कहाणी आमच्या ईराणीची
भारतीय संस्कृतीची जडण घडण होण्यात भारतीय लोकांबरोबरच ईतर देशातल्या लोकांचा देखील महत्वाचा वाटा आहे हे सर्वमान्य असावे असे मला वाटते. यात ब्रिटिश, मोघल, डच, पोर्तुगीज, यांच्यासह अगदी आपणा सर्वांना परीचित असलेल्या ईराणी नागरीकांचा समावेशही आहे. यात आपण ज्यांना सरसकट ईराणी म्हणून संबोधतो असे झरत्रुष्टाची आणि अग्नी ची पूजा करणारे पारशी आणि अल्लाला मानणारे आणि कुराण पठण करणारे मुसलमान नागरीकही आले. या ईराणच्या स्थलांतरीतांनी हिंदुस्थानात येऊन हिंदुस्थानी संस्कृतीत स्वतःला सामावून घेताना ते स्थानिकांच्या जीवनात दूधात साखर मिसळून जावी तसे एकरुप झाले. सांस्कृतिक देवाण घेवाणीत मग खाद्य संस्कृती ही आली आणि उद्योग व्यापार उदीम याचाही भाग आला. पारसी- ईराणी लोकांनी हिंदुस्थानाभर विविध क्षेत्रात आपल्या वैशिष्ट्याचा एक अमीट ठसा उमटवला आहे. अगदी टाटा, गोदरेज यांच्यापासून ते बोमन ईराणी, अरुणा ईराणी ते अर्षद वारसी पर्यंत. ऊद्योग, व्यापार, वास्तु रचना, विज्ञान, वैद्यकीय, कला, क्रिडा, राजकारण, दानधर्म, हॉटेल एकही क्षेत्र असं नाही कि ज्यात यांनी आपलं स्थान निर्माण केलं नाही. ही भली माणसं ईराण मधून हिंदु...