुम्हे याद है तुम्हारे पिताजी तुम्हारे लिये जब तुम छोटी थी तब बन-मस्का यहाँसे ले जाते थे?” “ क्या अब भी तुम्हे बन-मस्का अच्छा लगता है?” आणि मग ती लाजून हो म्हणते. मग जावेद पुढे विचारणार “ खाओगी?” खरं तर जयूची पन्नाशी उलटलेली असते आणि तिला हा अजून लहानच समजत असतो ती आणखीनच लाजते आणि “ नही नही अभी नही” असं म्हणत काढता पाय घेते. आम्हालाही त्याने अर्ध्या चड्डीत असताना पासून पाहीलेलं असल्याने आता आ्म्ही पंचावन्न वर्षांचे झालो आणि आमच्या मुलींची लग्न होऊन आम्हाला जावई आला तरी ह्याचं आमच्याशी वागणं काही बदलत नाही. मला घरी राजू म्हणतात तर हा मला विचारतो काजू खाया? तेही कोणाही समोर आणि माझ्या बरोबरच्या माणसांना सांगणार “ ईसको मैने छोटासा था तबसे देखा है, चड्डी मे घूमता था तबसे देख रहा हूँ ईसको. अब बडा हो गया है. “ आजही मी येता जाता कधी थांबलो कि अगदी प्रेमाने रास्पबेरी आणि लेमनेड मिक्स करुन स्वतः अर्धा पिणार आणि मला अर्धा पाजणार आणि पुर्वीच्या आठवणी काढणार , सगळ्या लोकांची आठवण काढून विचारपूस करणार. कोणी आता येत नाहीत म्हणून खंत व्यक्त करणार “ कम से कम तू तो आया कर यार” असं प्रेमाचं साकडं घालणार. असा हा जावेद भावनांचा आणि माणसांचा भुकेला. अजूनही हा माणूस धंद्याला असा लागलेला नाही. हा एकमेव असा हॉटेलवाला असेल जो ईतर हॉटेलातले पदार्थ आणून गल्ल्यावरच खात असतो. याला प्रकाश कडचं मसाला दूध, पियुष, बटाटा पुरी फार आवडते. “या हॉटेलचे मालक याच हॉटेलात जेवतात” वगैरे बावळट आणि भंपक पणाचे बोर्ड लावण्याचा प्रकार या ईसमाला ठाऊकच नसावा. आपण ईतर हॉटेलचे पदार्थ ऊघड ऊघड गल्ल्यावर बसून खाल्ले तर लोकं काय म्हणतील हे या महाभागाच्या गावीही नसतं. हा ईसम या परिसराच्या ईतका प्रेमात पडलाय कि काही विचारु नका. एकदा भाव विवश होऊन जावेद मला म्हणाला “ मै तुमको सच्ची बताता हूँ, मुझे बहोत कम चीजोंसे प्यार है. मेरे पिताजीसे, मेरे फॅमिली से, ईस होटल से और ये शिवाजीपार्क एरीयासे. मै तुमको कसमसे बोलता हूँ, मै मजहब से मुसलमान हूँ पर मुझे ऐसा लगता है कि अगर मेरे मरनेके बाद मुझे जलाना मुमकीन होता तो मै कहता कि मेरे शरीर कि राख को ईस शिवाजीपार्क मे फैला कर बिखेर देना ईतना मुझे ईससे प्यार है.” कोण कुठला हा जावेदभाई त्याचे वडील ईराण मधून ईथे येतात काय हा हैदराबाद मधे जन्माला येतो काय आणि महाराष्ट्राच्या राजधानीत, मुंबईत येऊन स्थायिक होतो काय. ईथल्या लोकांचा त्याला लळा लागतो. ईथले लोक या लोकांना आपलंसं करतात. हे सगळं स्वप्नवत नाही वाटत? आजही तो सकाळी आठ वाजता हॉटेल ऊघडतो. स्कूल बसला ऊभी असलेली छोटी मुलं आपल्या आई बरोबर जावेदभाई जवळ जातात, वेद या मुलांचे लाड करतो, त्यांचा पापा घेतो आणि त्यांना फुकट चॉकलेटं वाटतो. त्यांच्या आयाची चौकशी करतो घरच्या मंडळींची चौकशी करतो. हे दृश्य आज ही सकाळच्या वेळेस ईथे पहायला मिळेल.
आज ‘ लाईट ऑफ भारत रेस्टॉरंट ‘ गुलाम हुसैन साकींची तिसरी पिढी म्हणजे जावेदचा मोठा मुलगा रेजा फार उत्तम प्रकारे आणि कल्पकतेने चालवतोय पूर्वी वडिलांच्या आणि आजोबांच्या काळातलं दहा बारा डिशेसचं मेन्यू कार्ड आता विविध प्रकारच्या शंभर दिडशे डिशेसची नांवं दाखवतंय. नवनवीन प्रयोग करतोय. हॉटेलात बऱ्याचदा हिंदी मराठी सिनेमांचं चित्रीकरण ही होतंय. रेजाची बेगम दुबईत स्वतःची मिडीया कंपनी चालवते आहे. धाकटा मुलगा मन्सूर अली आपल्या कुटुंबा सह अमेरिकेत स्थायिक झालाय. अमेरीकन बँकेत चांगल्या हुद्द्यावर काम करतोय. रेजा ने ईथेच रहायचं आणि रेस्टॉरंट सांभाळायचं ठरवलंय.
जावेद आज मागे वळून पहातो तेव्हा त्याला जुने दिवस आठवतात. डोळ्यात पाणी तरळतं. चेहरा अत्यंत भावुक होतो. जुन्या स्मृतींनी व्याकूळ होतो. आणि हे दिवस दाखवल्या बद्दल परवरदिगारचा शुक्रगुजार करतो.
असा आमचा हा ईराणी. कधी आलात आमच्या भागात तर जरुर भेटा एकदा या सद्गृहस्थाला आणि त्याच्या मुलाला.
पुष्कराज चव्हाण
१८-०४-२०१६
Comments
Post a Comment