मी मत्स्याहारी झालो.

मी मत्स्याहारी झालो.

१९८८ साली जून महिन्यात माझ्या लग्नाची नोंदणी झाली तेव्हा मला कल्पनाही नव्हती, स्वप्नातही वाटलं नव्हतं की मी आयुष्यात कधी मत्स्याहारी होईन म्हणून. पण गेल्या ३१ वर्षात बकऱ्यावरुन कोंबडीवर आणि कोंबडीवरुन माशांवर अलगद कधी घसरलो हे माझं मलाच समजलं नाही.
आम्ही जातीने मराठा ते ही घाटावरचे त्यामुळे मासा हा प्रकार आमच्या घरी शिजत नसे. मांसाहार म्हंटलं कि आमच्याकडे शेळी, मेंढी, कोंबडी आणि कधी कोणी शिकारीला गेलं तर गावाकडे एखादे वेळी ससा, हरण, किंवा रानडुक्कर खायला मिळत असे. मुलं मुलं आम्ही कधी पारवे, तितर, बटेर आणि शहरात कबुतरं सुद्धा खात असू. मारण्याचं काम आमचं, तर बनवणारा कोणी दुसराच असे किंवा मग आमचं आम्हीच पिसं काढून आतडी वगैर टाकाऊ भाग टाकून तीन दगडांच्या चुलीवर काट्याकुट्या लाऊन भाजून लिंबू मीठ लाऊन खायचो. पण हे सगळं घराबाहेर कुणाच्यातरी शेतावर किंवा रानात. घरात अजिबात नाही.
लग्न जर स्वजातीय मुली बरोबर झालं असतं तर कदाचित हे सारं चालू राहिलं असतं. घरात दोन बंदुका होत्याच त्यामुळे अधूनमधून हुक्की येतच असे. आजोबा, वडील, काका, आत्या हे सारे उच्च शिक्षित होते त्यामुळे घरातलं वातावरण मात्र तसं बुद्धिजीवी लोकांसारखं होतं. मी मात्र हूड लोकांमधेच जास्त रमत असे. आणि हे सारे उद्योग बाहेरच्या बाहेर चालत असत.
हा सारा प्रकार  कॉलेज जीवन संपेपर्यंत सुरु होता. कॉलेज जीवनापासूनच खरं तर वडिलांनी मला कामकाजात अडकवण्याचा प्रयत्न केला परंतु ते सांभाळूनही हे उद्योग करता येत असत. तेव्हाचं जग आता येवढं वेगवान नव्हतं.
पुढे कॉलेजात माझ्याच वर्गातल्या सारस्वत मुली बरोबर मी आंतरजातीय विवाह केला. आमच्या सात पिढ्यांमधे कोणी केलं नव्हतं ते मी केलं. नातं गोतं सारं हादरलं. पण अंगात रग होती निभाऊन नेण्याची धमक होती त्यामुळे आणि आधीच सांगिल्या प्रमाणे वडिलांचे आणि तिकडच्या नात्यात म्हणजे वडिलांकडच्या पुरोगामी विचारसरणी होती त्यामुळे तिकडून त्रास नव्हता. आईचं मन मात्र फारच दुखावलं गेलं होतं. असो, विषय तो नाही. सांगायचं ईतकंच की जीवन मात्र माझं पार बदलून गेलं. बायको सारस्वत जातीची असल्याने हळू हळू घरात आहारामधे मासे यायला लागले.
माझ्या आंतरजातीय विवाहामुळे आई नाराज होती तरी तिला सूनेच्या हातचे मासे मात्र खायला आवडायचे याची मला गंमत वाटायची. अगदी सराईतासारखं खायला नाही जमलं तरी मोठे मासे माझे वडिल आणि आम्ही खायला लागलो. पुढे आम्ही वेगळं रहायला लागल्यावर आमच्या घरात परमेश्वराच्या या प्रथमावताराला कवाडं अगदी मोकळी मिळाली आणि या समुद्र संपत्तीची विविध रुपं घरात येऊन आहारात समाविष्ट झाली. मुली पक्क्या मासे खाऊ झाल्या आणि घरात तीन विरुद्ध एक असा सामना रंगू लागला. त्यावर उपाय म्हणून आठवड्यातून चार पैकी तीन दिवस मासे आणि एक दिवस चिकन किंवा मटण असा ठराव बहुमताने पास झाला.
मी ही सुरुवातीला मोठे, खायला सोपे असे मासे खायला सुरु करुन आतापर्यंत मोदकं, मुडदशा, मांदेली, खेकड्या पर्यंत येऊन पोचलोय. एक मात्र खरं मासे पचायला हलके असतात हे माझं मत आहे आणि शिवाय बुद्धी व प्रकृतीला उत्तम. आणि हाच विचार पटवून घेऊन मासे खायला सुरुवात केली. मग मात्र मत्स्याहाराला आपलंसं करुन ईतर प्राणी पक्षी यांचं आहारातलं महत्व कमी व्हायला लागलं. एक मात्र खरं मासे खावेत तर ते सारस्वतांकडेच किंवा त्यांच्या हातचेच असं माझं मत आहे. तुम्ही सहमत असावेच असा माझा आग्रह नाही. पण मी कितीही मोठ्या नामांकित रेस्तराँ मधे किंवा हॉटेलात गेलो तरीही तिथे मासे खात नाही कारण माझ्या बायकोच्या हातचे मासे खाल्ल्या नंतर हॉटेल मधले मासे मी खाऊच शकत नाही कारण त्याला घरच्या जेवणाची सर नाही. 
माशाचं जेवण असलं की सोबतीला दुरदुरीत नारळाच्या रसाची सोलाची कढी मात्र हवी किंवा नुसती तिवळ जरी असली तरी बेस्ट. तिवळ प्यायल्यावर पोटात कसं थंड वाटतं. तिरफळं घालून बांगड्याची आमटी तर फारच छान. पण पुन्हा सांगतो मासे   खावेत तर सारस्वतांकडेच हे मात्र खरं. यांच्या पदार्थांची नांवं मात्र जरा अजबच. वानगीदाखल म्हणून सांगतो, आंबट-तिखट, किसमूर, भुजणं, कळपुटी, तिकलं अशा प्रकारची नांवं. आणि माशांमधे करली, पेडवे, मोरी, मुडदशी, तारल्या, तिसऱ्या, खुबे अशी नांवं. यातले जे बारीक मासे असतात ते खरं तर चवीला चांगले पण त्यातले काटे काढणं जिकिरीचे काम. पण अट्टल खाणाऱ्याला त्याचं काही विशेष वाटत नाही. सारस्वताला जेवताना पाहून माझ्या निरीक्षणात ज्या गोष्टी आल्या त्यातली एक म्हणजे ही माणसं एखाद्याचा काटा अगदी लीलया काढू शकतील आणि दुसरं म्हणजे जेवताना यांच्या आजूबाजूला मांजर हा प्राणी क्वचितच रेंगाळताना दिसेल कारण जेवताना यांच्याकडून बाजुला काढून ठेवलेल्या काट्याला माशाचा कण ही रहाण्याची शक्यता शून्य असते त्यामुळे जिथे काहीच मिळणार नाही त्या राजकीय पक्षाच्या आसपास जिथे राजकारणीही फिरकत नाही या राजकारणातील नियमानुसार ही जन्मतःच हुशार असलेली मांजराची जात कशाला फिरकेल?
असो, तर आमचा दर रविवारचा कार्यक्रम असा, सकाळ जराशी उशीरा उजाडावी, रेडिओवर किंवा सीडी प्लेअरवर नाट्यगीतं ऐकत ऐकत आंबोळी आणि काळ्या वाटाण्याची उसळ असा नाष्टा करावा आणि मग बायकोला घेऊन सिटी लाईट मार्केट मधे जावं, सोबत दोन तीन पिशव्या त्यातली एक असते गोव्याची काळी प्लास्टिकची बास्केट. गाडी पार्क करुन मार्केटात शिरलो की बायको थेट मासे घ्यायला त्या दिशेने जाते आणि क्षणार्धात गायब होते. मी उरलेल्या पिशव्या घेऊन कांदे-बटाटे, टोमॅटो, मिर्ची-कोथिंबीर ईत्यादी ‘कोरस’ मधला माल आणायला म्हणून जड पावलांनी जायला निघतो. सर्व खरेदी मनासारखी झाली की बायको हाशहुश करत येऊन गाडीत बसते आणि पहिलं वाक्य असतं "काय महाग आहेत रे मासे?" "दोन हजाराला पापलेटची जोडी?" "आणि आकाराला हाताच्या पंजा एवढे" असं हात पुढे करुन एका दमात सांगते. पुढे म्हणते "मी तिला सांगितलं अज्जिबात देणार नाही आठशेला देतेस तर सांग". मी हादरलोच दोन हजारावरुन आठशे? हे बायकाच करु जाणोत बाबा आपलं हे काही काम नाही. “मग काय म्हणाली ती?” माझा प्रतिप्रश्न. " काय म्हणते ती घेतले निमूटपणे." तू असतास तर देऊन आला असतास बावळटा सारखा. खरं तर हे पुढचं जे बावळटा सारखं म्हंटलं ना त्याची काही आवश्यकता नव्हती खरंतर माझ्या बायकोने जेव्हा दोन हजार वरुन थेट आठशेवर सौदा आणला तेव्हाच आपण किती बावळट आणि व्यवहारशून्य आहोत याची मला जाणीव झाली होती.
कमीत कमी शब्दांतला हा जास्तीत जास्त झालेला अपमान मूग गिळल्या प्रमाणे गिळून मी तिला निमूटपणे घरी घेऊन येतो आणि अंघोळ वगैरे करुन शुचिर्भूत होऊन बाहेर पडतो आता माझी पाऊले जिमखान्याची वाट चालू लागतात. जिमखान्यात रेस्तराँ चा दरवाजा उघडला कि थंडगार हवेचा झोत अंगावर येतो, आतला संपूर्ण परिसर फुलून गेल्या सारखं वाटतं. अगणित समविचारी माणसांचे परिसंवाद कानावर पडतात. आपण आपलं एक कोपऱ्यातलं टेबल निवडायचं आणि अगदी थंडगार बियरचे घोट थंडगार रेस्तराँ मधे बसून खिडकीच्या काचेतून बाहेरच्या रणरणत्या उन्हाकडे आणि सुस्त रस्त्याकडे पहात गुटुक गुटुक करत घशाखाली अलगद सोडायचे.  अहाहा! काय फील येतो म्हणून सांगू? एक बियर संपते आणि आता एव्हाना जेवणाचे वेध लागलेले असतात. आता थेट घरी यायचं.
कधीकधी आम्ही घरी जेवायला केळीची पानं आणतो. त्यावर जेवताना एक वेगळाच फिल येतो.   हातपाय तोंड धुवून बाहेर येईपर्यंत त्या पानावर  गरम गरम वाफाळत्या सुवासिक पांढऱ्या शुभ्र कृष्ण कमोद भातावर हळदीच्या रंगाची तिरफळं घातलेली आमटी, तांबुस भाजलेला बांगड्याचा तुकडा, कांदा टोमॅटो ची लाल-पांढऱ्या रंगाची सरमिसळ असलेली कोशिंबीर, पिवळसर तपकिरी रंगाचं मिरगुंड, पांढरं शुभ्र मीठ, कडेला अंग चोरुन उभी असलेली गुलाबी रंगाच्या सोलकढीची वाटी, पांढरी शुभ्र तांदळाची भाकरी, पिवळ्या धम्मक लिंबाची फोड अशी निरनिराळ्या रंगांची हिरव्या कंच केळीच्या पानावर नक्षी पाहीली की त्या दर्शनाने आणि पदार्थांच्या घमघमाटानेच पाचक रस पोटात पाझरायला सुरुवात होते तोंडास पाणी सुटते आणि कधी या साऱ्यांना उदरी स्थान देतो असं होतं. अगदी पोटाला तडस लागे पर्यंत यथेच्छ जेऊन झालं, हातावर पाणी पडलं की ओसरी वरच्या कडीपाटावर बसून निवांतपणे विडा चघळायचा आणि मग यथेच्छ विसावा घ्यायचा.
असं सगळं जुळून आल्यावर तृप्त मनाने मनातल्या मनात मग मी म्हणतो.पुढच्या जन्मी बायको सारस्वतीणच आणि हीच दे रे देवा मंगेशा🙏🏻.

© पुष्कराज चव्हाण
      १७-०७-२०१९

Comments

  1. 👍👍 आम्ही मासेखाऊ - सारस्वत!

    ReplyDelete

Post a Comment